बसस्टॉपवर उभ्या महिलेचे दुचाकीस्वारांनी लांबवले मंगळसूत्र

राय येथील घटना : १.१० लाखांचा मुद्देमाल चोरीला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th March 2025, 12:10 am
बसस्टॉपवर उभ्या महिलेचे दुचाकीस्वारांनी लांबवले मंगळसूत्र

मडगाव : राय परिसरातील टेंबी येथे सुषमा शिरोडकर या बसस्टॉपवर गाडीची वाट पाहत होत्या. दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरांनी शिरोडकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत पलायन केले. या चोरीप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून मायना कुडतरी पोलीस याचा तपास करत आहेत.

टेंबी राय येथील बस स्टॉपवर ही घटना १० मार्च रोजी घडली. सुषमा शिरोडकर या एका बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिरोडकर या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बसस्टॉपवर बसची वाट पाहत होत्या. त्याचवेळी रॉयल एनफिल्ड बुलेट घेऊन दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्यानजीक आले. त्यांनी शिरोडकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत ते पसार झाले. शिरोडकर यांनी मदतीसाठी आरडाओरड केली, तोपर्यंत बुलेटवरील दोघे चोर पसार झाले होते. चोरी केलेल्या मंगळसूत्राची किंमत सुमारे १.१० लाख एवढी आहे. याप्रकरणी सुषमा शिरोडकर यांनी मायना कुडतरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मायना कुडतरी पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वेरोनिता कुतिन्हो याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.