भटकंती : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गोव्याच्या वारशाचे प्रदर्शन

बीटीएल लिस्बन मध्ये गोवा पॅव्हेलियनचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
भटकंती : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गोव्याच्या वारशाचे प्रदर्शन

पणजी :  कला आणि संस्कृती खात्यातर्फे नुकतेच लिस्बन,पोर्तुगाल येथे गोव्याच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करण्यात आले. बीटीएल लिस्बन २०२५ (बोल्सा डे टुरिस्मो डे लिस्बोआ) मध्ये गोवा पॅव्हेलियनला चांगला प्रतिसाद मिळाला. गोव्यातील कला, साहित्य, फेणी, बिबिंका आणि काजू यांनी येथील पर्यटकांना मंत्रमुग्ध केले. शिल्पकलेच्या थेट प्रात्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या पॅव्हेलियनचे औपचारिक उद्घाटन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पोर्तुगालमधील भारताचे राजदूत पुनीत रॉय कुंडल,  आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार अँटोनियो वाज, सचिव सुनील अंचिपाका, संचालक सगुण वेळीप आदी उपस्थित होते. गोवा पॅव्हेलियनमुळे पर्यटकांना गोव्याच्या अद्वितीय ओळखीचा खरा आस्वाद घेता आला. यावेळी कलाकार उमाकांत पोके आणि संतोष गोवेकर यांनी आपली कला सादर केली.  

संगीतकार कार्लोस गोन्साल्विस आणि सिग्मंड डिसोझा यांनी गोव्यातील पारंपारिक सुरांचे आधुनिकतेसोबत मिश्रण केले. घुमट आणि गिटारसह सादरीकरणाने एक मधुर सांस्कृतिक अनुभव निर्माण केला. यावेळी गावडे म्हणाले की, गोव्याची संस्कृती आणि वारसा यांचे सर्वत्र कौतुक होते. संगीत, अन्न, हस्तकला आदी संस्कृतीचे प्रकार जागतिक स्तरावर  प्रदर्शित करण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. 

सुनील अंचिपाका, म्हणाले की,  गोव्यातील कलाकार आणि पारंपारिक हस्तकला निर्मात्यांनी गोव्यापासून लिस्बनपर्यंत प्रवास करून जागतिक व्यासपीठावर गोव्याची संस्कृती प्रदर्शित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पंतप्रधान विश्वकर्मा लाभार्थ्यांसाठी जागतिक स्तरावर त्यांची कलात्मक उत्पादने प्रदर्शित करण्याचा हा पहिलाच अनुभव आहे.

हेही वाचा