मुहम्मद निहाल याच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश

जप्त ड्रग्जचा प्रथमदर्शनी अहवाल सकारात्मक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th March, 12:17 am
मुहम्मद निहाल याच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश

पणजी : मांद्रे पोलिसांनी गावडेवाडा येथील बूट गेस्ट हाऊसनजीक छापा टाकून जप्त केलेल्या ड्रग्जचा प्रथमदर्शनी अहवाल सकारात्मक अाहे. असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित मुहम्मद निहाल याच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला. याबाबतचा आदेश म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी दिला आहे.

या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी २५ मार्च २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, गावडेवाडा- मांद्रे येथील बूट गेस्ट हाऊसनजीक एक युवक ड्रग्ज तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक कुणाल नाईक, पोलीस कर्मचारी साईश पोकला, विजय गायकवाड, बाबाजी पेडणेकर, राजेश शिरगलकर व इतर पथकाने वरील ठिकाणी २५ मार्च २०२४ रोजी मध्यरात्री २.३४ ते पहाटे ५.५० वाजता सापळा रचला. यावेळी गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ठिकाणी मुहम्मद निहाल हा केरळीयन युवक संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पथकाच्या नजरेस आले. यावेळी पथकाने त्याच्याकडून १४.३६ लाख रुपये किमतीचा २.३६ किलो चरस आणि १ ग्रॅमचे १२३ एलएसडी पेपर जप्त केले. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताला न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणी तपास पूर्ण करून मांद्रे पोलिसांनी संशयित मुहम्मद निहाल याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, पोलिसांनी जप्त करताना ड्रग्जची चाचणी केली होती. त्याचा अहवाल सकारात्मक आला होता. याची दखल घेऊन न्यायालयाने संशयित निहाल याच्या विरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला आहे.

१४.३६ लाखांचा ड्रग्ज केला होता जप्त

पथकाने मुहम्मद निहाल याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून १४.३६ लाख रुपये किमतीचा २.३६ किलो चरस आणि १ ग्रॅमचे १२३ एलएसडी पेपर जप्त केले होते. त्यानंतर त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती.