अपहरणप्रकरणी जामीन : अटकेची माहिती पोलिसांनी लेखी स्वरूपात न दिल्याची पळवाट
पणजी : बार्देश तालुक्यातील २७ वर्षीय युवतीला पळवून नेऊन तिचा छळ करून बळजबरीने तिचे लग्न करण्यात आले होते. या प्रकरणी कर्नाटक येथील ३४ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली होती. अटकेची माहिती लेखी स्वरूपात संशयिताला किंवा त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली नव्हती. तसेच पीडित महिला आणि संशयिताचे लग्न नोंदणीकृत आहे, असे निरीक्षण नोंदवून पणजी येथील जलदगती न्यायालयाचे न्या. दुर्गा मडकईकर यांनी संशयिताला ५० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणी बार्देश तालुक्यातील २७ वर्षीय युवतीच्या बहिणीने कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, संशयित युवकाने पीडित महिलेचे २३ जानेवारी २०२५ रोजी अपहरण केल्याचे म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद करून पीडित महिलेचा शोध घेतला. मात्र, ते दोघे सापडले नाही. याच दरम्यान ९ फेब्रुवारी रोजी पीडित महिलेने तक्रारदाराला फोन केला. संशयिताने तिला पळवून नेऊन तिचा छळ करून बळजबरीने तिचे लग्न करण्यात आल्याची माहिती तिने दिली. तसेच तिला एका खोलीत ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
या संदर्भात पीडित महिलेने व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून संबंधित खोलीचा पत्ता पाठविला. ही माहिती तक्रारदार महिलेने कोलवाळ पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी केली असता, संशयित युवकाने पीडित युवतीला दावणगिरी कर्नाटक येथे नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू जाधव, प्रकाश घाडी, कॉन्सटेबल प्रवीण पाटील व तेजस्वी मडकईकर या पथकाने १० फेब्रुवारी रोजी सकाळी मलेबेन्नूर दावणगिरी येथील संशयिताच्या घराच्या खोलीतून पीडित युवतीची सुटका केली. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेऊन गोव्यात आणण्यात आले. दरम्यान, पीडित महिलेचा जबाब नोंद केला असता, तिचे बळजबरीने लग्न करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचे कलम नोंद करून संशयिताला अटक केली.
दरम्यान, संशयिताने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी संशयितातर्फे अॅड. पी. कोरगावकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित युवकाला सशर्त जामीन मंजूर केला आहे.
संशयिताच्या वकिलाचा युक्तिवाद
संशयिताच्या वकिलाने पीडित महिला आणि संशयिताने नोंदणीकृत लग्न केल्याचा दावा केला. तसेच पीडित महिला आणि संशयितामध्ये प्रेमसंबंध आहे. याशिवाय संशयिताला अटक करताना त्याच्या अटकेची माहिती लेखी स्वरूपात त्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना देणे आवश्यक होते. हा नियम पाळला गेला नसल्याचा दावा करून संशयिताला जामीन देण्याची मागणी केली.