सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनीही सावध राहण्याची गरज आहे. पैशांचे व्यवहार करताना ते सुरक्षित मार्गानेच करावेत. काही संशय आल्यास व्यवहार टाळून सायबर पोलिसांचा सल्ला घ्यावा किंवा त्यांना त्याची कल्पना द्यावी.
गोव्यात सायबर गुन्ह्यांतून लोकांना लुटण्याचे प्रकार थांबत नाहीत. मागील काही दिवसांत नवे नवे प्रकार समोर आले. आपण सीबीआय, कस्टमचे अधिकारी असल्याचे सांगून व्हिडिओ कॉलद्वारे लोकांना फसवून पैसे उकळणारे नवे घोटाळेबाज तयार झाले. त्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारला नवी मोहीम राबवावी लागली. तरीही लोक फसत आहेत. जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेणे, बँकेच्या एटीएम कार्डचा पीन क्रमांक मागून फ्रॉड करणे, शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांना लुबाडण्याचे प्रकार सुरूच आहेत. गोव्यातच १४९ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या. देशभरात ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून ३६ हजार कोटींची फसवणूक झाल्याची नोंद केंद्राच्या राष्ट्रीय सायबर गुन्हेगारी रिपोर्टिंग पोर्टलवर आहे. हे पोर्टल सायबर फ्रॉड झाल्यास तत्काळ आपली तक्रार दाखल करण्यासाठी तयार केले आहे. २०२० मध्ये या पोर्टलची सुरुवात झाली. तेव्हापासून फेब्रुवारी २०२५ पर्यंत देशभरात ३८ लाख २२ हजार जणांनी आपल्या सोबत घडलेल्या सायबर लुबाडणुकीच्या घटना नोंदवल्या. ३६ हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली, त्यातील फक्त ६० कोटी रुपये पुन्हा मिळवता आले. सुमारे ४,३८० कोटींच्या मालमत्ता गोठवण्यात आल्या. यातून ज्यांचे पैसे गेले त्यांना ते परत मिळण्याची शक्यता किती कमी आहे, ते लक्षात येते. त्यामुळे अशा सायबर लुटारूंना आवर घालण्याचे आव्हान तपास यंत्रणांवर आहे. गोव्यातून ६,०५२ घटनांची नोंद या पोर्टलमध्ये झाली आहे. प्रत्यक्षात इतक्या तक्रारी, मात्र गोव्यातील पोलिसांच्या सायबर सेलकडे आलेल्या नाहीत. फक्त राष्ट्रीय पोर्टलवर घटना नोंदवल्या जातात, प्रत्यक्षात पोलिसांना या घटनांची कल्पना देण्यासाठी लोक पुढे येत नाहीत हेही सत्य आहे.
१४९ कोटींची फसवणूक ही फक्त सायबर गुन्ह्यांतून झाली आहे. त्याव्यतिरिक्त चीट फंड, जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेणे, मालमत्ता विक्रीच्या नावाखाली फसवणूक करणे अशा अनेक प्रकारच्या फसवणुकींचा सामना गोव्यातील नागरिक करत आहेत. गेलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा तेवढ्या मोठ्या प्रमाणात काम करत नाही. मनुष्यबळ आणि तांत्रिक यंत्रणेची कमतरता असल्यामुळे आलेली तक्रार लिहून घेईपर्यंत सायबर गुन्हेगार पैसे घेऊन पसार झालेले असतात. त्यांचा पत्ता सापडणे कठीण होते. त्यामुळे सायबर लुबाडणूक थांबवण्यासाठीच विशेष प्रयत्न व्हायला हवेत. नागरिकांमध्ये सायबर लुबाडणुकीच्या घटनांबाबत जागृती करण्याची जास्त गरज आहे.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनीही सावध राहण्याची गरज आहे. पैशांचे व्यवहार करताना ते सुरक्षित मार्गानेच करावेत. काही संशय आल्यास व्यवहार टाळून सायबर पोलिसांचा सल्ला घ्यावा किंवा त्यांना त्याची कल्पना द्यावी. सुरक्षित पीन, पासवर्डचा वापर करणे, ते वारंवार बदलणे, मोबाईल किंवा अन्य गॅझेटसाठी अँटिवायरस सॉफ्टवेअर घेणे अशा गोष्टी सायबर सुरक्षेसाठी उपयुक्त ठरतात. बहुतेकांच्या हाती फोन आले आहेत. बँकेचे व्यवहार म्हणा किंवा पैसे हस्तांतरित करण्याचे काम मोबाईलद्वारेच होते. त्याच मोबाईलवर आमिष दाखवणारे अनेक फोन कॉल्स येतात. आर्थिक लाभ मिळेल असे सांगणाऱ्या अनेक लिंक येतात. ऑनलाईन कर्ज देण्याचे आमिष, ऑनलाईन उत्पन्न दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जाते. फोनवरून दिल्या जाणाऱ्या आमिषांना, फोनवर येणाऱ्या ऑनलाईन लिंकना बळी पडू नये. यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आणि आपले पैसे योग्य बँकेत, योजनेत गुंतवून ठेवणे, हेच उपाय आहेत. रात्रीत किंवा दिवसात कोणीही पैसे दुप्पट करून देऊ शकत नाही. पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष देणारे ठग ऑनलाईनवर दिवसाला शंभर भेटतात. त्यांच्यापासून अंतर ठेवणे, हेच सर्वांसाठी सुरक्षित आहे. गोव्यातून पाच वर्षांत ६ हजार तक्रारी नोंद होतात. त्यातून १४९ कोटी रुपयांना गोव्यातील सहा हजार तक्रारदार गंडवले गेले, हेही स्पष्ट होते पण यातून शहाणे न होता नव्या आमिषांना, नव्या फसवणुकींच्या योजनांना बळी पडणे सुरूच आहे. गोव्यातील सहा हजार जणांचे १४९ कोटी रुपये सायबर गुन्हेगारांनी लांबवले, यावरून देशभरात ही साखळी किती मोठी असेल त्याची कल्पना करा. ही आकडेवारी फक्त पोर्टलवरची आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या दरवर्षी देशात हजारो तक्रारी येतात. या फसवणुकीला बळी न पडण्यासाठी सावध राहणे आणि काही संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित पोलिसांची मदत घेणे, हेच उपाय आहेत.