प्रमोद जुवेकरला कर्नाटकात अटक : १३८ लिटर दारू जप्त
कारवार : दारू तस्करी रोखणे किंवा मद्यासंबंधी अन्य गैरव्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी अबकारी खाते तत्पर असते. मात्र, याच अबकारी खात्याच्या एका निरीक्षकाने चक्क दारूची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारू तस्करी करताना कर्नाटक अबकारी विभागाने गोव्याच्या अबकारी निरीक्षकाला रंगेहाथ पकडले आहे.
शिवमोग्गा जिल्ह्यातील सागर शहरातील कागोडू येथे गुरुवारी कर्नाटक अबकारी विभागाने गोवा नोंदणी असलेल्या एका कारमधून गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी बेतुल येथील प्रमोद जुवेकर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
किनारी उपविभागीय अबकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई गुरुवारी केली. जुवेकर हा आपल्या जीए ०८ एफ ३३१२ या कारमध्ये कागोडू येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या शेतात दारू घेऊन थांबला होता. याबाबतची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाने केलेल्या कारवाईत त्याच्या गाडीतून १३८.०६ लिटर गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. जुवेकर याच्याविरुद्ध कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा, १९६५ च्या कलम ८,११,१५ नुसार आणि इतर कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजार करून न्यायालयीन कोठाडीत ठेवण्यात आले आहे.