वाळवे सर्कलचे उद्घाटन अडविणे योग्य होते काय?

पालिका परवान्याची गरज आहे ही गोष्ट आयोजकाच्या निदर्शनास आणली असती तर उद्घाटन लांबणीवर टाकता आले असते. अशा परिस्थितीत उद्घाटनाचा औपचारिक सोहळा आटोपल्यानंतर वाळवे सर्कलचे उद्घाटन अडविणे योग्य होते काय?

Story: विचारचक्र |
13th March, 10:15 pm
वाळवे सर्कलचे उद्घाटन अडविणे योग्य होते काय?

"वाहतूक बेटाला वाळवे सर्कल नाव देण्यास बोर्डे कोमुनिदादचा आक्षेप" ही बातमी वाचून सखेद दु:ख झाले. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले बोर्डे कोमुनिदादचे अध्यक्ष पुंडलिक पळ व इतर पळ कुटुंबियांनी या नामकरणास विरोध केला आहे. या  नामकरणास डिचोली पालिकेची मान्यता नसल्याचे या विरोधकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी गोवा सरकारच्या एका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, सदर बेट रस्त्यावर उभारण्यात आलेले असल्याने तो परिसर पालिकेच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे सदर नामकरणास डिचोली पालिकेची मान्यता घेण्याची गरज नाही. पणजील अटल सेतू किंवा काणकोण येथील मनोहर सेतूचे नामकरण करताना पणजी महापालिका किंवा काणकोण तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीने ठराव घेतल्याची बातमी वाचनात आलेली नाही. व्हाळशी बगल मार्ग बांधला जात असताना गोवा सरकारने ही जमीन ताब्यात घेतलेली असणार. तशी घेतलेली नसती तर बोर्डे कोमुनिदादने बायपासचे काम नक्कीच अडविले असते.

"वाळवे सर्कल" असे नामकरण करण्यास विरोध का, हे कळत नाही. सुरेश वाळवे सर्कल असे नामकरण केले असते आणि त्याला कोणी आक्षेप घेतला असता तर समजण्यासारखे असते. पण वाळवे घराण्याला विरोध व्हावा, ही गोष्ट मनाला पटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात ज्यांचा उल्लेख केलेला आहे, अशा वाळवे कुटुंबाच्या नावाला शेजारच्या बोर्डे गावातील क्षत्रियकुलवंतांनी आक्षेप घ्यावा, ही गोष्ट मनाला पटत नाही. गोवा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा काहीच संबंध नव्हता. गोवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली कधीच नव्हता, असा धडधडीत खोटा दावा करून इतिहासाशी प्रतारणा करणारे काही जण गोव्यात आहेत. छत्रपतींनी वाळवे कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाला दिलेले अभयपत्र नसते तर भतग्राम छत्रपतींच्या अधिपत्याखाली कधीच नव्हते, हा इतिहासकारांचा दावा सत्य ठरला असता. "वाळवे घराण्याचा इतिहास" हे पुस्तक राजेंद्र केरकर या अभ्यासू शिक्षकाने लिहिलेले आहे. शिवकालीन इतिहास समजून घ्यायचा असल्यास ही पुस्तिका उत्तम संदर्भ पुस्तिका आहे. वाळवे सर्कल नामकरणास विरोध करणाऱ्यांना सुरेश वाळवे यांनी या पुस्तकाच्या काही प्रती सप्रेम भेट दिल्या पाहिजेत.

इतिहास अभ्यासक सचिन मदगे यांनी वाळवे घराण्याला छत्रपतींनी दिलेल्या अभयपत्राचा संदर्भ घेऊन भतग्रामवरील मराठा साम्राज्याचा उत्तम आढावा घेऊन प्रतिवाद केला आहे. वाळवे घराणे बोर्डे गावाला जोडूनच असलेल्या व्हाळशी गावातच गेली किमान ३५० वर्षे वास्तव्यास आहेत. वेदशास्त्रसंपन्न अशा या घराण्याने आपली पौरोहित्य परंपरा चालू ठेवली. सुरेश वाळवे यांनी ही परंपरा सोडून वेगळा मार्ग पत्करला. गोरागोमटा असलेल्या या तरुणाला अभिनयाची विशेष आवड. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन धडक दिली. पण नशिबाने दगा दिला. प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली नाही. फिल्म इंडस्ट्रीत संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या वाळवेंनी नाट्य सेवा चालू ठेवली. आपले गुरू चंद्रकांत केणी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पत्रकारितेत झोकून दिले. त्यानंतर पणजीत येऊन दै. नवप्रभात रुजू झाले. तेथे असताना त्यांनी नव्या पिढीतील तरुणांना मराठी लेखनाचे महाद्वार खुले केले.

