सकारत-शोकारत

वेदनेला सजविण्याचे, तिचे उदात्तीकरण करून ती हलकी करण्याचे सामर्थ्य या गीतातून जाणवते. वेदना, क्लेशदायक घटनांचा फक्त शोकच करायचा नसतो, तर त्याचीही श्रद्धेने आरती गायची, दुःख हलके करायचे, अशीच धारणा लोकमनसाने बाळगलेली असावी.

Story: लोकरंग |
14th March, 11:32 pm
सकारत-शोकारत

​आ धी केलो--- आकार आधी क्यालो--- आकार

आणि मिगे क्यालो--- शिकार आणि मिगे क्यालो ---शिकार 

आणि मिगे रचिली--- धरतरी आणि मिगे रचिली--- धरतरी

आणि गायतरी शेणान आणि गायतरी शेणान 

गायतरी शेणान धरतरी आकारली...हो रामा


​फाल्गुन मासातील शिमगोत्सवाचे दिवस. गावागावांत ढोल-ताशांच्या निनादात पुरुषांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. होळीचा उत्साह, त्यानंतर कोठे सात तर कोठे नऊ दिवसांची धुळवड. मधल्या दिवसांत गावाच्या परंपरेप्रमाणे कोठे घोडेमोडणी, चोरोत्सव, रणमाले, करुल्यो असे वैविध्यपूर्ण प्रकार सादर केले जातात.

​करुल्यो म्हणजे कारुण्य. या विधीत सकारतींचे गायन केले जाते. सकारत म्हणजे शोकारत... शोक म्हणजेच दुःख. हा उत्सव सती प्रथेशी संबंधित असल्याने त्याला कारुण्याची किनार लाभली आहे. शिगमोत्सव हा गूढरम्य, भीतीने शहारे उमटविणारा, अगम्य, अनाकलनीय गोष्टींचा वेध घेणारा उत्सव. करुल्यो उत्सवात कुमारवयीन मुलांना हिरव्या रंगाचे कापड नेसवले जाते. अबोलीच्या फुलांनी त्यांना सजवले जाते. घराघरांत सुवासिनी त्यांची पूजा करतात, ओटी भरतात, त्यांच्याकडे सौभाग्याचे दान मागतात. त्यांना खांद्यावर बसवून त्यांची मिरवणूक काढतात व गायन करतात. ते सकारतींचे गायन असते. ही गीते साधी-सरळ परंतु आशयाच्या दृष्टीने संपन्न असतात. वादनाच्या साथीने जेव्हा त्यातील कारुण्य कानांवर पडते, तेव्हा जीव पिळवटून निघतो. या गीतातील लवचिकपणा, त्याची लय हे सर्वच मनाला आकर्षक वाटते.

​सती जाण्याची प्रथा ही अघोरी, अमानवी. पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने त्याच्याच धगधगत्या चितेत उडी घ्यायची व स्वतःला संपवून टाकायचे. पती नसलेल्या स्त्रियांना समाज कसलीच किंमत देत नसे. तिला नरकयातना भोगाव्या लागायच्या. त्यामुळे त्या काळातील स्त्रिया सती जाण्यासाठीचे बळ मनात निर्माण करत असाव्यात. एरव्ही जिवंतपणी मरणयातना सहन कराव्याच लागतील, त्यापेक्षा पतीबरोबर देहाची सुटका करून घेतली तर लोकमनात पावित्र्य, आपल्याप्रतीची कृतज्ञता व आदरभाव टिकून राहील. विविध ठिकाणच्या सती गेलेल्या स्त्रीचे उदात्तीकरण करणारे गायन, सती शिळा, वीरगळ इत्यादींमधून याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. सती उत्सव साजरा करून त्यांची स्मृती आठवली जाते.

