मगो नेत्यांबरोबर सरकार बनविण्याची चर्चा करताना चर्चिल आलेमाव यांचे मराठीप्रेम उफाळून आले होते. शाळेत शिकताना आपण मराठी शिकलो होतो असे सांगून त्यांनी ‘येरे येथे पावसा, तुला देतो पैसा’ ही कविता पत्रकारांनाही म्हणून दाखविली होती.
३० मे १९८७ रोजी गोवा घटकराज्य बनले आणि गोव्यातील २८ विधानसभा मतदारसंघाचे विभाजन करून ४० मतदारसंघ निर्माण करण्यात आले. पेडणे तालुक्यात तीन, तर केपेचा काही भाग काणकोणला जोडून दोन मतदारसंघ तयार करण्यात आले. बार्देश व सासष्टी तालुक्यातील मतदारसंघाचा आकडा वाढला. निवडणुकीपूर्वी गोवा काँग्रेस इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन झाली होती, तर भाबांगो मगो पक्षात विलीन झाला होता. त्यामुळे मत विभाजन होण्याचा प्रश्नच नव्हता. राजभाषा प्रश्न सुटला होता आणि गोव्याला घटकराज्याचा दर्जा मिळाला म्हणून काँग्रेसची नेतेमंडळी बेहद खूश होती.
काँग्रेस सरकारच्या मूळ राजभाषा विधेयकात केवळ कोंकणी राजभाषा करण्याची तरतूद होती. केंद्र सरकारचे प्रतिनिधी केंद्रीय गृहराज्यमंत्री चिंतामणी पाणीग्रही, विरोधी पक्षनेते रमाकांत खलप व मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या संयुक्त बैठकीत मराठी सहभाषा करण्याचा आग्रह खलप यांनी धरला. मुख्यमंत्री राणे यांनी सहमती दर्शविली. कारण काँग्रेसच्या ८ आमदारांची तशी मागणी होती. त्यामुळे हे विधेयक संमत झाले होते. मात्र मराठीप्रेमी काँग्रेसजन सरकारवर नाराज होते. त्यांनी या आमदारावर वचपा काढलाच.
गोव्याला घटकराज्याचा दर्जा मिळाल्यानंतर २२ नोव्हेंबर १९८९ रोजी गोवा विधानसभा व लोकसभेसाठी एकाच वेळी मतदान झाले. या निवडणुकीत नावेली मतदारसंघातून लुईझिन फालेरो बिनविरोध निवडून आले. त्यांच्या विरोधात अर्ज भरलेल्या एकमेव अपक्ष उमेदवाराने निर्धारित मुदतीत अर्ज मागे घेतल्याने फालेरो बिनविरोध निवडून आले होते. कुडतरी व वेळ्ळी या विधानसभेच्या दोन मतदारसंघातून आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून एकाच वेळी उमेदवारी अर्ज भरलेल्या कायतान फर्नांडिस या वयोवृद्ध उमेदवाराचे निधन झाल्याने या तिन्ही मतदारसंघातील निवडणूक स्थगित करण्यात आली. मरणासन्न अवस्थेत असलेल्या कायतान फर्नांडिस यांच्या नावाने कोणीतरी बोगस व्यक्तीने हे तिन्ही अर्ज भरले होते ही गोष्ट चौकशीत उघडकीस आली कारण सदर अर्ज भरण्यात आले त्यादिवशी कायतान इस्पितळात होता. या प्रकरणात एका माजी आमदाराचा हात होता अशी चर्चा होती. पण पोलिसांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला नाही. या विचित्र प्रकारामुळे २२ नोव्हेंबर रोजी विधानसभेचे ३८ मतदारसंघ आणि लोकसभेच्या उत्तर गोवा मतदारसंघासाठीच मतदान झाले.
