महिलेकडून तक्रार : मानसिक छळ, विनयभंगाचा आरोप
म्हापसा : आयकर अधिकारी पथकाचा सामना म्हापशातील चार कुटुंबांना करावा लागला. पोलीस चौकशीतून छापा टाकण्यासाठी आलेले सदर आयकर पथकच असल्याचे उघड झाले. मात्र, या पथकाच्या सत्यतेवर लोकांनी संशय व्यक्त केला आहे.
दि. ६ रोजी गृहनिर्माण वसाहत तसेच म्हापसा शहर परिसरातील चार ठिकाणी नोयडास्थित आयकर अधिकार्यांच्या पथकाने छापा टाकला. नंतर चारही ठिकाणी गैरसमजुतीतून छापेमारीचा प्रकार घडल्याचे मान्य करीत या आयकर पथकाने काढता पाय घेतला. याप्रकरणी गृहनिर्माण वसाहतीमधील एका कुटुंबाने म्हापसा पोलिसांत तक्रार दिली आहे. या सव्वा दोन तासांच्या छापेमारीच्या प्रकाराचा थरार फिर्यादी महिलेने कथन केला.
सकाळी ६.४५ च्या सुमारास पतीने कुत्र्याला घेऊन बाहेर जाण्यासाठी घराचा दरवाजा उघडला. त्याचवेळी चौघे आयकर अधिकारी असल्याचे सांगत घरात घुसले. या आयकर अधिकार्यांनी पती, पत्नीचे मोबाईल जप्त केले. त्यांनी आपण नोयडा येथील आयकार अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांच्यामध्ये एकजण मिलिटरी गणवेशात होता. ओळखपत्र मागितल्यावर त्यांनी दाखवत लगेच खेचून घेतले. प्रथमेश नामक व्यक्तीला ते शोधण्यासाठी आले होते. त्यांच्याकडील वॉरंटवरील पत्ता आणि घराच्या दरवाजाचा फोटो तक्रारदार महिलेच्याच घराचा होता. मात्र, संबंधित व्यक्ती या घरात राहत नव्हती.
संभाषणावेळी घरमालक महिलेने प्रसंगावधान राखत दरवाजाला लावलेली कडी काढून घरातून बाहेर धाव घेतली. दोघांनी त्यांचा पाठलाग केला. आमच्या घरात कोणी शिरले असून पोलिसांना बोलवा, अशी विनंती त्यांनी शेजार्यांकडे केली. तोपर्यंत तिला त्या व्यक्तींनी घरात पुन्हा नेले. पती- पत्नी व त्या आयकर पथकांत वादावादी सुरू होती. शेजार्यांनी पाचारण केलेले पोलीस अर्ध्यातासाने घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने पोलिसांना ओळखपत्र दाखवत आमच्या कामात हस्तक्षेप करण्यास तुम्ही का आलात? असा सवाल केला, त्याबरोबर पोलीस माघारी परतले.
त्यानंतर काहीवेळाने आपण चुकीच्या जागी आल्याचे मान्य करीत ते माघारी परतले. त्यांनी दोन भाड्याच्या कार आणल्या होत्या. अशाच प्रकारचे म्हापसा पोलिसांना अजून तीन कॉल्स आले होते. तिथे देखील आयकर पथक चुकीच्या ठिकाणीच आल्याचे समजले.
दरम्यान, छापा टाकण्यासाठी आलेले ते आयकर अधिकारी होते. त्यांच्या ओळखपत्रांची आम्ही पडताळणी केली आहे, अशी माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली.
पोलीस आल्याने झाली सुटका
आम्ही शेजार्यांमार्फत पोलिसांची मदत घेतली म्हणून आमची सुटका झाली. एखाद्या घरी छापा टाकताना कोणत्याही पथकाने महिला पोलीस किंवा अधिकार्यांची मदत घ्यायला हवी होती. आमच्यासोबत घडलेला हा प्रकार विनयभंगाचाच भाग आहे. आमच्या तक्रारीनुसार पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.