सद्यस्थितीत योजनेची २.१६ लाख खाती; लोकसभेतील लेखी उत्तरातून आले समोर
पणजी : प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात येणाऱ्या खात्यांचा आकडा राज्यात वाढत चालला आहे. सद्यस्थितीत राज्यात या योजनेअंतर्गत २.१६ लाख खाती असल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आले आहे.
आर्थिक सेवांचा लाभ देशातील गरीब आणि वंचित जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने २८ ऑगस्ट २०१४ रोजी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. बँक खाते उघडणे, बँकिंग सुविधा प्रदान करणे, आर्थिक साक्षरता वाढवणे आणि लोकांना विमा तसेच पेन्शन सेवा उपलब्ध करून देणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. योजनेअंतर्गत शून्य रुपये भरून बँकेत खाते उघडता येते. सोबत डेबिट कार्ड मिळते व एक लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरविला जातो. खाते उघडल्यानंतर ६ महिन्यांनी खातेदारला पाच हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
दरम्यान, सुरुवातीपासूनच गोव्यातील लाखो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत, बँकांमध्ये खाती उघडली. त्यानंतर प्रत्येक वर्षी त्यात वाढ होत गेली. २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत २.१६ लाख गोमंतकीयांनी योजनेअंतर्गत खाती उघडल्याचे मंत्री चौधरी यांनी उत्तरात दिलेल्या आकडेवारीतून दिसून येते.