रेल्वेखाली सापडल्याने गमावला प्राण
मडगाव : येथील रहिवासी रामानंद रायकर यांचा कारवार येथील रेल्वेस्थानकावर रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. ते पत्नीसमवेत केरळ येथील शबरीमाला मंदिरात देवदर्शनासाठी निघालेले असताना गुरुवार, १३ रोजी हा अपघात घडला.
रामानंद रायकर हे पत्नीसह देवदर्शनासाठी केरळ येथे रेल्वेद्वारे निघाले होते. दि. १३ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्यास सुमारास त्यांची रेल्वे कारवार येथील स्थानकावर थांबलेली होती. त्यावेळी रायकर पाण्याची बाटली आणण्यासाठी रेल्वेतून खाली उतरले. पाण्याची बाटली घेऊन परत रेल्वेत चढण्यासाठी ते आले असता रेल्वे सुरू झाली. त्यांनी रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न केला असता ते खाली पडले व रेल्वेखाली सापडले. यातच त्यांचा मृत्यू झाला. कारवार रेल्वे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून याप्रकरणी नोंद केली. रायकर हे सध्या मडगावातील पांडवा कपेलनजीक वास्तव्यास होते. त्यांचा टेम्पो ट्रॅव्हलर्सचा व्यवसाय होता. त्यांच्या पार्थिवावर मडगावात अंत्यसंस्कार केले जाणार असून त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.