आजोबांसहित नातवाला मारहाण केल्याचा आरोप
म्हापसा : हळदोणा येथे दोघा शाळकरी मुलांचे भांडण सोडवणार्या व्यक्तीने जाब विचारल्याच्या कारणावरून एका मुलासह त्याच्या आजोबाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अजित जल्मी (५४, रा. हळदोणा) यांना अटक केली.
ही घटना सोमवारी १० रोजी सायंकाळी ५.३०च्या सुमारास घडली. शाळा सुटल्यानंतर इयत्ता ६वी मध्ये शिकणारे दोघे विद्यार्थी आपापसात भांडत होते. त्यावेळी आपल्या मुलाला शाळेतून न्यायला आलेले अजित जल्मी यांनी सदर दोन्ही मुलांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी एका मुलाचे आजोबा सिव्हील फर्नांडिस (६१) यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या लहान मुलाने जल्मी यांना जाब विचारला. त्याप्रकारावरून त्यांच्यात वादावादी झाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सर्वांना पोलीस स्थानकात आणले.
त्यानंतर बेनेडिटा मार्टीन यांनी पोलिसांत आपले वडील सिव्हील फर्नांडीस व मुलाला मारहाण केल्याची तक्रार अजित जल्मी यांच्या विरुद्ध दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी भा.न्या.सं.च्या कलम ११८ (१) व गोवा बाल कायद्यान्वये गुन्हा नोंदवून अजित जल्मी यांना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब हे करत आहेत.