​मालन महिना आणि धालोचा मांड गोमंतकीय लोकसंस्कृतीचा जागर

गोव्यातील कष्टकरी महिलांच्या आनंदाचा उत्सव म्हणजे 'मालन' महिना. निसर्गपूजा, भक्ती आणि 'धालो'च्या स्वरांनी सजलेल्या या पवित्र लोकसंस्कृतीचा आणि परंपरेचा हृदयस्पर्शी उलगडा करणारा हा विशेष लेख.

Story: भरजरी |
03rd January, 11:29 pm
​मालन महिना आणि धालोचा मांड  गोमंतकीय लोकसंस्कृतीचा जागर

कार्तिक महिना सुगी घेऊन यायचा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेतातल्या खळ्यावर सोन्याच्या राशी उभ्या राहायच्या. या सोन्याच्या राशी म्हणजे वर्षभराचे कष्ट आणि त्या कष्टांचे चीज असायचे. घरातील प्रत्येक सदस्य कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यात अत्यंत परिश्रम घेत असे. पण खळ्यातील मळणी होऊन भाताची सोन्याची रास बघितली की साऱ्या कष्टांची सांगता झाल्यासारखे वाटायचे. आता घरातील स्त्रियांच्या हाताला जरा आराम मिळायचा. रात्र-रात्र जागून केलेली मळणी संपलेली असायची. घरातील अन्नधान्याच्या राशी आनंद देत असत आणि अशातच यायचा पौष महिना. या कष्टमय महिन्यांनंतर घरात आलेल्या धनधान्याच्या राशी आणि त्यानंतर येणारा पौष महिना म्हणजेच गोव्यातील स्त्रियांचा 'मालन महिना'. आपला आनंद व्यक्त करण्याचा महिना; जरा स्वतःसाठी निवांत जगण्याचा महिना. वनदेवीच्या जागरात तल्लीन होऊन 'धालो' खेळण्याचा महिना.

​गोमंतकीय लोकसंस्कृती ही निसर्गपूजक आहे. निसर्गातील प्रत्येक घटक इथल्या संस्कृतीत देव मानला जातो. गावोगावच्या सीमेवर इथे राखणदार आहे, जो त्या गावचा आणि निसर्गसंपदेचा रक्षक मानला जातो. गावागावात वनदेवी आहे, जिची कृपा वेळी-अवेळी रानावनात जाऊन काबाडकष्ट करणाऱ्या मालनीवर नेहमी असते. वनदेवीच्या आशीर्वादामुळेच तिच्यामध्ये कष्ट करण्याचे सामर्थ्य आणि तिच्या कपाळाला अखंड कुंकू प्राप्त होतो, अशी घरणीबाईंची श्रद्धा आहे. म्हणूनच त्या गावातील प्रत्येक घरणीबाई या मालन महिन्याची आतुरतेने वाट बघते. वर्षभर धाल्याच्या पुनवेची वाट बघत असते आणि शेवटी ती रात्र येते, ज्या रात्री स्त्रिया धाल्यासाठी पात धरतात. पौष महिन्याच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंतच्या या काळामध्ये आपापल्या सोयीनुसार गोव्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये स्त्रिया धालो खेळतात.

​धालो आणि त्याचा मांड ही एक पवित्र रचना आहे. गावातील एक विशिष्ट आणि पवित्र ठिकाण म्हणजे धाल्याचा मांड असतो. त्या ठिकाणी कार्तिक महिन्यापासूनच पौष महिन्यात येणाऱ्या धाल्याची लगबग सुरू असते. गावची गावकरीण इतर स्त्रियांच्या मदतीने पौष महिन्यात धालाच्या मांडावर सुबक तुळशी वृंदावन बांधते. मांडाभोवती सुंदर खळे तयार करते, जिथे येणाऱ्या मालन महिन्यात ती खेळ खेळणार असते.

