ड्रग्ज अहवाल सकारात्मक आल्याने जामिनावर असलेला पुन्हा तुरुंगात

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15 hours ago
ड्रग्ज अहवाल सकारात्मक आल्याने जामिनावर असलेला पुन्हा तुरुंगात

पणजी : केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने एप्रिल २०२३ मध्ये हरमल येथे छापा टाकून स्थानिक युवक आकाश म्हार्दोळकर याला अटक केली होती. त्याची नंतर न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. दरम्यान, जप्त केलेल्या ड्रग्जचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे जामिनावर असलेल्या आकाश म्हार्दोळकरचा जामीन रद्द करून त्याला तुरुंगात टाकण्यात आले आहे. याबाबतचा आदेश न्या. राम प्रभुदेसाई यांनी दिला आहे.

हरमलच्या किनारी भागात आंतरराष्ट्रीय ड्रग्जची टोळी कार्यरत असून ही टोळी विदेशी नागरिकांना ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीनुसार, २८ एप्रिल २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास आकाश म्हार्दोळकर याला अटक केली. त्याच्याकडून ९ एलएसडी ब्लॉटस, ३० ग्रॅम चरस, १ एमडीए टॅबलेट व २८ हजार रुपयांची रोकड जप्त केली होती. त्याची चौकशी केली असता आंद्रे हा त्यांचा मोरक्या असल्याचे समजले. त्यानुसार एनसीबीने मांद्रे येथे पाळत ठेवून रशियाचा माजी पोलीस अधिकारी आंद्रे डिमियान याला ताब्यात घेतला. त्याच्याकडून २० एलएसडी ब्लॉटस् हा ड्रग्ज जप्त केला. शिवाय तो राहत असलेल्या खोलीत १.३२ ग्रॅम वजनाच्या ५९ एलएसडी ब्लॉटस्, ८.८ ग्रॅम कोकेन, १६.४९ ग्रॅम हशीश तेल, २१० ग्रॅम चरस, ४१० ग्रॅम हॅस केक जप्त केले. त्यानंतर एनसीबीने आंद्रे राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकला असता, तिथून १.४४० किलो गांजाही जप्त करण्यात आले. याशिवाय त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, ४.६० लाखांचे भारतीय चलन, १,८२९ अमेरिकन डॉलर, १,७२० थाय बाहत हे थायलंडचे चलन आणि बनावट कागदपत्रे सापडली असून ती जप्त करण्यात आली होती.

या प्रकरणी एनसीबीने त्या दोघांविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्या दोघांना न्यायालयाने प्रथम एनसीबीची कोठडी ठोठावली. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याच दरम्यान आकाश म्हार्दोळकर याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता, तो न्यायालयाने सशर्त मंजूर केला. तर रशियाचा माजी पोलीस अधिकारी आंद्रे डिमियान हा न्यायालयीन कोठडीत आहे.

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा अहवाल सकारात्मक आला. याची दखल घेऊन एनसीबीतर्फे विशेष अभियोक्ता समीर ताळगावकर यांनी संशयित आकाश म्हार्दोळकरचा जामीन रद्द करण्याचा अर्ज न्यायालयात सादर केला. तसेच विविध न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचे संदर्भ मांडून जामीन रद्द करण्याचा युक्तिवाद केला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू एेकून घेतल्यानंतर म्हार्दोळकरचा जामीन रद्द करून एनसीबीकडे शरण येण्यास सांगितले. त्यानुसार, शरण आल्यानंतर म्हार्दोळकरला मंगळवार ११ रोजी एनसीबीची कोठडी देण्यात आली आहे.