कदंब कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी फोन्सेकांचे उपोषणास्त्र

निर्णय न झाल्यास १९ मार्चपासून संप


11th March, 12:06 am
कदंब कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी फोन्सेकांचे उपोषणास्त्र

पणजी बसस्थानकावर आयोजित आंदोलनात घोषणा देताना कामगार नेते कॉ. ख्रिस्तोफर फोन्सेका व इतर.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. सरकारने आश्वासने देऊनही ती पूर्ण केलेली नाहीत. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कामगार नेते कॉ. ख्रिस्तोफर फोन्सेका पाटो-पणजीतील ‘श्रमशक्ती भवन’समोर सोमवारी एकदिवसीय उपोषण केले. सरकारने निर्णय न घेतल्यास १९ मार्चपासून कदंबचे कर्मचारी संपावर जातील, असा इशारा फोन्सेको यांनी दिला.
कदंब कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचारविनिमय करण्यासाठी आयटक आणि कदंब कर्मचारी संघटना यांच्या वतीने पणजी बसस्थानकावर सोमवारी कर्मचाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर फोन्सेका म्हणाले, कदंब कर्मचाऱ्यांची थकबाकी, पीएफचा दर पूर्वीसारखा १२ टक्के करणे आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे आदी मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत.
जानेवारी २०१६ ते जानेवारी २०१८ या काळातील २४ महिन्यांची थकबाकी देण्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता; मात्र अद्यापही ती मिळालेली नाही. निवृत्त कर्मचा ऱ्यांना एकरकमी, तर सेवेत असलेल्या कर्मचा ऱ्यांना तीन हप्त्यांत रक्कम अदा केली जावी. महामंडळात ३५० कामगार ७ ते १० वर्षांपासून रोजंदारीवर काम करत आहेत. त्यांना सेवेत सामावून घ्यावे. सरकारने तीन वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अशा रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या किंवा त्यांना सेवेतील कर्मचाऱ्याइतके वेतन द्या. विजेवरील बस कदंबने चालवाव्यात, ‘माझी बस’ योजनेला आमचा विरोध आहे.
संपकाळात कदंब बस रस्त्यावर दिसणार नाही
कामगार आयुक्तांना २७ दिवसांपूर्वी आंदोलनाची नोटीस दिली होती. १२ दिवस झाले तरी काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांना जागे करण्यासाठी एक दिवसाचे उपोषण केले आहे. १९ मार्चपर्यंत मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास संप पुकारण्यात येईल. मुख्यमंत्री, वाहतूकमंत्री यांनी संप होऊ द्यायचा की नाही हे ठरवावे. संप सुरू झाल्यानंतर कदंबची एकही गाडी रस्त्यावर धावणार नाही, असेही फोन्सेका यांनी स्पष्ट केले.