​ज्या रात्री स्त्रिया धाल्याच्या पातीला उभ्या राहणार असतात, त्या रात्री सर्वजण मांडावर जमतात. अगोदरच बांधलेले तुळशी वृंदावन आणि त्यामध्ये विराजमान झालेली भरगच्च पानांची तुळशी माता! त्या तुळशी मातेच्या पूजनाने धाल्याला सुरुवात होते. सर्वप्रथम गावची गावकरीण गाऱ्हाणे घालते:

​'हे वनदेवी माते, आम्ही आज सर्व स्त्रिया आणि मुली पुढील पाच दिवस तुझ्या जागरणाचा धालो खेळणार आहोत. हा धालो खेळताना पाचही दिवस आणि येणारे वर्षभर तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहू दे. आज आरंभ करत असलेला धाल्याचा खेळ आम्हास आनंदाने खेळता येऊ दे. यादरम्यान इथल्या पोरी-बाळींना, सवाष्णींना कसलीही खाटकुट होऊ नये याची काळजी तू घे आणि तुझा आशीर्वाद आम्हाला दे.'

​गाऱ्हाणे घालून झाल्यावर गावकरीण तुळशी मातेची ओटी भरते. धालो सुरू झाल्याचा नारळ फोडते. फोडलेल्या नारळाच्या ओल्या खोबऱ्याचे तुकडे (शेरनी) करून उपस्थित सर्वांना वाटले जातात.

​गाऱ्हाणे घातल्यानंतर जमलेल्या स्त्रियांचे दोन भाग होतात आणि त्या दोन भागांच्या दोन रांगा होतात. या रांगा म्हणजे 'पाती'. यांपैकी स्त्रियांची एक रांग धालो सुरू करणारी असते, तर दुसरी रांग धाल्याच्या पुढची समर्पक ओळ गाणारी असते. इथे एक नियम महत्त्वाचा की, पहिल्या दिवशी मालन ज्या रांगेत उभी राहते, त्याच रांगेत तिने पुढच्या पाचही रात्री उभे राहिले पाहिजे. तिला इथे पात बदलण्याची मुभा नसते.

​पाती उभ्या राहताच पहिल्या पातीतील मालन गाऊ लागते:

मालन म्हयना, मालन म्हयना

मालनी पुनवे आनंद झाला गे

​'मालन महिना सुरू झाला आणि या मालन महिन्याच्या पुनवेला आम्हा सगळ्यांना आनंद झाला', अशा अर्थाची ओळ म्हटल्यानंतर दुसऱ्या पातीची महिला गाऊ लागते:

कार्तिक महिन्यात, कार्तिक महिन्यात

तुळशी जागो बेणा गे, तुळशी माती खणा गे

तुळस अशी घाला गे

​आज जरी मालन महिना सुरू झाला, तरी आपण धाल्याची सुरुवात ही कार्तिक महिन्यापासूनच केली आहे. कार्तिक महिन्यातच आपण मांडावर तुळस लावण्यासाठी जागा निवडली आणि तिथे मातीपासून सुंदर अशी तुळस बांधून घेतली.

​मालन म्हयना, मालन म्हयना...

कार्तिक महिन्यात, कार्तिक महिन्यात

तुळशी शेण काढा गे, तुळशी पेट काढा गे

तुळशी रोप लाया गे

​अशा प्रकारे कार्तिक महिन्यात तुळशी वृंदावन बांधले, त्याला सारवले आणि पेठ देऊन ती तुळस अजून सुबक व रेखीव केली. वनदेवीची प्रतिमा म्हणून त्यामध्ये तुळशीचे रोप लावले. गेल्या दोन महिन्यांत तुळस रुपी आपली वनदेवी माता भरभरून वाढली आणि आज तिचा धालो साजरा करण्याचा क्षण जवळ आला. म्हणून आपण या मालन महिन्यात आनंद व्यक्त करूया.

​मालन म्हयना, मालन म्हयना...

