हातातोंडाशी आलेले काजू, आंबा, केळीसह नारळाचे पीकही आगीत भस्मसात. १ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशामक दलास यश
पणजी : दोन दिवसांपूर्वी मये डिचोली भागात वीज वाहिन्यांत घर्षण होऊन उडालेल्या ठिणगीमुळे काजू बागायतीला आग लागून प्रचंड नुकसान सोसावे लागले. दरम्यान काल शुक्रवारी असाच प्रकार कुडणे, साखळी येथील चिकणे भागात घडला. येथे चार जणांच्या संयुक्त मालकीच्या बागायतीला आग लागली.
दरम्यान येथे आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी दुपारी याबाबत डिचोली अग्निशामक दलास कळवले. अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन सुमारे १ लाख रुपयांची मालमत्ता वाचवली. याठिकाणी काजू, आंबा, केळी आणि नारळाचे पीक घेतले जाते. लागलेल्या आगीनंतर हातातोंडाशी आलेले पीक आगीत भस्मसात झाले. या घटनेत सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.
एरव्ही राज्यात मार्चच्या मध्यापर्यंत येणाऱ्या उकाड्याने, यंदा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांच्या विपरीत यंदा पहिल्यांदाच हवामान खात्याने राज्यात सलग १५ दिवस तापमानाचा यलो अलर्ट जारी केला. यावरूनच उन्हाची दाहकता लक्षात येते. प्रचंड उन्हामुळे रानावनातील झाडाझुडपांच्या पानांत घर्षण झाल्याने ठिणगी पडून आग लागण्याची शक्यता असते. तसेच सगारेटची जळती थोटके आणि तत्सम घटनांमुळे आग लागणे सामान्य आहे. येथे देखील असाच काहीसा प्रकार घडला असावा असे मत अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यक्त केले .
अन्य एका माहितीनुसार, डिचोली अग्निशामक दलाला हरवळे येथून देखील माळरानावर लागलेल्या आगीसंदर्भात कॉल्स आले होते. दरम्यान काणका वेर्ला भागातही काजू बागायतीला आग लागण्याची घटना घडली होती. पिळर्ण अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.