तुम्ही स्वतःला बाहेरून पाहू शकता का?

"आयुष्य एक स्वप्न आहे, पण स्वप्न खरे आहे." ती वस्तुस्थिती आहे. तुमच्या आत सध्या ज्या पद्धतीने हे घडत आहे, ते पाहता, जीवन एक स्वप्न आहे, पण तुमच्या अनुभवात ते स्वप्न खरे आहे. पण तुम्ही हे स्वप्न तुम्हाला हवे तसे साकार करू शकता.

Story: विचारचक्र |
16th March, 09:19 pm
तुम्ही स्वतःला बाहेरून पाहू शकता का?

प्रश्न : मानवी बुद्धिमत्तेची अशी पातळी गाठण्यासाठी काही तंत्रे आहेत का जेणेकरून तुम्ही बाहेरून स्वतःचे निरीक्षण करू शकता?

सद्गुरू : याबद्दलचा माझा अनुभव मी तुम्हाला सांगितलाच पाहिजे. आता मी स्वतःला अशी अपमानास्पद वागणूक देत नाही, पण बऱ्याच वर्षांपूर्वी, हे घडले, मी भारतातील एका संस्थेत होतो आणि त्यांना माझ्या मेंदूतील गॅमा लहरी मोजायच्या होत्या. त्यांनी मला ध्यान करायला सांगितले. मी म्हणालो, "मला ध्यान माहीत नाही." ते म्हणाले, "पण तुम्ही सर्वांना ध्यान शिकवता." मी म्हणालो, “हो, लोकांना फक्त शांत कसे बसायचे हे माहीत नसल्यामुळे, आम्ही त्यांना ते कसे करायचे हे शिकवतो. जर तुम्हाला हवे असेल तर मी शांत बसेन."

त्यांनी माझ्यावर १४ इलेक्ट्रोड लावले आणि मी तिथे नुसता बसून राहिलो. सुमारे १५ ते २० मिनिटांनी, त्यांनी माझ्या गुडघ्यावर धातूच्या वस्तूने मारायला सुरुवात केली. मी विचार केला, "ठीक आहे, त्यांच्या प्रयोगाचा हा एक भाग, असावा," आणि तिथेच बसून राहिलो. मग त्यांनी माझ्या घोट्याच्या हाडावर मारायला सुरुवात केली - ती खूप संवेदनशील जागा असते. मी अजूनही विचार करत होतो, "ठीक आहे, हा त्यांचा प्रयोग आहे," पण तो दीर्घ काळ चालू राहिला आणि अत्यंत वेदनादायक बनला.

मी हळूच माझे डोळे उघडले. ते सर्व माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. मी विचारले, "माझ्याकडून काही चूक घडली का?" ते म्हणाले, "आमच्या उपकरणानुसार तुम्ही मृत आहात." मी म्हणालो, "हे तर एक उत्तम निदान आहे." मग ते म्हणाले, "तुम्ही एकतर मृत आहात, किंवा तुमचा मेंदू मृत आहे." मी म्हणालो, “हे तर खूप अपमानास्पद आहे. मी पहिले निदान स्वीकार करेन. जर तुम्ही मला मृत झाल्याचे प्रमाणपत्र दिले तर मी ते घेऊन जगू शकतो. जर तुम्ही मला मी ब्रेनडेड असल्याचे प्रमाणपत्र दिले तर - ते ठीक  नाही.

मी हे का म्हणतोय, कारण मानवांनी निर्माण केलेली सर्व साधने मानवी प्रणालीपेक्षा कमी दर्जाची आहेत. टेलिफोनद्वारे उच्चारलेला शब्द एखाद्या मानवाला शक्य होईल त्याहून जास्त अंतरापर्यंत प्रसारित होऊ शकतो. एखादी सायकल, आपण धावू शकतो त्यापेक्षा वेगाने जाऊ शकते; मोटारसायकल त्याहून अधिक वेगाने जाऊ शकते; विमान उडू शकते. याचा अर्थ असा की, एखाद्या विशिष्ट कृतीच्या बाबतीत ते आपल्यापेक्षा चांगले असू शकतात. पण अद्ययावतपणाच्याबाबतीत, ती सर्व कमी दर्जाची साधने आहेत.

ती मानवापेक्षा जास्त अद्ययावत असू शकत नाहीत, कारण आपण स्वतःपेक्षा जास्त अद्ययावत असे काहीही निर्माण करू शकत नाही. म्हणून, मोजमाप करणाऱ्या यंत्रांचा वापर मर्यादित आहे. तुम्ही मेंदूला सहज चकवू शकता - हे करण्यासाठी योगामध्ये अनेक तंत्रे आहेत. कोणत्याही वैज्ञानिक उपकरणांशिवायही, मानवी मनाला चकवण्याचे अनेक मार्ग आहेत.

