शिवशाहीमुळे पोर्तुगीजांना गोव्यातील धार्मिक कृत्ये थांबवावी लागली!

सचिन मदगे : मडगावात ‘गोमंतकातील शिवशाही’ विषयावर व्याख्यान

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
18 hours ago
शिवशाहीमुळे पोर्तुगीजांना गोव्यातील धार्मिक कृत्ये थांबवावी लागली!

मडगाव : धर्माच्या रक्षणाचा पाया शिवाजी महाराजांनी रचलेला आहे. मराठा राज्याच्या प्रभावासह शिवशाहीमुळे पोर्तुगीजांना गोव्यातील त्यांची धार्मिक कृत्ये थांबवावी लागलेली आहेत. शिवशाही नसती तर सध्याचे समाजकारण व राजकारण आतासारखे नसते. हा सखोल अभ्यासाचा विषय आहे, असे मत इतिहास अभ्यासक सचिन मदगे यांनी व्यक्त केले.
गोमंत विद्या निकेतनतर्फे सोमवारी सायंकाळी फोमेंतो एम्फीथिएटर येथे इतिहासतज्ञ सचिन मदगे यांचे ‘गोमंतकातील शिवशाही’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे जयंतीनिमित्त अनेक मुलांनी शिवरायांसारखी वेशभूषा करत कला सादर केली. कार्यक्रमावेळी गोमंतकात शिवशाही असल्यानेच गोव्यातही धर्मरक्षण झाल्याचा पुनरुच्चार मदगे यांनी केला. इतिहास हा संदर्भावर आधारलेला असतो. त्यामुळे उपलब्ध संदर्भातून इतिहासाची मांडणी केली जाते. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना हाकलवून लावण्यासाठी प्रयत्न केल्याचे संदर्भ आढळून येतात. धर्मरक्षणाचा पाया शिवाजी महाराजांनी रचला व त्यानंतर संभाजी महाराजांच्या आक्रमकतेपुढे पोर्तुगीज साम्राज्य नामोहरम होण्याच्या स्थिती आले होते. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी अनेक गुप्तहेर ओल्ड गोवा येथील राजधानीत नेमलेले होते. काही कारणामुळे पोर्तुगीजांविरोधातील मोहीम अपयशी ठरली.
बहमानी मुस्लिम व पोर्तुगीज यांच्याकडूनम नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराची नासधूस झालेली होती. शिवरायांनी या मंदिराचे पुननिर्माण केलेले आहे. महाराष्ट्रातील रायगड व गोव्यातील सप्तकोटेश्वरच्या दारात शिवरायांचे शिलालेख उपलब्ध आहेत. मंदिरांच्या पुनर्बांधणीच्या कामाची सुरुवात १७व्या शतकात शिवरायांनी गोव्यातून केल्याचे दिसून येते. पोर्तुगीजांना जाब विचारणारे शिवाजी महाराज हे पहिले राजा होते. त्याआधी इतर राजांनी पार्तुगीजांसमोर मान ताठ ठेवलेली नव्हती. साळ नदी बेतूलला जिथे मिळते त्या ठिकाणी किल्ला बांधण्याचा आदेश शिवाजी महाराजांनी बाळ्ळीच्या हवालदारांना दिलेला होता. पोर्तुगीज शासनातील पत्रव्यवहार केलेले कागदोपत्रांद्वारे हे स्पष्ट होते. शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पहिले विदेशी भाषेतील शिवचरित्र एका पोर्तुगीजाने १६९५ मध्ये गोव्यात मुरगाव येथे लिहिलेले आहे.
‘शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आता हे राज्य काळजीतून मुक्त झाले. युध्दाच्या काळापेक्षा शांततेच्या काळात जास्त धोकादायक होते,’ असे गोव्यातील गव्हर्नरने पोर्तुगालला कळवले होते. यातून शिवाजी महाराजांबाबतची भीती दिसून येते. त्यानंतर संभाजीराजेंनी शरण आलेल्या अकबर व राठोडला डिचोलीत आणून ठेवले होते. फोंड्यातील मर्दनगड हा संभाजी महाराजांनी बांधलेला आहे. संभाजी महाराजांनी फोंडा येथील लढाईनंतर जुवा बेट जिंकून घेतले होते. पण मुघलांच्या स्वारीमुळे ते पुन्हा फोंडा येथे गेले. संभाजीराजांच्या कार्यामुळे पोर्तुगीजांचा धार्मिक उन्माद कमी होत गेला. त्याकाळी मोघलांच्या व पोर्तुगीजांच्या ताब्यात कोकण किनारपट्टी गेल्यास सध्याची स्थिती काय असती त्याचा विचार करण्याची व अभ्यासाचा विषय आहे.

शिवशाहीशी संबंधित अनेक पुरावे...
- हे राज्य हिंदू झाले, असे अंत्रुज महालातील येथील शिलालेखावर नमूद आहे. डिचोलीतील काही सनदीमध्येही शिवशाहीशी संबंधित पुरावे आढळतात.
- शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाची नोंद युरोपियनाच्या डायरीत असून दुभाषी म्हणून कार्यरत मूळ कोलवा येथील नारायण शेणवी कोठारी यांनी हा सोहळा पाहून हे वर्णन त्यांना सांगितले होते.
- शिवरायांच्या राज्याभिषेकाचे चित्र जे अनेक ठिकाणी पाहता येते, ते कोंब येथील रहिवासी दीनानाथ दलाल यांनी काढलेले आहे.
- शिवशाहीचा इतिहास हा येथील मातीचा व येथील लोकांचा इतिहास आहे, असे मत सचिन मदगे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा