नवीन फौजदारी कायद्यांसह गोव्यातील खाण व्यवसायासंदर्भात दोन्ही नेत्यांत चर्चा.
पणजी : राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. नवीन फौजदारी कायदा व खाण व्यवसायासंबंधीत घडामोडींची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रशासन व विकासाबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे मार्गदर्शन घेतल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
सभापती रमेश तवडकर यानी मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याचे सूतोवाच केल्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे २०२५ - २०२६ वर्षाचा अर्थसंकल्प २६ मार्च रोजी सादर करतील. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दिल्ली भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.