स्वार्थासाठी प्रेमाचे सोंग रचणाऱ्या क्रूर प्रवृत्तीची आणि त्यात होरपळणाऱ्या एका साध्या कष्टकरी स्त्रीची ही हृदयद्रावक कथा. पैशाच्या हव्यासापोटी नात्यांचा होणारा बाजार आणि नियतीचा खेळ.

जुनाट फळकुट... काठ्यांच्या आधारावर उभ्या काठ्या रोवून भिंतीच्या आणि छपराच्या जागी काळपट रंगाचं प्लास्टिक वापरून तिने आपला संसार गावाबाहेर उभारला होता.
फळकुटावर हिंदालियमची, स्टीलची भांडी नीट आडवी लावून ठेवलेली होती. जवळच्याच तळ्यातून पाणी घेऊन ती आपल्या घरवजा जागेत येऊन पोहोचली.
कळशी जाग्याला लावताना तिनं कोपऱ्यातील दोरीवर टांगलेल्या जुनाट फडक्याने हात-पाय टिपले.
"राधी, हायस का? जेवायला वाढ बिगीबिगी..." शंकऱ्या घरात शिरत म्हणाला.
"व्हय वाढते, जरा दमानं घ्या की..." तो लोखंडी खाटेवर बसलेला पाहून ती उद्गारली.
"तापानं कणकतोय जीव माझा.. कधीतरी आपल्या हातानं बी घेत चला की.. माज्या माघारी कसं व्हायाचं तुमचं? लगीन होऊन पाच वर्षं होत आली."
त्यावर तो काहीच बोलला नाही. तिच्या बडबडीतच त्याचं पान वाढलं. कांद्याचं तोंडी लावणं आणि कसल्याशा पाल्याची भाजी तिनं भाताबरोबर वाढली.
"तेलाच्या घाण्यावर हातभार लावाया जाते म्हणून एवढं..!" ती बरळत होती. शंकऱ्या न बोलता तोंडात एक-एक घास घालीत होता.
"कायतरी कामधंदा बघा तुम्ही बी! सारखं ईडी फुकीत फिरत असता ते!" तो काहीच बोलत नाही असं पाहून ती जरा तिटकाऱ्यानं उद्गारली.
"जादा बडबडलीस ना तर कुठंतरी जाऊन मारून घीन स्वतःला! मग कपाळ पांढरं झालं की बैस मग एकटीच हथं." तो रागातच घराबाहेर पडला.
"अवं, थांबा की जरा! सावकाश जावा. कुठंतरी पडाल अशानं." तिनं आतूनच आवाज दिला. तोपर्यंत तो दूरवर पोहोचला होता. ती एकटीच येऊन खाटेवर बसली. मागच्या आठवणींनी तिचं मन जळत होतं.
"राधी, माझं मोठालं घर हाय, जिमीन हाय, शेतीवाडी हाय. तुला जाम सुखात ठीवीन बघ म्या." शंकऱ्या तिला जवळ घेऊन प्रेमानं बोलत होता.
राधीही आनंदल्यागत झाली होती. प्रेमाच्या नादात फसून ती शंकऱ्यासोबत संसार करायला आली, पण सारी परिस्थिती डोळ्यासमोर येताच ती कोलमडल्यागत झाली.
"अहो! कुठाय तुमची शेतीवाडी नि घर?" राधीनं मोठ्या आवाजात विचारलं.
"जास्त बोलू नगं फुडं. हेच घर हाय आता तुझं. हीथंच दिस काढायचे हायेत." शंकऱ्या ठणकावून म्हणाला.
"मग मला खोटं का सांगितलं समदं?" राधी चिडून उद्गारली.
"तू यीवून खात्री का केली न्हाईस तवा? नि आता बोलतीस व्हय मला?" तो तिला प्रतिप्रश्न करत म्हणाला.
"तुझ्यावर माझं प्रेम बी नाय हाय. समजलीस, ते बी खोटं होतं." तो भकास हसत म्हणाला.
"तू तेलाच्या घाण्यावर काम कर्तीस. चार पैकं कमवतेस म्हणून मी लगीन केलं तुझ्यासंगट. कळलं काय? पैक्यासाठी काहीही!" तो मनातली गरळ ओकत भकासपणे हसू लागला.
ती गोंधळल्यासारखी झाली. "आपण सपशेल फसलो गेलोय. तवा आई-बाप सांगीत होते, प्रेमानं आंधळी होऊ नकोस. तेव्हा आपण त्यांनाच दूषणं लावली आणि स्वतःचं आयुष्य अशा स्वार्थी माणसाच्या स्वाधीन केलं."
सारं काही पुन्हा एकदा आठवल्याने तिचे डोळे डबडबले. ती बसल्या जागेवरून उठत कामाला जाण्याची तयारी करू लागली.
