गोव्याच्या पारंपरिक चवीला आणि कौशल्याला आता जागतिक ओळख मिळत आहे. ताळगावची वांगी आणि मुसराद आंब्यासह गोव्यातील १५ उत्पादनांना मिळालेल्या 'जीआय टॅग'ची वैशिष्ट्ये, निकष आणि फायद्यांविषयी सविस्तर माहिती.

हल्लीच ताळगावची वांगी, हिलारियो आंबा, कॉरगुट तांदूळ, काजू बोंडे आणि मुसराद आंबा ह्या गोव्याच्या पारंपारिक उत्पादनांना भौगोलिक नामांकन प्राप्त झाले. यापूर्वी खोला मिरची, आगशीची वांगी, बेबिंका, हरमल मिरची, मंडोळी केळी, खाजे, सातशिरा भेंडी यासारख्या उत्पदनांना जीआय मानांकन देण्यात आले होते.
जीआय टॅग म्हणजे काय?
एखाद्या उत्पादनाला दिलेले कायदेशीर चिन्ह म्हणजे जीआय टॅग (भौगोलिक संकेतांक). हा संकेतांक भौगोलिक प्रदेशाशी संबंधित उत्पादनांना दिला जातो. ही ती उत्पादने ज्यांना त्या-त्या प्रदेशामुळे खास वैशिष्ट्य, दर्जा, गुणवत्ता ओळख प्राप्त झालेली असते. भारतात भौगोलिक संकेतांक ‘पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क नियंत्रक जनरल’च्या अंतर्गत येणाऱ्या Geographical Indications Registry द्वारे दिला जातो.
जीआय टॅगचा इतिहास
भारतात कार्यान्वित झालेला Geographical Indications of Goods (Registration & Protection) Act, 1999 अंतर्गत साल २००३ मध्ये भारतात जीआय टॅग लागू करण्यात आला. Geographical Indications Registry’चे मुख्य कार्यालय चेन्नई मध्ये आहे. २००३ पासून आतापर्यंत भारताने चारशेहून अधिक उत्पादनांना जीआय टॅग दिला आहे. दार्जिलिंग चहा, कोल्हापुरी चप्पल, हापूस आंबा, बैंगलोर सिल्कसह गोव्याच्या काजू फेणीलाही जीआय टॅग मिळाला आहे.
जीआय टॅग कोणत्या निकषांवर आधारित दिला जातो?
जीआय टॅगसाठी कॉरगुट तांदूळ, मुसराद आंबा, मांगेलाल आंबा, करवंटी कोरीव कला, ताळगावची वांगी आणि काजू अॅप्पल या सहा वस्तूंसाठी 'जीआय' नामांकनासाठी अर्ज करण्यात आला होता. पैकी ताळगावची वांगी, कॉरगुट तांदूळ, काजू अॅप्पल, मांगेलाल आंबा, मुसराद आंबा यांना 'जीआय' मानांकन देण्यात आले. एखाद्या वस्तूला जीआय टॅग देण्यासाठी खालील निकष बघितले जातात.
• भौगोलिक प्रदेश – उत्पादन एखाद्या विशिष्ट प्रदेशात, राज्यात किंवा देशात तयार होणे गरजेचे.
• विशेष गुणधर्म – त्या प्रदेशामुळे उत्पादनाला खास दर्जा, चव, गुणवत्ता किंवा वैशिष्ट्य प्राप्त झालेले असणे गरजेचे.
• नैसर्गिक घटक – त्या प्रदेशाचे हवामान, माती, पाणी व इतर नैसर्गिक घटकांचा उत्पादनावर परिणाम झालेला असावा.
• प्रतिष्ठा व प्रसिद्धी – उत्पादन त्या प्रदेशामुळे ओळखले जात असणे गरजेचे.
• मानवी कौशल्य – स्थानिक लोकांचे पारंपरिक ज्ञान, कला किंवा कौशल्य उत्पादनाशी जोडलेले असावे.
