परिसरातील हवा प्रदूषित : पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार
म्हापसा : येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आवारात हानिकारक रसायनसदृश वस्तूंना आग लावल्यामुळे लोकांना श्वासोच्छवासाची समस्या निर्माण झाली. या प्रकरणी स्थानिक नगरसेवक विकास आरोलकर यांनी म्हापसा पोलीस तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे.
ही घटना बुधवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. कामरखाजन, आकय, पेडे, शेट्येवाडा परिसरातील अंदाजे २ ते ३ किलोमिटर अंतरावरील लोकांना या प्रदूषणाचा त्रास जाणवला. हवा प्रदूषित झाल्याची तसेच दुर्गंधी येत असल्याची माहिती म्हापसा पोलीस तसेच अग्निशमन दलाला मिळताच पोलीस आणि म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बऱ्याच शोध मोहिमेनंतर हा दुर्गंधीयुक्त धूर म्हापसा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून येत असल्याचे आढळून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तिथे कचऱ्याला लावलेली आग पाण्याचा फवारा मारून विझवली.
दरम्यान, या घटनेप्रकरणी नगरसेवक विकास आरोलकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. एकंदरीत या परिस्थितीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. डोळ्यांना जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या अनेक समस्या जाणवू लागल्या. या घटनेमुळे आपल्या प्रभागात राहणाऱ्या लोकांकडून त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि परिसरातील रहिवाशांचे आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही आरोलकर यांनी केली आहे.
प्रकल्प अधिकाऱ्याची पोलिसांकडून चौकशी
या आगीबाबत नगरसेवक तारक आरोलकर यांनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला जाब विचारला. कामगारांनी टाकाऊ वस्तू तसेच प्लास्टिक पाईपच्या कचऱ्याला आग लावली होती. त्यामुळे धूर निर्माण होऊन हवा प्रदूषण झाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, वरील वस्तू जाळल्याचा हा प्रकार नसून रसायन जाळले गेल्याचा आरोप नगरसेवक आरोलकर व रहिवाशांनी केला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्याला सोडण्यात आले.