१९८४ मध्ये काँग्रेस उमेदवार बाबू नायक यांचा पराभव करून अपक्ष म्हणून मडगाव मतदारसंघातून निवडून आलेले उदय भेंब्रे यांनी १९८९ मध्ये निवडणूक लढविण्याचे धाडस केले नाही. १९८४ मध्ये पराभूत झालेल्या बाबू नायक यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्याने ते बंड करून अपक्ष म्हणून निवडून आले. काँग्रेस उमेदवार दिगंबर कामत यांना त्यांनी पराभूत केले. १९८० मध्ये मगो पक्ष जीवाचे रान करणारे बाबुसो गांवकर यांना मगो पक्षाने मडकईतून तिकीट नाकारल्याने त्यांनी बंड केले पण त्यांची बंडखोरी अयशस्वी झाली.
मगो पक्षाने राजभाषा आंदोलन काळात मराठीच्या प्रश्नावर संपूर्ण गोवा पिंजून काढल्याने मराठी भक्तांनी मगो उमेदवारांना भरभरून मते दिली. त्यामुळे मगोचे तब्बल १८ उमेदवार विजयी झाले. १० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला जेमतेम तेवढ्याच म्हणजे अठराच जागा मिळाल्या. मडगावमधून अपक्ष म्हणून निवडून आलेले बाबू नायक यांनी मगोला पाठिंबा दिला, तर सांत आंद्रेमधून निवडून आलेले डॉ. कार्मो पेगाद यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. दोन्ही पक्षांच्या आमदारांची संख्या प्रत्येकी १९ झाली. त्यामुळे राज्यपालांनी कोणालाच सरकार बनविण्यासाठी पाचारण केले नाही.
कायतान फर्नांडिस या अपक्ष उमेदवाराच्या निधनाने स्थगित करण्यात आलेल्या कुडतरी व वेळ्ळी हे दोन विधानसभा मतदारसंघ आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात ६ जानेवारी १९९० रोजी मतदान घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी मतमोजणी झाली. अपेक्षेप्रमाणे कुडतरीतून फ्रान्सिस सार्दिन आणि वेळ्ळीतून फॉरेल फुरतादो हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे काँग्रेस आमदारांची संख्या २१ झाली. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी ११ जानेवारी १९९० रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. डॉ. विली डिसोझा, फ्रान्सिस सार्दिन, सुभाष शिरोडकर, लुईझिन फालेरो आणि डॉ. कार्मो पेगादो यांना मंत्री करण्यात आले.
राणे सरकारचा शपथविधी झाला आणि ज्येष्ठ आमदार डॉ. लुईस प्रोतो बार्बोझा यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली. गोवा विधानसभेवर प्रथमच निवडून आलेले राजभाषा आंदोलनाचे हिरो चर्चिल आलेमाव यांच्या पदरात काहीच पडले नाही. युवक काँग्रेसचे अध्यक्ष माविन गुदिन्हो यांनाही लाल दिव्याची गाडी हवी होती. गेली १० वर्षे काँग्रेस पक्षात अशा प्रकाराच्या तक्रारी आणि कुरबुरी सतत चालू होत्या. डॉ. विली यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन नवा पक्ष काढला होता. तरीही श्रेष्ठींनी अभय दिल्याने राणेंचा आसनाला धक्का लागला नव्हता. पुढील ५ वर्षे अशीच काढू असे मानून त्यांनी बंडखोरांच्या कारवायांकडे दुर्लक्ष केले. मात्र चर्चिल आलेमाव, माविन गुदिन्हो यांनी सभापती डॉ. लुईस प्रोतो बार्बोझा यांच्याशी हातमिळवणी करून सात जणांचा वेगळा गट तयार केला. दस्तुरखुद्द सभापती या फुटीर गटाचे नेते होते. चर्चिल आलेमाव, माविन गुदिन्हो, फुर्तादो, सोमनाथ जुवारकर, लुईस अलेक्स कारदोझ, जे. बी. गोन्साल्विस यांनी काँग्रेसचा त्याग करून ‘गोवन पीपल्स पार्टी’ हा नवा पक्ष स्थापन केला. काँग्रेसच्या या सात आमदारांनी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे गोव्याबाहेर असताना त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेणारे पत्र राज्यपालांना दिले. त्यामुळे मुख्यमंत्री राणे दिल्लीत श्रेष्ठींकडे सल्लामसलत करून सरकारचा राजीनामा राज्यपालांना सादर केला.