​लोकमन निसर्गाच्या अगम्य, अनाकलनीय रूपासमोर नेहमीच नस्तक होत आलेले आहे. नकळतपणे त्यांच्या हातून घडलेली चूक, एखादे मोठे मानवी हत्याकांड हे कालांतराने जेव्हा त्यांच्या लक्षात येते, तेव्हा त्यांना आपली चूक कळते. त्याचे परिमार्जन करण्यासाठी, मग त्यांची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी म्हणून काही परंपरांची सुरुवात केलेली असते. सकारती या वेदनेला शब्दांत गुंफतात. तिथं ती सकारत शिकारीला गेलेल्या पतीचे त्याच्याच सहकाऱ्याच्या हातून झालेल्या मृत्यूनंतर चितेवर चढत असलेली मालाये सती असो; नाहीतर कुण्या एका गावातील काही तरुण मुले फिरत असताना वाट चुकतात, दुसऱ्या एका गावच्या आंब्याच्या बनात पोहोचतात. लोकांना वाटते की चोरच शिरले आहेत. कोणतीच शहानिशा न करता त्यांचे शिरकाण केले जाते. समूहाच्या क्रोधाला मर्यादा नसते. जेव्हा त्या कोवळ्या मुलांच्या पालकांचे निष्पाप चेहऱ्यावरचे कारुण्य त्यांच्या काळजाला भिडते, तेव्हा मात्र आपल्या हातून घडलेल्या पापाचे परिमार्जन करावेसे वाटते. मग चोरोत्सवाची परंपरा सुरू होते. इथेही सकारतींचे गायन केले जाते:

​चोर से चोरूक गेले आंबियाच्या बनी

आंबियाच्या बनी त्यांचा साधाना जाला

​वैविध्यपूर्ण विधी यावेळी पार पाडले जातात. शिगमोत्सवात अतृप्त आत्म्यांना संतुष्ट करण्यासाठी हे गायन केले जाते, असे लोकमन मानत आलेले आहे. परंपरेने आपण कारुण्याची किनार असलेल्या अनेक कथा, कहाण्या ऐकत आलेलो आहोत. अशीच एक कथा फुगडी, गावनकाणी, ओवी बनून आपल्या कानांवर पडलेली, ती म्हणजेच चिलया बाळाची कथा. चांगुणेची परीक्षा घेण्यासाठी तिच्या दारात आलेला जोगी जेव्हा तिच्याकडे तिला नवसाने झालेल्या मुलाचे मांस शिजवून वाढण्याची इच्छा प्रकट करतो, तेव्हा त्या माऊलीच्या हृदयाचे आक्रंदन होते.

​गावकारा रे वाड्यार

आणि गावकारा भावोजी

गुरू बाबा भुक्यालो

आणि दि तुझे कोमे

आणि कोम्याचो सांगडी

आणि काय नारी घेतलो

आणि येयली घरमाला

काणोनी कुटोनी मच्छार रानीले

आणि चल बाबा आंघोळीक

आणि चांगुणे गे बाई

आणि कोमड्या कुकड्याचे

नको बाई आम्हा मच्छार

​असे म्हणून ती जोगी बाबाला फसवण्याचा प्रयत्न करते. पण ते शक्य होत नाही. गोसावड्याच्या रूपात साक्षात भगवान शंकर तिची परीक्षा घेण्यासाठी आलेले असतात. या कथेचा शेवट सकारात्मक आहे. मात्र ती शोकारत बनून जेव्हा शिगमोत्सवात वादानाच्या साथीने कानांवर पडते, तेव्हा मात्र ती माता-भगिनी व जमलेल्या सर्वांच्या काळजाचे पाणी पाणी करते. अशा कितीतरी कथा, कहाण्या, घटना, प्रसंगांचे कारुण्य या सकारती गायनातून प्रतिबिंबित होते. या गायनाची पद्धत, लयबद्धता, त्यातून अभिव्यक्त होत असलेल्या भावना आणि वेढून राहिलेले कारुण्य मनात कोरले जाते. वेदनेला सजविण्याचे, तिचे उदात्तीकरण करून ती हलकी करण्याचे सामर्थ्य या गीतातून जाणवते. वेदना, क्लेशदायक घटनांचा फक्त शोकच करायचा नसतो, तर त्याचीही श्रद्धेने आरती गायची, दुःख हलके करायचे, अशीच धारणा लोकमनसाने बाळगलेली असावी.


पौर्णिमा केरकर

(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक, 

कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)