'आप' हा फक्त दिल्लीचा नव्हे, तर सर्वसामान्यांचा पक्ष : आतिशी

आपच्या दक्षिण गोवा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th March, 12:34 am
'आप' हा फक्त दिल्लीचा नव्हे, तर सर्वसामान्यांचा पक्ष : आतिशी

मडगाव : 'आम आदमी पक्ष' हा दिल्ली, पंजाब, हरयाणा किंवा इतर कोणत्याही प्रदेशाचा पक्ष नाही तर हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. लोकांची कामे करण्यासाठी नेता नको, पैसा नको तर इच्छाशक्ती असावी लागते. 

'आप' निवडणूक न जिंकल्यास 'आप' पक्षाचे काय होणार हा प्रश्न नाही, तर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार हा मुद्दा आहे, असे प्रतिपादन करत आप पक्ष लोकांसाठी काम करणारा पक्ष असल्याचे दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या व आमदार अतिशी यांनी केले. 

दक्षिण गोवा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आपच्या नेत्यांनी आगामी निवडणुकांत लोकांना 'आप' हा चांगला पर्याय असल्याचे सांगितले. सत्तेतून पैसा व पैशातून आणखी सत्ता मिळवणे हे राजकारणाचा हेतू बनलेला आहे. 

त्यामुळेच अनेकजण राजकारणात कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. हा कोट्यवधींचा पैसा सर्वसामान्यांसाठी शिक्षण, आरोग्य व इतर साधनसुविधांसाठी खर्च होणार होता, मात्र तो नेते गोळा करत आहेत. 

मागील विधानसभेत गोव्यातील लोकांनी दोन आमदार निवडून दिले. यापुढील निवडणुकीत लोकांच्या विश्वासावर 'आप'चे आणखीही उमेदवार निवडणूक जिंकतील. या निवडणुकांची तयारी करण्यास आता सुरुवात करण्यात आलेली आहे. पक्षाचे कार्यकर्ते यावेळी चांगले काम करतील व आमदारांचा २० चा आकडा पार करतील, असा विश्वास व्यक्त केला. 

तीन वर्षांपूर्वी १० मार्च रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला व 'आप'चे दोन उमेदवार आमदार झाले आणि याच दिवशी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यात लोकांना सरकार बदल घडवायचा आहे व २०२७ मध्ये राज्यात नक्कीच आपचे सरकार येईल. 

आपने दुसर्‍या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणलेले आहे ते पक्ष आमच्या ऋणात आहेत. पण आप हा दुसर्‍या पक्षाच्या नाही तर लोकांच्या व कार्यकर्त्यांच्या ऋणात आहे, असे आमदार क्रुझ सिल्वा यांनी सांगितले. 

आमदार व्हेंझी व्हिएगस म्हणाले की, इतर पक्षाप्रमाणे आपने लोकांचा विश्वासघात केलेला नाही. तीन वर्षे विरोधात राहून विकासकामे केली. लोकांनी आगामी निवडणुकांत आपला बहुमत देण्याची गरज आहे. 

लोकांना फसवणूक करणार्‍या मतदारसंघात बदल घडण्याची गरज आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. दोन्ही आमदारांना पैशांचे, मंत्रिपदांचे आमिष दाखवण्यात आले पण गोवा राखण्याचा संकल्प ढळू दिला नसल्याचे सांगितले.

नव्या चेहर्‍यांना संधी देणार
आप हा विश्वास दर्शवण्यासारखा पक्ष असून एक संधी मिळावी. नव्या चेहर्‍यांना निवडून आणावे, असे आवाहन केले. राज्यात 'हातात कमळ' हे नवे चिन्ह पुढील निवडणुकीत असेल. काहींनी देवांसमोर घेतलेल्या शपथाही विसरलेल्या आहेत. आपच्या दोन आमदारांची संख्या २२ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर म्हणाले.      

हेही वाचा