सारं जागच्या जाग्यावर नीट लावून, फळकुटाचं दार ओढून घेऊन ती बाहेर पडली. नऊवारी सांभाळत ती लगबगीनं पावलं टाकत तासाभरात गावात पोहोचली.
"आज उशीर झाला पुन्हा बाई! फार पूर्वीपास्नं नीट काम करत हुता म्हणून माफ करतोय तुम्हास. कामाला लागा. भरपूर तेल काडायचंय अजून." माणिकराव हेल काढत उद्गारले. ती न बोलता तेलाच्या घाण्यावर काम करू लागली.
'काम सोडते आता, मला संसार सांभाळायला द्या', असं दोन-तीन येळला तिनं सांगितलं होतं. पण तेनं लक्ष दिलं नाही. तिची दोन पोरं सुद्धा दगावली बाळंतपणात, कारण घाणा वडल्यानं. 'माझ्या जागेवर चार दिवस तुम्ही जा' असंही ती म्हणाली होती, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. हे सारं आठवून तिनं काम सांभाळतच डोळ्यांना पदर लावला.
विचारांच्या नादात राधी सैरभैर झाली होती. 'आपल्या माहेरी शेजारी राहत असलेल्या हणमाचा बी जीव होता आपल्यावर! बा सांगत होता त्या परमाणं केलं असतं तर! ही वेळ आली नसती आपल्यावर. बा सांगत होता पुन्हा एकदा विचार कर असं. आता काय उपयोग या साऱ्याचा विचार करून? जमेल तसं आयूक्श रेटायचं', असं मनाशी ठरवत ती आपल्या कामात दंग झाली.
इतक्यात एक जोडपं दुरून येताना दिसलं.
“तेल काढून हवं होतं. शेंगदाणे आनलेत, थांबतो तोवर." त्या जोडप्यातील बाई उद्गारली.
त्यांचं एकमेकांसोबत हसणं, खिदळणं, प्रेम राधीच्या लक्षात येत होतं. राधीचं अर्ध लक्ष कामावर तर अर्ध त्यांच्याकडे होतं.
त्या नादातच शेंगदाण्याचा डबा घेण्यासाठी ती खाली वाकली, त्यावेळेला अचानक तिचा पदर मशीनच्या लोखंडी रॉडमध्ये गुंडाळला गेला आणि ती जमिनीवर जोरात आदळली. त्या तडाख्याने तिच्या मेंदूला जबर मार बसला. जोराच्या आवाजामुळे माणिकराव धावतच तिथे पोहोचले. ते जोडपंही घाबरून उभं राहिलं, पण तोवर सारं संपलं होतं. राधीनं तिथंच मान टाकली होती. एक आयुष्य संपून गेलं होतं, क्षणाचाही विलंब न होता!
माणिकरावांनी निरोप पाठवून शंकऱ्याला बोलावून घेतलं. तोही या साऱ्या अचानक घडलेल्या घटनेनं गांगरल्यासारखा झाला होता. पण स्वतःला सावरत त्यानं तिचं निर्जीव शरीर घराजवळील जागेत आणून जाळलं. राधीच्या जाण्यानं शंकऱ्याला जराही फरक पडला नव्हता.
तिला जाऊन धा दिस होत आल्यावर तो काहीसा विचार करत घराबाहेर पडला.
"कमळी, तुला माझ्याशी लगीन लावायचं होतं नवं?" तो कमळीच्या खोली जवळ येत विचारू लागला.
"व्हय.. पार.. आता कसं काय शेक्य हाय?" तिनं प्रश्नार्थक चेहरा केला.
"राधी अचानक गेली, तवा..." तो हसतच तिच्याकडं पाहू लागला. त्याच्या मनात वेगळेच विचार थैमान घालीत होते.
'राधीही गेली, कमवणारी.. पण कमळी तर हाय, चार घरची धुणीभांडी करते, पैसा मिळवते. आपण लगीन केलं तर आपला बी खर्च भागवेल.'
"कसला विचार करता?" कमळीनं त्याच्या चेहऱ्याकडं पाहत विचारलं.
"तुझाच की! आणि कसला करणार?" तो जरा लाडात येतच म्हणाला.
कमळी विरघळली आणि बाशिंग बांधून त्याच्या घराचा उंबरा ओलांडला. तोही हसतच तिच्या मागोमाग आत शिरला. कमळीला आपण फसलो गेल्याची जाणीव होईपर्यंत, तो अजून एखादं नवीन सावज शोधणार होता; जे कमळी गेल्यानंतर पैसे कमावून त्याला पोसणार होतं... अगदी सहजपणे!

- गौरी भालचंद्र