गोवन पीपल्स पार्टीचे सात आमदार, मगोचे १८ आमदार व एक अपक्ष मिळून एकूण २६ आमदारांनी नवे सरकार बनविण्यास राज्यपालांची परवानगी मागितली. मगो व नव्याने स्थापन केलेल्या गोवन पीपल्स पार्टी नेत्यांनी आखलेल्या योजनेनुसार डॉ. बार्बोझा मुख्यमंत्री होणार होते. पण त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यास सभापतीपदाची सर्व सुत्रे उपसभापती सायमन डिसोझा यांच्याकडे गेली असती. सायमन डिसोझा काँग्रेस पक्षाचे असल्याने नवे सरकार बनविण्यात त्यांनी अडथळे निर्माण केले असते. त्यामुळे सभापतींनी राजीनामा देण्यापूर्वी अविश्वास ठराव आणून सायमन डिसोझा यांची उचलबांगडी करण्याचे ठरले. या सगळ्या उचापती करण्यासाठी किमान १५ दिवस लागले असते. त्यासाठी १५ दिवसांचा हंगामी मुख्यमंत्री हवा होता.
हंगामी मुख्यमंत्री कोणाला करावे? यावर चर्चा चालू असतानाच चर्चिल आलेमाव यांनी मला मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मांडला. राजभाषा आंदोलन चालू असताना राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप आलेमाव यांच्यावर होता. मगो आमदारांना हा प्रस्ताव मान्य नव्हता. पण उघड विरोध केल्यास जुळून आलेले गणित विस्कटण्याची भीती होती. त्यामुळे निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. हा प्रस्ताव संपादक नारायण आठवले यांच्या कानावर पडला, तेव्हा केवळ १५ दिवसांचा प्रश्न असल्यास करून टाका असा सल्ला दिला आणि रमाकांत खलप यांना हंगामी मुख्यमंत्री करुया हा मगो विधीमंडळ पक्षाने घेतलेला निर्णय शीतपेटीतच राहिला.
मगो नेत्यांबरोबर सरकार बनविण्याची चर्चा करताना चर्चिल आलेमाव यांचे मराठीप्रेम उफाळून आले होते. शाळेत शिकताना आपण मराठी शिकलो होतो असे सांगून त्यांनी ‘येरे येथे पावसा, तुला देतो पैसा’ ही कविता पत्रकारांनाही म्हणून दाखविली होती. त्यांच्या या मराठी प्रमाने ताई काकोडकर, रमाकांत खलप यांच्यासह सर्व मगो नेते भारावून गेले होते. २७ मार्च १९९० रोजी चर्चिल आलेमाव यांच्या सरकारचा शपथविधी झाला. रमाकांत खलप उपमुख्यमंत्री बनले. चर्चिल आलेमाव मुख्यमंत्री असताना गोवा सरकारने कोंकण रेल्वे प्रकल्पाला मान्यता दिली. मुंबईला जाऊन तिलारी प्रकल्पाच्या कार्यवाही करारावर सह्या केल्या.
दरम्यानच्या काळात उपसभापती सायमन डिसोझा यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात आला. ठरावावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे खास अधिवेशन बोलावून तो अविश्वास ठराव संमत करण्यात आला. त्यानंतर नव्या उपसभापतींची निवड करण्यात आली. विधानसभेची सुत्रे ताब्यात येताच १४ एप्रिल १९९० रोजी चर्चिल आलेमाव यांनी राजीनामा दिला आणि डॉ. लुईस प्रोतो बार्बोझा यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न साकार झाले.
गुरुदास सावळ
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)