गोव्यातील ६०-७० लेखक, साहित्यिकांनी आपली पुस्तके वाळवेंना अर्पण केली असणार, यावरून त्यांच्या कार्याची ओळख पटते. आपल्या व्हाळशी गावाबद्दल त्यांना अतीव प्रेम. गावात मराठी प्राथमिक शाळा बांधण्यासाठी जमीन पाहिजे असे गावकऱ्यांनी म्हटले आणि वाळवे कुटुंबाने आपली जमीन दान दिली. गावात हवे ते सभागृह, व्यासपीठ, रंगमंच, वाचनालय आदी सर्व सुविधा आपल्या खिशातील पैसे खर्च करून व्हाळशीला पुरविल्या आहेत. नगरसेवक, आमदार, मंत्री नसतानाही गावात साधनसुविधा उपलब्ध  करून देण्याची अशाप्रकारची कामे गोव्यात आणखी कोणी केली असतील, असे मला तरी वाटत नाही. अशा या दानशूर व्यक्तीला "भतग्राम भूषण" या डिचोली तालुक्यातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अगदी अलीकडे आपला अमृत महोत्सव साजरा केलेल्या या भतग्राम भूषण व्यक्तीचे नाव व्हाळशी बायपास सर्कलला द्या, अशी मागणी बोर्डे कोमुनिदादने केली असती तर ती अधिक संयुक्तिक ठरली असती. त्यांच्या मनाचा दिलदारपणा दिसून आला असता. बोर्डे कोमुनिदादचे पदाधिकारी हे सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असल्याने बुधवारी घडलेला प्रकार मुळीच  अपेक्षित नव्हता. 

वाळवे हे कोणी उद्योजक किंवा राजकीय नेते नाहीत. ते संपादक म्हणून नोकरी करत होते. पत्रकारांना समाजात मान सन्मान असला तरी इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पगार कमीच असतो. त्यामुळे पत्रकार आपल्या पगारात आपल्या कुटुंबाचे योग्य पद्धतीने पालन पोषण करू शकत नाही, मग दानधर्म व लाखो रुपये खर्चून विकास कामे कशी करणार? वाळवे यांनी व्हाळशी गावात साधनसुविधा निर्माण करण्यासाठी जे लाखो रुपये खर्च  केले, ते कुळागारातील सुपारी विकून गोळा केलेल्या  पैशांतूनच असणार, असा माझा अंदाज आहे.

व्हाळशी सर्कलचे वाळवे सर्कल असे नामकरण करण्यात येणार याची माहिती ६ ऑक्टोबर २०२४ रोजी डिचोलीतच झालेल्या वाळवे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिन सोहळ्यात दिली होती. सदरचे पेन ८ दिवसांपूर्वी बसविण्यात आले होते. बोर्डे भागातील नागरिकांचा सदर योजनेला विरोध असता तर त्यांनी सुरेश वाळवे किंवा नगराध्यक्ष नाटेकर यांना भेटून विरोध व्यक्त करता आला असता. नगरपालिकेचा ठराव हवा ही गोष्ट लक्षात आली असती तर तसा ठराव संमत करून घेता आला असता. पेनची उभारणी करणाऱ्या लोकांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यापासून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एमटीएस कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांकडे पाठपुरावा करून आवश्यक ते सर्व परवाने मिळवले होते. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या वाहतूक बेटाचे नामकरण करण्यासाठी पालिका परवान्याची गरज नाही, असा समज होता.

पालिका परवान्याची गरज आहे, ही गोष्ट आयोजकांच्या निदर्शनास आणली असती तर उद्घाटन सोहळा लांबणीवर टाकता आला  असता. अशा परिस्थितीत उद्घाटनाचा औपचारिक सोहळा आटोपल्यानंतर वाळवे सर्कलचे उद्घाटन अडविणे योग्य होते काय? डिचोली पालिकेने आता आवश्यक ते सर्व सोपस्कार पूर्ण करून वाळवे सर्कलचे पुन्हा एकदा औपचारिक अनावरण केले पाहिजे.


गुरुदास सावळ

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)