काँग्रेसला मोठा धक्का, भाजपची बाजी

तेलंगणा

Story: राज्यरंग |
11th March, 12:13 am
काँग्रेसला मोठा धक्का, भाजपची बाजी

तेलंगणात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. मात्र, आता काँग्रेसला तेलंगणात मोठा धक्का बसला आहे. तेलंगणात विधान परिषदेच्या तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तीनपैकी दोन जागा भाजपने जिंकल्या. तर, एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली. काँग्रेसने लढवलेली एकमेव जागाही त्यांना जिंकता आली नाही.  

तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप समर्थित उमेदवारांनी तीनपैकी दोन जागा जिंकल्या. २०२३ च्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस पक्षाची सत्ता उलथवून तेलंगाणामध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. मात्र, त्यानंतर राज्यात भाजपनेही आपला जोरदार विस्तार केला. लोकसभा निवडणुकीत भाजपने तेलंगणामध्ये आठ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर आता विधान परिषदेच्या दोन जागांवर मिळालेल्या विजयाने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. तर, काँग्रेस सरकारसमोर भाजपचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सी. अंजी रेड्डी यांनी मेडक-निजामाबाद-आदिलाबाद-करीमनगर पदवीधर मतदारसंघात ५ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेसचे टी. जीवन रेड्डी प्रतिनिधित्व करत होते. तसेच मलका कोमरैया यांनी मेडक-निजामाबाद - आदिलाबाद-करीमनगर शिक्षक मतदारसंघात प्रोग्रेसिव्ह रेकग्नाइज्ड टीचर्स यूनियनच्या व्ही. महेंद्र रेड्डी यांचा पराभव करून विजय मिळवला. 

वारंगल-खम्मम-नलगोंडा शिक्षक मतदारसंघातील तिसरी एमएलसी जागा पीआरटीयूचे अपक्ष उमेदवार पी. श्रीपाल रेड्डी यांच्याकडे गेली. मेडक, निजामाबाद, आदिलाबाद आणि करीमनगर या चारही लोकसभा जागांवर भाजपचे खासदार आहेत. एम. रघुनंदन राव मेडकमधून, तर डी. अरविंद हे निजामाबादमधून तसेच गौडम नागेश आदिलाबादमधून खासदार आहेत आणि केंद्रीय राज्यमंत्री बंदी संजय कुमार करीमनगरमधून खासदार आहेत. त्यामुळे भाजपला ही जागा जिंकणे सोपे होते.

भाजपने तिन्ही जागांसाठी उमेदवार उभे केले होते, तर सत्ताधारी काँग्रेसने फक्त पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवली होती. बीआरएस निवडणुकीपासून दूर राहिले. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, बंदी संजय कुमार आणि इतर भाजप नेत्यांनी निवडणुकीत जोरदार प्रचार केला. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी, तेलंगणा काँग्रेस युनिटचे अध्यक्ष बी. महेश कुमार गौड आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचार केला. मात्र, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

प्रसन्ना कोचरेकर