‘मौनवाटा’ हा केवळ ललित लेखसंग्रह नसून, जीवन अधिक अर्थपूर्ण, सजग आणि समृद्ध करण्याची दिशा दाखवणारे संवेदनशील लेखन आहे.

गिरिजा मुरगोडी यांचा ‘मौनवाटा’ हा ललित लेखसंग्रह म्हणजे जीवनाच्या सूक्ष्म अनुभवांची, आठवणींची आणि संवेदनांची अत्यंत नाजूक व कलात्मक गुंफण आहे. हा संग्रह वाचताना जीवनातील न बोललेले क्षण, मनाच्या आत दडलेले संवाद आणि मौनातून उमटणाऱ्या भावना वाचकाच्या मनात हळुवारपणे उतरतात. या संग्रहाची सुरुवात लेखिकेने अत्यंत अर्थपूर्ण आणि अंतर्मुख करणाऱ्या ओळींनी केलेली आहे
कधी कधी आपण
फक्त आपणासवे असावे
आपल्याच मनासवे
आतल्या कप्यातले बोलावे.
या ओळी केवळ पमनोगत ठरत नाहीत, तर संपूर्ण संग्रहाचा आत्माच स्पष्ट करतात. त्यानंतर वाचकाला असा अनुभव येतो की, जणू फुलांचा हार गुंफताना जशी निवडक आणि सुगंधी फुले अलगद वेचून घेतली जातात आणि हार तयार होत असताना मन नकळत रमत जाते, तसाच अनुभव या संग्रहातील लेख वाचताना येतो. प्रत्येक लेख स्वतंत्र असला, तरी भावनिक पातळीवर तो एकमेकांशी घट्ट जोडलेला आहे.
या पुस्तकातील लेखनाची भाषा स्वच्छ, सुबोध आणि सुसंस्कृत आहे. लेखिका आपल्या अनुभवांना केवळ शब्दरूप देऊन थांबत नाहीत, तर त्या अनुभवांमागील विचारप्रक्रिया, भावना आणि जीवनदृष्टीही वाचकापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे हे लेखन वाचकाला अंतर्मुख करते, स्वतःशी संवाद साधायला लावते आणि जीवनाकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा देते.
बालपणीच्या आठवणी, बालमनातील कोपरे आणि त्यातून घडत गेलेला माणूस—हा संपूर्ण प्रवास लेखिकेने अत्यंत सहज, प्रांजळ आणि आत्मीयतेने उलगडला आहे. माणसाच्या संवेदनांची पाळेमुळे बालपणातच रुजलेली असतात, हे या लेखनातून प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या लेखनात अखंड वाचन, मनन आणि चिंतनाची परंपरा ठळकपणे दिसून येते, जी लेखनाला अधिक खोल आणि अर्थपूर्ण बनवते.
या संग्रहात सामाजिक विषय, नातेसंबंध, परंपरा आणि वेगवेगळ्या स्वभावांची माणसे यांचे सूक्ष्म आणि समतोल निरीक्षण आढळते. ‘बिटिया है विशेष’ हा लेख स्त्रीमनातील भावविश्व प्रभावीपणे मांडतो, तर ‘आपला-ची संवाद आपल्याशी’ हा लेख माणसाच्या सहनशील स्वभावाचा, अंतर्मुखतेचा आणि स्वतःशी चालणाऱ्या संवादाचा वेध घेतो. हे लेख वाचताना वाचक स्वतःच्या आयुष्याकडेही नव्याने पाहू लागतो.
कोजागिरी पौर्णिमेच्या आठवणी, माहेर आणि गोव्याशी निगडित अनुभव, तसेच आयुष्यातील बदल—या साऱ्या स्मृती लेखिकेने अत्यंत जिवंतपणे शब्दांत उतरवल्या आहेत. ‘क्षमस्व’ या लेखातील“स्वतःच्या मनाच्या स्वास्थ्यासाठी क्षमस्व होणे आवश्यक आहे” ही ओळ केवळ वाक्य न राहता, जीवन जगण्याचा एक महत्त्वाचा तत्त्वज्ञानाचा विचार म्हणून समोर येते.
या संग्रहात आलेल्या कविता, विविध लेखकांच्या लेखनातील विचारांची उदाहरणे आणि त्याचबरोबर लेखिकेचे स्वतःचे चिंतन यांची सांगड अतिशय समर्पक आणि परिणामकारक रीतीने घातलेली आहे. त्यामुळे लेखन अधिक प्रवाही, समृद्ध आणि वाचनीय बनते.
लेखिकेच्या प्रवासाविषयी लिहिताना, त्या ज्या-ज्या ठिकाणी राहिल्या, तिथल्या माणसांविषयी आणि तिथे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी त्या विनोदी शैलीत लिहितात. ‘भीती’ या विषयावर लिहिताना त्या , त्या क्षणातील अनुभव अत्यंत नेमकेपणाने मांडतात, ज्यामुळे तो अनुभव वाचकाच्या मनात ठसतो.
शेवटी, माणसाला न आवडणारा, कधीही येऊ नये असा वाटणारा, पण कोणालाही न चुकलेला तो अंतिम क्षण—त्या शेवटच्या टप्प्याविषयी लेखिका म्हणतात—
श्वास आहे तोवरी
सर्व बंध रेशमी
क्षण एकच येई परि
न उरले आपुले काही...
या ओळींमधून जीवनाची क्षणभंगुरता, वास्तवाचे भान आणि स्वीकारभाव प्रभावीपणे व्यक्त होतो. त्या क्षणी लेखिकेचे मन काय सांगते, हे शब्दांत रेखाटताना आणखी एक मनाचा कोपरा उलगडताना दिसतो.
एकूणच ‘मौनवाटा’ हा केवळ ललित लेखसंग्रह नसून, जीवन अधिक अर्थपूर्ण, सजग आणि समृद्ध करण्याची दिशा दाखवणारे संवेदनशील लेखन आहे.
एक लेखाच्या शेवटी लेखिका लिहितात “भले जमेची जीवी स्मरून” आपले आणि इतरांचे जगणे सुखकर व सुकर करण्याची प्रेरणा देणारा हा संग्रह प्रत्येक संवेदनशील वाचकाने आवर्जून वाचावा, असा आहे.

- सौ.स्नेहा बाबी मळीक