१३० कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणात झाली होती अटक
पणजी : फातोर्डा-मडगाव ते लंडनपर्यंत प्रकरणाची व्याप्ती असलेल्या १३० कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्यातील मुख्य संशयित मायरन राॅड्रिग्ज याची पत्नी दीपाली परब (४२, कल्याण-मुंबई) हिला गुन्हा शाखेने अटक केली होती. या प्रकरणी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने दीपाली परब हिला सात दिवसांची अतिरिक्त पोलीस कोठडी ठोठावली आहे.
गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) संशयित मायरन राॅड्रिग्ज आणि त्याची पत्नी दीपाली परब यांच्याविरोधात २०२३ मध्ये दोन गुन्हे दाखल केले होते. दोन्ही गुन्ह्यांत संशयितांनी सुमारे ३८ गुंतवणूकदारांना २५ कोटी रुपयांना फसवले होते. याशिवाय राॅड्रिग्ज याने २००९ ते १७ ऑगस्ट २०२३ या काळात १३० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले. त्यानुसार, ईओसीने अधिक चौकशी केली असता, राॅड्रिग्ज याने ‘आयडीलीक गोवन गेटवेज’ कंपनीत ३.२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आल्यानंतर ईओसीने कंपनीचे संचालक नॉलन आंताव, ज्योकिम रोझारियो पिरीस, विजय जाॅयल, नवनिक परेरा आणि सुशांत घोडगे यांना संशयित करून चौकशी केली.
दरम्यान, ईओसीने मायरन राॅड्रिग्ज याच्यासह त्याची पहिली पत्नी सुनीता आणि दुसरी पत्नी दीपाली परब यांच्या तीन बँक लाॅकरातून ३ कोटी रुपयांच्या ४.१२५ किलो दागिन्यांसह मालमत्तेची अस्सल कागदपत्रे जप्त केली. त्यानंतर हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा शाखेने राॅड्रिग्ज याची पहिली पत्नी सुनीता राॅड्रिग्जला अटक केली होती. तिला मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
दीपालीचा न्यायालयात जामीन अर्ज दाखल
गुन्हा शाखेने राॅड्रिग्ज याची दुसरी पत्नी दीपाली परब हिला अटक केली. दीपाली परबला मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली होती. ती संपल्यानंतर तिला बुधवारी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिला आणखीन सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, दीपाली परब हिने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ रोजी होणार आहे.