ठंडा ठंडा कूल कूल, सरबतासाठी फूल फूल

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
just now
ठंडा ठंडा कूल कूल, सरबतासाठी फूल फूल

सूर्याची प्रखर किरणं पृथ्वीवर पडत असल्यामुळे खूप उष्णता जाणवते. त्यात हिरव्यागार झाडांची संख्या कमी आणि सगळीकडे काँक्रिटच्या इमारती असल्यामुळे आजूबाजूला गरम वारे वाहते. अंगावर घाम गळतो आणि थंडगार पाणी पिण्याची इच्छा सतत लागते. 

उन्हाच्या उकाड्यामुळे शरीराची ऊर्जा संपून जाते. बाहेर खेळायला सुद्धा जावंसं वाटत नाही. पंख्याचा वारा सुद्धा गरम येतो. अशा वेळी मग आपोआप आपली पावलं फ्रीजकडे वळतात आणि त्यात ठेवलेले चिल्ड पाणी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स गटागटा आपल्या घश्यात उतरतात. एकदाचा थंडावा मिळतो आणि काही तासांनी किंवा काही दिवसांनी मात्र घसा दुखतो, घश्याला खाज सुटते, खोकला सुरू होतो, सर्दी होते.

हे सगळे त्रास नको असतील, तर उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी एक सोप्पा उपाय आहे. घरी एक छान माठ, मातीचं मडकं आणून ठेवायचं. त्यात पाणी साठवून ठेवलं की पाणी एकदम थंड होतं. त्यात सुगंधी वाळा किंवा मोगऱ्याची फुलं घातली की हे पाणी सुगंधी बनतं आणि हे पाणी थकवा नाहीसा करतं. 

हेच माठातलं थंडगार पाणी वापरून आपण वेगवेगळी सरबतं सुद्धा बनवू शकतो. आणि मज्जा अशी की ही सरबतं फक्त फळांपासूनच नाही, तर वसंत ऋतूत फुलणाऱ्या सुंदर फुलांपासून बनवावी. त्यासाठी लालबुंद जास्वंदीच्या फुलांचं सरबत, निळ्याशार गोकर्णीच्या फुलांचे सरबत, गुलाब पाकळ्यांचे सरबत आणि हो पळसाच्या, बहाव्याच्या फुलांचे सुद्धा सरबत बनवता येते. 

माठातले पाणी वापरून बनवलेली सरबतं प्यायल्याने सर्दी, खोकला सुद्धा होणार नाही, थंडावाही मिळेल आणि फुलांचे आरोग्यदायी फायदेसुद्धा मिळतील. त्याचबरोबर उकाडा कमी करण्यासाठी किंवा घामोळे येऊ नये म्हणून चंदन उगाळून त्याचा लेप कपाळावर आणि शरीरावर केला असता थंड वाटते. कृत्रिम रंग आणि प्रीझरवेटीव्ह असलेली सरबतं पिण्यापेक्षा हे उपाय या गर्मीत मुद्दाम करा आणि निरोगी रहा. 


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य