रुद्रेश्वर-गोवाच्या ‘मीडिआ’चा महाराष्ट्रात डंका!

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा : पटकावले ६ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
रुद्रेश्वर-गोवाच्या ‘मीडिआ’चा महाराष्ट्रात डंका!

पणजी : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेत रुद्रेश्वर-गोवा संस्थेच्या ‘मीडिआ’ या नाटकाने प्रथम क्रमांकांचे सहा लाखांचे प्रथम पारितोषिक पटकावले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी सोमवारी यासंदर्भातील घोषणा केली.
स्पर्धेत ‘मीडिआ’ नाटकाच्या दिग्दर्शनासाठी गंगाराम नार्वेकर, रंगभूषेसाठी एकनाथ नाईक यांना प्रथम, नेपथ्यासाठी योगेश कापडी यांना तृतीय पारितोषिक मिळाले असून, उत्कृष्ट अभिनयासाठी स्त्री गटात वैष्णवी काकोडे हिला रौप्यपदक प्राप्त झाले आहे. तर, मनुजा नार्वेकर हिला अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे.
१७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत बांदा-मुंबई येथील रंगशारदा नाट्यमंदिरात ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम स्पर्धा पार पडली. अंतिम फेरीत एकूण ४४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. त्यात द्वितीय क्रमांक शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे संस्थेच्या ‘मून विदाऊट स्काय’ या नाटकास, तर तृतीय क्रमांक माणूस फाऊंडेशन, मुंबईच्या ‘द फिलिंग पॅराडॉक्स’ या नाटकाला मिळाला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिवदास घोडके, रवींद्र अबटी, संजय पेंडसे, प्रदीप वैद्य आणि शंकुतला नरे यांनी काम पाहिले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या नाटकांसह त्यात सहभागी कलाकारांचे तसेच वैयक्तिक पारितोषिके मिळवलेल्या कलाकारांचे अभिनंदन केले.