महिला दिन

“नको. त्यांच्यासाठी पार्सल आणू आपण. आज काय तो जागतिक महिला दिन आहे म्हणे म्हणून तुला पार्टी देऊया म्हटलं.”

Story: कथा |
5 hours ago
महिला दिन

मनोहरराव महाविद्यालयात प्राध्यापक होते. महिला दिनानिमित्त महाविद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर त्यांनी स्त्रीशिक्षणाचे महत्त्व, स्त्रीपुरुष समानता यावर भलेमोठे भाषण दिले. त्यांच्या भाषणासाठी भरपूर टाळ्या पडल्या. आज ते भलतेच खुषीत होते. 

घरी पत्नीने, मानसीवैनींनीही त्यांच्या आवडीचा स्वैंपाक केला होता. यथेच्छ जेवून त्यांनी दुपारी मस्त वामकुक्षी घेतली तोवर मानसीवैनी मागचं आवरत होत्या. मनोहरराव उठले तसं मानसीवैनींनी त्यांना चहा करून दिला. चहा पिता पिता त्यांनी आज कसं भाषण केलं व त्यांची कशी वाहवा झाली याबद्दल मानसीवैनींना सांगितल. 

त्याच खुषीत मग ते मानसीवैनींना म्हणाले, “चल आज आपण बाहेर जाऊ जेवायला.” कितीक महिन्यांनी असं बाहेर जेवायला जायला मिळणार या विचाराने मानसीवैनी खूष झाल्या. 

सामाईक व्हरांड्यात बाजूच्या आजीशी गप्पा मारता मारता त्यांनी आजीला आम्ही फिरायला जाणार आहोत असं सांगितलं नि मग आजी मात्र घरात एकट्याच रहाणार याचं त्यांना वाईटही वाटलं. महिला दिन तर आजींचाही नाही का! मग आजींनाही सोबत घेऊन गेलो तर! असा रास्तसा विचार त्यांच्या डोक्यात आला.

घरात येत त्यांनी अहोंना विचारलं, “अहो ऐका नं. बाजूच्या आजींना घेऊन जाऊया का? तेवढंच फिरणं होईल त्यांचं.”

वर्तमानपत्रातलं डोकंही बाहेर न काढता मनोहरराव म्हणाले, “नssको. त्यांच्यासाठी पार्सल आणू आपण. आज काय तो जागतिक महिला दिन आहे म्हणे म्हणून तुला पार्टी देऊया म्हंटलं, तर तुझं सुरू हिला घेऊन जाऊ न् तिला घेऊन जाऊ.”

मनोहरावांनी नेहमीप्रमाणेच मानसीवैनींच्या सूचनेला केराची टोपली दाखवली. मानसीवैनींनी नेहमीसारखंच ‘जाऊ दे’ म्हंटलं. त्या छान गुलाबी रंगाची साडी नेसल्या, तयार झाल्या.

मनोहरराव व मानसीवैनी दोघं मोठ्या उपहारगृहात गेले. काय घ्यायचं वगैरे मनोहररावांनी निवडलं नि तशी ऑर्डर दिली. निघताना मानसीवैनींनी आजीसाठी पार्सल घेण्याचा विषय काढला तर मनोहरराव म्हणाले, “किती महागडं हॉटेल हे. तुला म्हणून आणलं. त्या म्हातारीचा लेक आला की नेतो का तुला हॉटेलात का आपल्यासाठी भेटवस्तू आणतो! जगाचा कैवार घेणं सोड आता आणि थोडं रॅशनल वाग. नाहीतरी तुम्हा बायकांचा मेंदू गुडघ्यात. कुणी उगीच का म्हणून ठेवलय!” त्यांच्या या बोलण्यावर मानसीवैनींचा मुडच गेला पण त्या नेहमीप्रमाणेच गप्प राहिल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मनोहरराव कार्यालयात निघून गेले. घरात मानसीवैनी एकट्या. त्यांनी बारीक शेवयांची खीर केली, केशर, काजूबदाम टाकून न दोन वाट्या भरून बाजूच्या आजीकडे गेल्या. आजीने त्यांचं हसत हसत स्वागत केलं. पंचेचाळीसी उलटलेल्या मानसीवैनी पण आजी समोर दिसली की त्यांना आपसूक लहान झाल्यासारखं वाटायचं. दोघीजणी आजीच्या टेरेसवर खीर खात बसल्या. ऊन ऊन खीर खाता खाताना त्यांची गप्पाष्टकं रंगली नेहमीसारखीच. 

