
वीकेंडला काहीतरी खास खाण्याची इच्छा असेल, तर तुम्ही 'चिकन चंगेजी' नक्की ट्राय करू शकता. ही डिश चवीला अप्रतिम लागते आणि बनवायलाही सोपी आहे. चिकन चंगेजी बनवताना मसाल्यांच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष द्यावे लागते, कारण मसाल्यांचे प्रमाण चुकल्यास त्याची खरी चव निघून जाऊ शकते. जर तुम्हाला मांसाहारामध्ये दूध किंवा दही आवडत नसेल, तर तुम्ही ते वगळू शकता.
साहित्य:
७५० ग्रॅम चिकन
३०० मिली दूध
२५० मिली टोमॅटो प्युरी
८० ग्रॅम फ्रेश क्रीम
३ मध्यम कांदे (बारीक चिरलेले)
५० ग्रॅम काजू (भाजलेले)
१/३ कप मखाणे (Lotus Seeds)
१ उकडलेले अंडे (सजावटीसाठी)
३० ग्रॅम तूप
१/२ मोठा चमचा आले पेस्ट
१/२ मोठा चमचा लसूण पेस्ट
१ मोठा चमचा धणे पावडर
१/२ मोठा चमचा लाल तिखट
१/४ मोठा चमचा गरम मसाला पावडर
१/२ मोठा चमचा चाट मसाला
१/२ मोठा चमचा कसुरी मेथी
२ मोठे चमचे लिंबाचा रस
२ हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
१ इंच आले (बारीक चिरलेले)
चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी
कृती: सर्वप्रथम चिकनचे तुकडे तुपात व्यवस्थित भाजून बाजूला काढून ठेवावेत. त्यानंतर त्याच तुपात कांदा सोनेरी रंगावर परतून बाजूला काढावा आणि मखाणेही भाजून घ्यावेत. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात दूध, आले-लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी, धणे पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला टाकून मध्यम आचेवर १० मिनिटे शिजवावे. याच दरम्यान भाजलेले काजू आणि तळलेला कांदा थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावा. ही तयार पेस्ट पॅनमध्ये टाकून त्यात चाट मसाला व मीठ घालून ७ मिनिटे शिजवून घ्यावे. त्यानंतर ग्रेव्हीमध्ये फ्रेश क्रीम, कसुरी मेथी, हिरव्या मिरच्या, आले आणि लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण एकजीव करावे. आता भाजलेले चिकन या ग्रेव्हीमध्ये टाकून ६-७ मिनिटे चांगले शिजवावे. शेवटी तयार झालेल्या चिकन चंगेजीवर हिरवी मिरची, आले, मखाणे आणि उकडलेल्या अंड्याचे काप ठेवून गरमागरम सर्व्ह करावे.

- शिल्पा रामचंद्र
मांद्रे