गोवा : रंगांच्या साथीने राज्यात धुळवड उत्साहात

राजकारणी, युवावर्गासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लुटला रंग खेळण्याचा आनंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23 hours ago
गोवा : रंगांच्या साथीने राज्यात धुळवड उत्साहात

पणजी: राज्यभरात शुक्रवारी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पणजीवासीयांनी देखील पणजीतील महालक्ष्मी मंदिरात देवीचे दर्शन घेतल्यानंतर, आझाद मैदानात एकत्र जमत एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी केली. 

या धुळवडीत राजकारणी, युवावर्ग आणि वृद्ध देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.तसेच गावांसह शहरीभागात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या धुळवडीच्या कार्यक्रमात राजकारणी, उद्योजकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून रंग खेळण्याचा आनंद लुटला. 


गुरुवारी संध्याकाळी होळी पेटवल्यानंतर, संपूर्ण गोव्यात धुळवड साजरी करण्यात आली. रंगपंचमीच्या निमित्ताने पणजीवासीयांचे मनोरंजन करण्यासाठी, पणजी शिगमोत्सव समितीने पणजीतील आझाद मैदान येथे धुळवडीचे आयोजन करण्यात आले होते. 

पणजी शिगमोत्सव समितीसह पणजीवासीयांनी प्रथम महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतल्यावर आझाद मैदानात जाऊन मोठ्या उत्साहाने एकमेकांना रंगवण्याचा आनंद घेतला. या कार्यक्रमादरम्यान विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 


या कार्यक्रमात राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, महापौर रोहित मोन्सेरात, उत्पल पर्रीकर, उद्योजक श्रीनिवास धेंपो यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला होता. 

एकमेकांना रंग लावून सर्वांनी एकमेकांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या. पणजी शिगमोत्सव समितीने आझाद मैदानावर शिग्मोत्सावाच्या मिरवणूकांसह इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे.


आठवडाभर कार्यक्रमांची रेलचेलः धेंपो
धुळवडीच्या शुभेच्छा देताना, उद्योजक आणि पणजी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी कला- संस्कृती जपण्याचे आवाहन केले. लोकांनी बाहेर धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करावी. आम्ही १९ ते २४ फेब्रुवारी असा पूर्ण आठवडाभर कार्यक्रम आयोजित केले असून लोकांनी या कार्यक्रमांत भाग घेण्याचे आवाहनही धेंपो यांनी केले.

हेही वाचा