आजीच्या त्याच त्याच गप्पा मानसीवैनी तेवढ्याच तन्मयतेने पुन्हा पुन्हा ऐकायच्या. आजी हे तुम्ही आधी सांगितलंय असं अजिबात न म्हणता. कधी आजीच्या बालपणाविषयी विचारायच्या. आजीचं कोकणातलं माहेर, तिथलं एकत्र कुटुंब, भाऊबहिणी, चुलत्या, चुलते... सारा गोतावळा, घरातील स्त्रियांच्या कहाण्या त्या मन लावून ऐकायच्या. आजीला एकच मुलगा. तो नोकरीनिमित्त परगावी रहायचा त्यामुळे एकाकी पडलेल्या आजीला मानसीताईंचाच काय तो विरंगुळाहोता. आजींकडून निघताना आजीने त्यांना आबोलीचा गजरा दिला.

“आजी हा कधी आणलात?” मानसीवेनींनी विचारलं.

“अगं, खालचे मुधोळकरभाऊ, त्यांनी म्हणे बिल्डींगीतल्या प्रत्येकीसाठी गजरे आणले नि बच्चेकंपनींकडे वाटायला दिले. मुलांनी माझ्या दाराची बेल दाबली. मला इत्थंभूत माहिती पुरवून गजरा देऊ केला तर मी म्हंटलं, मला घ्यायचा नाही रे. मी सवाष्ण नाही ना. तसं, मुलं म्हणाली, असं काही नसतं आजी. प्रत्येकीला द्यायचाच आहे आज गजरा. काकांना आम्ही प्रॉमिस केलंय तसं, तू नव्हतीस म्हणून तुझा गजरा माझ्याकडे देऊन गेले. माझाही माळशील नं तू?”

मानसीवैनींना आजीत आपली मावशीच दिसली. आईविना पोरक्या मानसीला तिच्या मावशीने लहानाचं मोठं केलं होतं. मावशीलाही फुला-गजऱ्यांची, नटाथटायची किती हौस पण तिच्या यजमानांचे देहावसान झाल्यानंतर मावशीला कधी मनासारखं नटताच नव्हतं आलं. जणू तिची सर्व हौसमौज तिच्या यजमानांसोबतच कायमची निघून गेली होती. 

आताही मावशीच आली मानसीताईंच्या डोळ्यांसमोर नि त्या म्हणाल्या, “नको आजी. माझा मी माळते आणि तुमचा तुम्हीच माळा. खरंच छान दिसाल. आजी , अहो जगायला शिका नव्याने.  त्याच त्याच जुन्या रुढींत अडकून नका राहू. सतीची प्रथा, केशवपन कसं मागे पडलं, झुगारलं गेलं तसंच काही अनिष्ट रुढी अजूनही चालू असतील तर त्या आपण स्त्रियांनीच मोडीत काढायला हव्यात. कुंकू, टिकली, फुलं, गजरे, दागदागिने, वस्त्रे ही तर आपली आवड. ती आपण जपलीच पाहिजे.” असं म्हणतं त्यांनी आजीच्या वेणीत गजरा माळला.

गजरा माळलेल्या आजींचा चेहरा कितीक दिवसांची तहान भागल्यासारखा समाधानी व आनंदी दिसत होता.


गीता गरुड