• परंपरा व इतिहास – उत्पादनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि परंपरागत पद्धती असाव्यात.
जीआय टॅग मिळाल्याने काय फायदा होतो?
• राज्यातील विविध वैशिष्ट्यपूर्ण आणि पारंपरिक उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग मजबूत होते.
• अधिकृत ओळख मिळाल्याने स्थानिक शेती परंपरा व पारंपरिक शेतीपद्धती टिकून राहतात.
• स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन मिळाल्यामुळे पर्यटन व निर्यातीला चालना मिळते.
• उत्पादनाची पारंपरिक ओळख जपली जाते.
• बनावट आणि कमी दर्जाच्या वस्तूंपासून संरक्षण मिळते.
• स्थानिक उत्पादकांना योग्य दर, मान्यता आणि हक्क मिळतात.
गोव्यातील वस्तूंना/उत्पादनाला मिळालेल्या जीआय टॅगची यादी
गोव्याला आतापर्यंत एकूण १५ भौगोलिक संकेतांकानी गौरविण्यात आलेले आहे. त्याची यादी खालीलप्रमाणे आहे.
काजू फेणी – काजूपासून बनवले जाणारे गोव्याचे पारंपरिक मद्यपेय. हे मद्यपेय खास पारंपरिक पद्धतीने बनवले जाते.
खोला मिरची – काणकोण तालुक्यातील खोला गावच्या डोंगराळ भागात ह्या मिरचीची लागवड केली जाते. भडक लाल रंगाची ही मिरची विशेषत: लोणची, पापड बनवण्यासाठी वापरली जाते.
मुसराद आंबा – आंब्याचा स्थानिक प्रकार.
मंडोळी केळी - गोव्यातील खास, मोठी, गोड आणि जास्त काळ टिकणारी केळी. गोड चवीमुळे ही केळी हलवा, मिल्कशेक बनवण्यासाठी किंवा डेझर्टमध्ये वापरली जातात.
काजू बोंडे – काजू अॅपल म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या ह्या बोंडापासून फेणी, हुरराक, दारू काढली जाते. ताजे असताना मीठ, मिरची घालून खाल्यासही हे फळ चविष्ट लागते.
खाजे – जत्रा किंवा उत्सवांमध्ये मिळणारा, गूळ किंवा साखरेपासून बनलेला, तळलेला पारंपरिक गोड-खुसखुशीत पदार्थ. हा पदार्थ स्थानिक संस्कृतीचा महत्त्वाचा भाग मानला जातो.
हिलारियो आंबा – आंब्याचा स्थानिक प्रकार.
बेबिंका – नाताळ सणात नारळाचे दूध, साखर, अंड्याचा पिवळा बलक, जायफळ आणि मैदा वापरून बनवलेली गोव्याची पारंपरिक मिठाई.
मानकुराद आंबा – चवीला खूप गोड आणि रसाळ खास स्थानिक आंबा.
कॉरगुट तांदूळ – स्थानिक तांदूळ.
आगशीची वांगी – गोव्याच्या आगशी गावातील विशिष्ट माती आणि हवामानामुळे पिकणारी स्थानिक वांगी प्रजाती.
गोवा काजू – काजूगराला राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग मानला जातो.
हरमल मिरची – पेडणे तालुक्यातील हरमल गावात ह्या मिरचीचे पीक घेतले जाते. लाल-तपकिरी रंगाची हे मिरची खूप तिखट असते. मासळीच्या आमटीला विशिष्ट चव देणारी ही मिरची गोवेकरांच्या खास आवडीची.
ताळगावची वांगी – गोव्याच्या ताळगाव गावातील विशिष्ट माती आणि हवामानामुळे पिकणारी स्थानिक वांगी प्रजाती.
सातशिरा भेंडी - सात शिरा असलेली ही भेंडी चव आणि पोषणाला उत्कृष्ट मानली जाते.

- स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या
प्राध्यापिका आहेत.)