कार्तिक महिन्यात, कार्तिक महिन्यात

तुळशी शेण काढा गे, तुळशी नारळ फोडा गे

​हा आनंद धालो खेळून व्यक्त करतात. मांगल्याचे प्रतीक असलेले श्रीफळ म्हणजेच नारळ फोडून धाल्याची सुरुवात करताना पहिल्या पातीची मालन गाऊ लागते:

फोडिल नारळ केल्यो शेरनी

वाटील्यो तुळशी वृंदावनी गे

​आणि दुसऱ्या पातीची मालन गाऊ लागते:

वाटले झाल्या बरं झाला, सखिया साद घाला ग

पात धरून खेळा गे, भौमान करा गे

​नारळाच्या शेरनी म्हणजे खोबऱ्याचे तुकडे सर्वांना वाटून झाले की, आपण आता पात धरून खेळूया आणि देवीचा बहुमान करूया. ही आराधना करताना सर्वात अगोदर आपल्या ग्रामदैवाचे आवाहन करताना मालन गाऊ लागते:

पाऊस पडे पाऊस पडे, रतांबे थेंबे रतांबे थेंबे

महादेव देवाच्या देवळात घालून, रत्नाचे खामे रत्नाचे खामे

​देवाच्या कृपेने पावसाचे मोठे थेंब पडले, जणू काही रतांब्यासारखे थेंब पडत आहेत. या पावसामुळे गावात एवढी सुबत्ता आली की, ज्यामुळे आमच्या ग्रामदेवतेच्या महादेवाच्या देवळाला आम्ही रत्नाचे खांब लावू शकलो. ही सुबत्ता मोगऱ्याच्या कळ्यांच्या सुगंधासारखी गावात पसरली, ज्यामुळे महादेवाच्या देवळाला सोन्याचे नळे घालण्याची समृद्धी गावाला लाभली.

​कळे बाई कडे गे, मोगऱ्याचे कळे

महादेव देवाच्या देवळात घालू, सोन्याचे नळे

​अशी असीम समृद्धीची कल्पना करत धाल्याची गीते पुढे जात राहतात. आपल्या कुलदेवतेच्या आणि ग्रामदेवतेच्या मंदिराची व पूजेची सुंदर कल्पना मांडत सर्व देवांना आवाहन केले जाते.

​पहिल्या वहिल्या डोंगरात, फुल फुलला पळसाचा

सई पळसाचा

महादेव देवाचा देऊळ बंदला, कळसाचा सही कळसाचा

​आणि शेवटी ही सुबत्ता शेतावर येऊन थांबते. गावालगतचे शेत योग्य आखणीने लावले होते. शेताची उत्कृष्ट मशागत केल्याने तिथे चांगले धनधान्य पिकले. कुलदेव व ग्रामदेवाच्या कृपेने गावात समृद्धी नांदली आणि म्हणून साखरेचे म्हणजेच गोडाधोडाचे 'गावजेवण' करण्याचे सौख्य आम्हा सर्वांना प्राप्त झाले.

​वैला वैला शेत सये, आखणीचा सय आखणीचा

महादेव देवाक जेवण केला, साखरेचा असे साखरेचा

​अशा प्रकारे आतापर्यंत जो आनंद व्यक्त झाला, तो म्हणजे वनदेवीची कृपा, ग्रामदेवाची कृपा आणि कुलदेवाची कृपा! अशी कल्पना करत मालन सर्व स्त्रियांना आवाहन करते आणि म्हणते की, आता वेळ आहे धालो खेळण्याची. असीम सौंदर्य आणि नवनिर्मितीचे वरदान लाभलेल्या सर्व 'रंभां'नो, आता आपण एकत्र येऊया आणि देवीप्रति कृतज्ञता व्यक्त करत धालो खेळूया. असे गात धाल्याची पहिली रात्र रंगते.

​रंभा ह्यो वनावल्यो, हरिचो चेंडू तुम्ही ओपा गे

मासोर्ड्या गावच्या कनकानो, देवाच्या रंभानो

हरिचो चेंडू आमी ओपीन गे

​धालो म्हणजे फक्त एक नृत्य नव्हे, तर ती एक लोककला शृंखला आहे, ज्यामध्ये नृत्य, फुगड्या, नाट्य, गाऱ्हाणे आणि भावनांचा मेळ असतो. विशेष म्हणजे स्त्रियांच्या भावभावनांची गुंफण या पाच रात्रींत सामावलेली असते. पुढच्या भागात आपण त्याचा अधिक उलगडा करूया.


- गाैतमी चाेर्लेकर गावस