उकाड्यामुळे मागणीत वाढ; एक लिंबू १० रुपये

पणजीत भाज्या महागच; मानकुराद आंबा अद्यापही सामान्यांच्या आवाक्याबाहेर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
18 hours ago
उकाड्यामुळे मागणीत वाढ; एक लिंबू १० रुपये

पणजी : असह्य उकाड्यामुळे फळांबरोबर लिंबूसोडाच्या सेवनात वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून लिंबू १० रुपयांवर पोचला आहे. पणजी बाजारात ५० रुपयांना ५ ते ६ लिंबू दिले जातात. आंब्यांची आवक वाढली असली तर मानकुराद आंबा अद्याप सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. मानकुराद आंब्याचा दर ३ हजार रुपये डझन असा आहे. मानकुरादच्या तुलनेत हापूस व इतर आंबे स्वस्त आहेत.

पणजी बाजारात फेरफटका मारला असता आंब्यांचा दरवळ अनुभवता येतो. मानकुराद, हापूस, पायरी व इतर प्रकारचे आंबे मुबलक प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पायरी आंबा १ हजार रुपये डझन तर हापूस आंब्याचा दर प्रति डझन २ हजार रुपये आहे. दर उतरल्याने बरेच जण पायरी व हापूस आंबा खरेदी करण्यास पसंती देतात. मानकूरच्या वाटेला मात्र सहसा कोणी जात नाही, अशी माहिती विक्रेत्यांकडून मिळाली.

भाज्यांचा विचार करता सर्व भाज्यांचे दर चढेच आहेत. मात्र वालपापडी व मिरची इतर भाज्यांपेक्षा महाग आहे. वालपापडीचा दर १२० रुपये किलो तर मिरची १२० रुपये ते १६० रुपये किलो आहे. जातीप्रमाणे मिरचीच्या दरात फरक आहे.

बटाटे ५० रुपये, टॉमेटो ४० रुपये, कांदा ५० रुपये, काकडी ५० रुपये, गाजर ६० रुपये प्रति किलो असे दर आहेत. मागील आठवड्यात ४० रुपये किलो मिळणारा कोबी आता ५० रुपयांवर पोचला आहे. फ्लावर ३० ते ४० रुपये, वांगी ६० ते ८० रुपये, दोडकी, भेंडी, कारली प्रत्येकी ८० रुपये प्रति किलो आहे.

कोथिंबिरची जुडी २० रुपये, कांदा पात १० रुपये, मेथी २० रुपये असा दर आहे. पणजी बाजारात अंड्यांचा भाव २०० रुपये डझन आहे.

नारळाचे दर चढेच असून सर्वांत लहान नारळ ३० रुपयांना मिळतो. मोठ्या नारळाचा दर ४० ते ४५ रुपये आहे.

हेही वाचा