पोलीस बळाचा वापर करून अंत्यसंस्कारात अडथळे

मानवाधिकार आयोगाची पुलीस अधीक्षकाला नोटीस

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
पोलीस बळाचा वापर करून अंत्यसंस्कारात अडथळे

पणजी : पारंपरिक ठिकाणी एका महिलेच्या अंत्यसंस्कारात अडथळा आणण्यासाठी पोलीस बळाचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेऊन मानवाधिकार आयोगाने दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. पोलिसांनी कोणत्याही आदेशाशिवाय महिलेला पारंपरिक ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली नाही, अशी तक्रार गणेश गावस देसाई (अवेडे-केपे) यांनी केली आहे.

या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकाला नोटीस बजावली असून या नोटिसीनुसार, पोलीस अधीक्षकाला २ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वा. सुनावणीला हजर राहून या प्रकरणी स्पष्टीकरण सादर करावे लागणार आहे. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष डेस्मंड डिकॉस्ता यांनी सदर आदेश जारी केला आहे.

केपे-अवेडे येथील गणेश गावस देसाई यांच्या पत्नीचे फेब्रुवारीमध्ये निधन झाले होते. मृत्यूनंतर पारंपरिक जागेवर अंत्यसंस्कार करण्याचा देसाई कुटुंबाचा हेतू होता. मात्र, पोलीस निरीक्षक आणि इतर पोलिसांनी दिवसभर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली नाही. दरम्यान, याप्रकरणी केपेचे पोलीस निरीक्षक अर्जुन सांगोडकर, प्रशांत देसाई, उल्हास देसाई, विशाल देसाई आणि राजेश देसाई यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. 

पोलिसांकडून उल्लंघन 

पोलिसांनी न्यायालयीन किंवा कोणत्याही आदेशाशिवाय मालमत्तेवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. मृत्यूनंतर रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करणे आवश्यक आहे. मात्र, पोलिसांमुळे ते झाले नाही, हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, असा आरोप करण्यात आला.