जगातील जादूगारांनी या युक्त्यांमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. तुमच्यासोबत काय घडत आहे हे तुम्हाला कळल्याशिवाय ते तुमच्या खिशातून वस्तू काढून घेऊ शकतात. त्याशिवाय, मूलभूत अद्ययावतपणाच्या बाबतीत, मानवी व्यवस्थेपेक्षा अधिक अद्ययावत असे काहीही नाही. हे एकमेवाद्वितीय गॅझेट आहे, आणि तुमच्यासाठी जग अनुभवण्याचा एकमेव मार्ग आहे.

तुम्ही काय अनुभवता, कसे अनुभवता तुम्ही सध्या जग कसे अनुभवता ते पाहूया. तुम्ही सगळे मला पाहू शकता. जर मी कुठे आहे हे दाखवायचे झाले तर तुम्ही व्यासपीठाकडे बोट दाखवाल. पण तुम्ही सगळे चुकत आहात. प्रकाश माझ्यावर पडतो, परावर्तित होतो आणि तुमच्या नेत्रपटलावर एक उलटी प्रतिमा तयार करतो - तुम्हाला हे सर्व माहीत आहे. तुम्ही मला स्वतःमध्ये पाहता. तुम्ही जगात जे काही पाहिले आहे ते तुम्ही स्वतःमध्ये पाहिले आहे. तुमच्यासोबत जे काही घडले ते फक्त तुमच्या आतच घडले.

जर कोणी तुमच्या हाताला स्पर्श केला तर तुम्हाला वाटते की, तुम्हाला त्यांचा हात जाणवत आहे, पण प्रत्यक्षात तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या हातातील संवेदना जाणवतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्याला पाच वेळा तुमच्या हाताला स्पर्श करायला लावला, तर तुम्हाला दिसेल की नंतर, कोणीही तुम्हाला स्पर्श न करता, ती व्यक्ती तुमच्यासोबत नसतानाही, तुम्ही तुमच्या आत तीच संवेदना निर्माण करू शकता. तुम्ही एकतर बाह्य उत्तेजनांचा वापर करून संवेदना निर्माण करू शकता किंवा तुम्हाला हवे ते आंतरिकरित्या निर्माण करू शकता.

काही प्रमाणात, जवळजवळ प्रत्येक मनुष्य बाह्य उत्तेजनांशिवाय, नेहमीच, अनेक वेगवेगळ्या प्रकारे विविध अनुभव निर्माण करत असतो. जेव्हा ते नियंत्रणाबाहेर जाते, तेव्हा आपण त्याला मानसिक समस्या किंवा मानसिक आजार मानतो. पण प्रत्येकजण काही प्रमाणात हे करत असतो. तुम्ही स्वप्नात असता तेव्हा ते वास्तवाइतकेच खरे असते. काही वर्षांपूर्वी, एके दिवशी, मी ईशा होम स्कूलमध्ये गेलो तेव्हा एक मुलगा माझ्याकडे आला आणि विचारले, "सद्गुरू, जीवन हे वास्तव आहे की स्वप्न?" मी त्याच्याकडे पाहिले - हा आठ वर्षांचा मुलगा होता, म्हणून तुम्हाला खरे सांगावे लागेल - आणि मी म्हणालो, "आयुष्य एक स्वप्न आहे, पण स्वप्न खरे आहे." ती वस्तुस्थिती आहे. तुमच्या आत सध्या ज्या पद्धतीने हे घडत आहे, ते पाहता, जीवन एक स्वप्न आहे, पण तुमच्या अनुभवात ते स्वप्न खरे आहे. पण तुम्ही हे स्वप्न तुम्हाला हवे तसे साकार करू शकता.

तुम्हाला एक विनोद सांगू का? एका विशिष्ट दिवशी, एक महिला झोपी गेली. झोपेत तिला एक स्वप्न पडले. तिच्या स्वप्नात, तिला एक धष्टपुष्ट माणूस उभा असलेला दिसला, जो तिच्याकडे एकटक पाहत होता. तो अधिकाधिक जवळ येऊ लागला. तो इतका जवळ आला की, तिला त्याचा श्वासही जाणवू लागला. ती शहारून गेली. मग तिने विचारले, "तू मला काय करशील?" तो माणूस म्हणाला, "हे बघ बाई - हे तुझं स्वप्न आहे!" ते तुमचे स्वप्न आहे - तुम्ही त्यातून तुम्हाला जे काही हवे आहे ते निर्माण करू शकता. आपण हे स्वतःसाठी आणि पृथ्वीवरील प्रत्येकासाठी एक विलक्षण स्वप्न बनवू शकतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी अद्भुत गोष्टी केल्या आहेत, परंतु मला असे वाटते की, शास्त्रज्ञांनी ध्यान केले पाहिजे. 


- सद् गुरू

ईशा फाऊंडेशन