गोवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या स्तुत्य उपक्रमातून स्पर्धा परीक्षांचे अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. जेएसओ (JSO) आणि सरकारी भरती प्रक्रियेतील बारकावे उलगडून दाखवणारा, अनुभवी मार्गदर्शकाच्या लेखणीतून उतरलेला हा विशेष लेख.

अलीकडेच गोवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज विभागातर्फे गोवा सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रवेश परीक्षांसाठी चार दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्याची संधी मला प्राप्त झाली होती. खरं तर, गोवा सरकारतर्फे सुरू करण्यात आलेला हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. या कार्यशाळेमध्ये गोमंतकीय उच्चविद्याविभूषित विद्यार्थी आणि शासकीय अधिकारीदेखील सहभागी होते. यामध्ये काही वकील, काही अभियंते, काही शिक्षक तर काही जण सरकारी अधिकारीदेखील होते. या सर्वांनी जेएसओ (JSO) च्या ३८ जागांसाठी अर्ज भरलेहोते. जेएसओ म्हणजे ज्युनिअर स्केल ऑफिसर; अर्थात डेप्युटी कलेक्टरची पोस्ट. हे पदाधिकारी म्हणजे गोव्यातील 'आयएएस' (IAS) समकक्ष उमेदवार आहेत. यांची निवड गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून केली जाते.
कमिशन परीक्षा घेते व चार स्तरांतून ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊन पोस्टिंग होते. प्री-स्क्रीनिंग, मग स्क्रीनिंग, मग लेखी परीक्षा आणि शेवटी तोंडी परीक्षा अशा क्रमाने ही निवड प्रक्रिया असते. ही परीक्षा इतर पदांच्या परीक्षांपेक्षा अवघड असते, कारण यूपीएससी (UPSC) परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम जसाच्या तसा जीपीएससीला (GPSC) लागू पडतो. गोवा राज्य कर्मचारी भरती आयोगातर्फे सुद्धा अलीकडेच भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट १ आणि स्क्रीनिंग टेस्ट २ असे स्तर असतात. विशिष्ट शासकीय खात्यासाठी जर जागा भरायच्या असतील, तर त्या खात्याविषयीचे प्रश्न त्या परीक्षेत विचारले जातात; ज्याला 'कोअर सब्जेक्ट' म्हटले जाते.
गंमत अशी आहे की, पुढील स्तरावर जाण्यासाठी प्रथम स्क्रीनिंग/प्री-स्क्रीनिंग प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते, तरच पुढे जाता येते. हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसतात, पण मोजकेच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढच्या स्तरासाठी पात्र होतात. प्री-स्क्रीनिंग अथवा स्क्रीनिंग परीक्षेमध्ये प्रामुख्याने इंग्रजी व्याकरण, गणितीय क्षमता अर्थात 'न्यूमेरिकल अॅबिलिटी', रिझनिंग आणि जनरल अॅप्टीट्युड असे विषय असतात. ६० गुणांची ही 'कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट' असते. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. साधारणपणे ७५ मिनिटांत हे प्रश्न सोडवायचे असतात. चांगली गोष्ट म्हणजे याला 'नेगेटिव्ह मार्किंग' नसते, त्यामुळे यूपीएससीसारखे दडपण नसते.
पहिले १० प्रश्न इंग्रजी उतारा आणि त्यावरील प्रश्नांच्या स्वरूपात असतात. त्यानंतर समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांवर प्रश्न असतात; ज्याला 'सिनोनिम'आणि 'अँटोनिम' असे म्हणतात. काही ठिकाणी वाक्यातील व्याकरण दुरुस्त करा, असे प्रश्न असतात. काही वाक्प्रचार तसेच म्हणींचा अन्वयार्थ विचारला जातो. येथे थोडा नीट प्रयत्न केल्यास चांगले गुण मिळू शकतात. मार्टिन यांचे 'वर्ड पॉवर' हे पुस्तक वापरल्यास याचा खूप फायदा होतो.
त्यानंतर गणितीय प्रश्न असतात. साधारणपणे १० वीच्या पातळीवरचे प्रश्न विचारले जातात.
उदा. १) ४ माणसे ८ दिवसांत १ एकर शेत नांगरू शकतात, तर ६ माणसे तेच शेत किती दिवसांत नांगरू शकतील?
२) एक ट्रेन ताशी ८० किमी वेगाने जात असून दुसरी रेल्वे विरुद्ध दिशेने ६० किमी वेगाने समांतर रुळांवरून येत असेल, तर किती वेळात त्या एकमेकींना ओलांडतील?
असे प्रश्न हमखास असतात. प्रश्न सोपे असतात, परंतु आपल्याला त्यांचे फॉर्म्युले माहीत नसतात आणि सरावदेखील नसतो. त्यामुळे अनेकदा येथे गुण जातात आणि वेळदेखील वाया जातो. यासाठी सराव वर्ग केल्यास हे ज्ञान मिळू शकते. काही प्रश्न नातेसंबंधांवर असतात.
उदा. पप्पूची आई वंदना असून तिचा भाचा सुरेश आहे. जर सुरेश हा पप्पूच्या मावस बहिणीचा मुलगा असेल, तर मावस बहीण आणि वंदना यांचे नाते काय?
अशा स्वरूपाचे प्रश्न असतात. सिरीज प्रकारात 'मिसिंग नंबर' शोधायचे असतात. 'ऑड वन आऊट'नुसार विसंगत गोष्ट शोधायची असते. काही प्रश्नांची उत्तरे तर्कशास्त्रावर आधारित असतात. केवळ फॉर्म भरला म्हणून या परीक्षेत उत्तीर्ण होता येत नाही; त्यासाठी किमान १२ महिने आधीपासून व्यवस्थित तयारी करावी लागते. विद्यार्थ्यांची तयारी हा एक मोठा विषय आहे. अशा विषयांचे कोचिंग क्लासेसदेखील सहज उपलब्ध नसतात. प्री-स्क्रीनिंगचे नीट नियोजन केले, तर वर्षभरात येणाऱ्या परीक्षेत यश मिळण्याची दाट शक्यता असते. पहिल्याच पायरीवर अपयश आले, तर पुढे जाताच येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी स्वतःला १२ महिने आधी सज्ज करून मगच मैदानात उतरावे.
गोवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग गोमंतकीय विद्यार्थ्यांना अधिकारी म्हणून घडवण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. त्यात भर म्हणून ते 'प्लेसमेंट ड्राईव्ह' सुद्धा आयोजित करतात. या विभागाचे काम अतिशय स्तुत्य आहे. या संदर्भात या सर्वांचे कौतुक करणे क्रमप्राप्तच आहे.

- अॅड. शैलेश कुलकर्णी
कुर्टी - फोंडा