पणजी : सध्याच्या तरुण पिढीमध्ये ज्येष्ठ नागरिकांविषयी सहानुभूती निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांनी व्यक्त केले. मंगळवारी व्ही एम साळगावकर महाविद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ शबेर अली, सहाय्यक प्राध्यापिका रुचिरा नाईक, क्रॉप संस्थेच्या संचालिका डॉ. संध्या राम, इरम खत्री आदी उपस्थित होते.
पंचवाडकर यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार काम करत आहे. काही एनजीओ जेष्ठ नागरिकांना त्यांच्या अधिकारांबाबत माहिती देत आहे. तर काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे काम होत आहे. ही सर्व कामे करणे आवश्यकच आहे. मात्र मुळात जिथे कर्तव्याची कमतरता आहे तिथेच अधिकाराची जाणीव करून द्यावी लागते. म्हणजेच एका अर्थाने अधिकार ही संकल्पना नकारात्मक देखील आहे.
ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अधिकारांची माहिती देतानाच आपण तरुणांना त्यांची ज्येष्ठ नागरिकांना प्रति असलेली कर्तव्य काय आहेत हे देखील समजावून सांगितले पाहिजे. यासाठी एनजीओंनी किंवा महाविद्यालयांनी तरुणांमध्ये जागृती केली पाहिजे. गोव्यात आरोग्य सुविधा चांगल्या असल्यामुळे वयोमान वाढत आहे. सध्या गोव्यात सुमारे ११ टक्के लोकसंख्या जेष्ठ नागरिक आहेत. भविष्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वांना खूप काम करावे लागेल.
डॉ. संध्या राम यांनी सांगितले की, क्रॉप संस्थेतर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, त्यांच्याविषयीचे कायदे याबाबत माहिती दिली जाते. याची सविस्तर माहिती असणारी पुस्तिका आज प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य, देखभाल, मालमत्ता हस्तांतरण अधिकार, राज्य सरकारच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजना आदींची माहिती देण्यात आली आहे. ही पुस्तिका अधिकाधिक जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.