उत्तर गोव्यात पोलिसांकडून भाडेकरू पडताळणी मोहीम

टेनंट फॉर्म भरून जमा न केलेल्या भाडेकरूंवर कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th March, 12:22 am
उत्तर गोव्यात पोलिसांकडून भाडेकरू पडताळणी मोहीम

पणजी केटीसी बस स्थानकावर भाडेकरू आणि कामगार यांची पडताळणी करताना पणजी पोलीस. (नारायण पिसुर्लेकर)

पणजी : उत्तर गोव्यातील विविध पोलीस स्थानकांतील पोलिसांनी आपापल्या हद्दीत भाडेकरू पडताळणी मोहीम उघडली आहे. मोपा, कोलवाळ, पर्वरी, म्हापसा, साळगाव, पणजी पोलिसांनी मोपा येथील प्रभाग, थिवी रेल्वे स्थानक परिसर, म्हापसा बस स्थानक तसेच पर्वरी, साळगाव येथील काही प्रभागांत भाडेकरूंच्या टेनंट फॉर्मची तपासणी केली. टेनंट फॉर्म भरून जमा न केलेल्या भाडेकरूंवर कारवाई करण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासह गुन्ह्यांचा छडा लावणे शक्य व्हावे या हेतूने ही कारवाई केली जात आहे.
गोवा भाडेकरू पडताळणी कायद्याची अंमलबजावणी १ डिसेंबर २०२४ पासून झाली आहे. आतापर्यंत सुमारे २.२० लाख घरांची भाडेकरूंसाठी तपासणी पूर्ण झाली आहे. जे घरमालक भाडेकरूंंची माहिती व कागदपत्रे पोलिसांना देत नाही, त्यांना १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद या कायद्यात आहे. घरमालकांनी भाडेकरूंच्या ओळखपत्रांसह आवश्यक माहिती विहित फॉर्ममध्ये भरून नजीकच्या पोलीस स्थानकात द्यावी, अशी सूचना सरकारने यापूर्वीच दिली आहे.
जुने गोवेत ५१२ भाडेकरूंची पडताळणी
जुने गोवा पोलिसांकडून करमळी रेल्वे स्टेशन, खोर्ली आणि जुने गोवे परिसरात ५१२ भाडेकरूंची पडताळणी. प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत पाच जणांना अटक करण्यात आले असून चौकशीसाठी आणखी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.