कतरन

‘या वयात वेगळे व्हायचे?’ असा प्रश्न माझ्या मनात आला लघुपट बघताना पण पुढच्याच सेकंदाला मी विचारात पडले. वास्तविक, वेगळे होण्यासाठी वयाचे बंधन असावे असा काही नियम नाही ना?

Story: आवडलेलं |
8 hours ago
कतरन

नवरा-बायकोची भांडणे... नाही नाही, त्यांना भांडणे म्हणत नाहीत, मतभेद म्हणतात. म्हणजे लहानपणी जेव्हा आईबाबांना मी ‘भांडू नका’ असे सांगायचे तेव्हा तेच मला सांगायचे... म्हणायचे, “छे! ही काही भांडणे नाहीत काही! हे नुसते मतभेद आहेत आमचे.” खरेतर तेव्हा मला मतभेद या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता. मला वाटायचं आम्हा मुलामुलींची होतात ती भांडणे आणि नवरा-बायकोत होतात त्या भांडणाचे नाव मतभेद! तर हे नवरा-बायकोतले मतभेद म्हणजे विनोद, खुसखुशीत लेख, रंगवून रंगवून सांगण्याचे किस्से या सगळ्यासाठी मोठे खाद्यच! फार वर्षांपूर्वी झी मराठीवर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ नावाची एक मालिका लागायची. नवरा-बायको असल्याचे नाटक करणारे दोघेजण एकमेकांशी खूपच गोडीगुलाबीत असतात. सुरुवातीला ठीक आहे, पण लग्नाला बरेच दिवस होऊनसुद्धा हे भांडत कसे नाहीत? असा प्रश्न त्यांच्या घरच्यांना पडतो. मग त्यांचे लग्न खरे आहे हे पटवून देण्यासाठी ते खोटे भांडणदेखील करतात. त्यांचे भांडण झाल्यावर घरच्यांचा जीव भांड्यात पडतो, की चला! यांचे सगळे ठीक आहे म्हणायचे! तर ही नवरा-बायकोची भांडणे इतकी नैसर्गिक आणि तितकीच गरजेची असतात, की ती नसतील तर चुकल्या चुकल्यासारखे व्हावे. 

असे असले तरीही या भांडणांची किंवा मतभेदांची एक पुसट रेषा असते. तिच्या या बाजूला गेले तर मतभेद विकोपाला जातात आणि त्यातून दुरावा येतो. रेषेच्या दुसऱ्या बाजूला अजिबात मतभेद नसतात, पण ते काही नात्यातल्या गोडव्यामुळे नव्हे तर संवादाच्याच अभावामुळे! म्हणजे इथेही दुरावा अटळच. म्हणजे खरेतर ही भांडणे म्हणजे नाते जिवंत असल्याचे एक महत्त्वाचे लक्षणच. इथे तिथे न डळमळता, ही सीमारेषा सांभाळत संसाराची गाडी चालवणे हे कसरतीचे काम. लग्न करण्यासाठी फार काही लागत नाही पण टिकवण्यासाठी खूप कष्ट लागतात, काम लागते... हेच ते काम असावे.

कधीतरी मात्र या कसरतीचा कंटाळा येऊ शकतो. गाडीचे चाक जरा रेषा ओलांडून जाऊ शकते. अशावेळी कोणतेही फुटकळ कारण पुरते भांडायला. त्या कारणाचे एक निमित्त, मूळ मुद्दा वेगळाच असतो. खरे भांडणाचे कारण ते नसतेच. वेळीच सावरले नाही तर गाडी रेषेच्या त्या बाजूला जायला फारसा वेळ लागत नाही. गंमत म्हणजे, हे सगळे तिसऱ्या व्यक्तीला समजत असते पण त्या जोडप्याला समजत नसते. सहसा रेषेच्या विकोपाच्या भांडणाच्या भागात तरुण जोडपी जातात. प्रगल्भ जोडपी अशा विकोपाला पोहचत नाहीत. ते रेषेच्या निर्विकार बाजूला जाणे पसंत करतात. 

‘कतरन’ हा या विषयावरचा अतिशय सुंदर लघुपट. या लघुपटात मात्र एक वयस्कर जोडपे अगदी टोकाचे भांडण करत असतात. भांडणाचे कारण माहीत नाही कारण त्याचे महत्त्वच नाही. पण हे वेगळेपण आपल्याला लक्षात येते कारण हे जोडपे वादावादीला कंटाळून वेगळे व्हायला बघत असते. ‘या वयात वेगळे व्हायचे?’ असा प्रश्न माझ्या मनात आला लघुपट बघताना पण पुढच्याच सेकंदाला मी विचारात पडले. वास्तविक, वेगळे होण्यासाठी वयाचे बंधन असावे असा काही नियम नाही ना? नसेल पटत, प्रयत्न करूनही गाडीची चाके समांतर चालतच नसतील तर रेषा कशी पाळणार? असे असेल तर कोणत्याही वयात वेगळे होऊन स्वतंत्र राहावे! पण इथे प्रश्न तो नव्हता. खरेतर हे रेषा वगैरेचे तत्त्वज्ञान काही माझे स्वतःचे नाही. हा लघुपट बघतानाच जाणवले हे सगळे. यात दोन महत्त्वाचे बिंदू आहेत. वेगळे व्हायचे आहे हे मनात पक्के ठरवून इतर काहीही आणि कुणाचेही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसलेल्या त्या दोघांना जेव्हा कळते की हो, आपण खरेच वेगळे होऊ शकतो तेव्हा ते एक क्षण स्तब्ध होतात. हा पहिला बिंदू, या बिंदूवर आपल्याला समजते की गाडी रेषेवरून फक्त सरकली आहे. बाकी चाके वगैरे ठीकच आहेत. 

लघुपटाचा दुसरा बिंदू म्हणजे हीच गोष्ट जेव्हा त्या दोघांना समजते. त्याबद्दल मात्र मी अधिक लिहिणार नाही कारण ती लघुपट बघून अनुभवण्यासारखीच आहे. लांबलचक संवाद, चर्चा आणि मुख्य म्हणजे निवेदन याशिवाय केवळ प्रसंगांतून साधलेले हे दोन्ही बिंदू लघुपट अधिक उंचीवर नेऊन ठेवतात. स्पष्ट काही न सांगूनसुद्धा या दोन बिंदूंमुळे आणि लघुपटाच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या दृश्यामुळे आपल्याला न सांगितलेले सगळे समजते. अवघ्या चौदा मिनिटांत हे सगळे पोहचवायचे काम म्हणजे दिग्दर्शकाची कमालच आणि पियूष मिश्रा आणि अल्का अमीन यांचा अभिनयही तितकाच मार्मिक आहे. सगळ्याच बाजूने चांगला असलेला असा लघुपट अनेक दिवसांनी पाहण्यात आला आणि असे वेगवेगळे पैलू स्पष्ट होत गेले. एखाद्या कलाकृतीचा परिणाम किती सखोल असतो, नाही?


मुग्धा मणेरीकर, 
फोंडा