कलेच्या क्षेत्रात आजकाल गोव्यात 'रात्र थोडी सोंगे फार' अशीच काहीशी परिस्थिती झालेली पहायला मिळते. याचा प्रत्यक्ष अनुभव 'कल्पवृक्ष कन्येसाठी' कार्यक्रमाच्या आयोजनावेळी मडगाव, पणजी आणि साखळी येथेही आम्ही घेतला.
गोवा मराठी पत्रकार संघाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईतील सृजन विरार या नामांकित संस्थेची निर्मिती असलेल्या 'कल्पवृक्ष कन्येसाठी' या जनकवी पी. सावळाराम यांच्या अजरामर गीतांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमांचे तीन ठिकाणी आयोजन केले. मडगावचे रवींद्र भवन आणि कला अकादमीतील प्रयोगांचे आयोजन पत्रकार संघाकडे होते तर साखळी येथील प्रयोग आमच्या सहकार्याने रवींद्र भवनने आयोजित केला होता. पस्तीस चाळीस दिवसांआधीच तिन्ही थिएटर राखून ठेवण्यासाठीचे सोपस्कार केले गेल्यामुळे कार्यक्रमांच्या प्रत्यक्ष आयोजनावेळी कोणत्याही अडचणी निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता. प्रयोग सादर करणाऱ्या संस्थेच्या संचात नामवंत पार्श्र्वगायिका माधुरी करमरकर, धनंजय म्हसकर, प्रज्ञा गावंड, सारेगमपची लिटल स्टार पलाक्षी दीक्षित अशा अनेक गायक कलाकारांचा समावेश तर होताच पण त्याचबरोबर प्रत्यक्ष पी. सावळाराम यांच्यासमवेत वादक कलाकार म्हणून त्यांना साथ देणारे एक दोन वादकही या संचात असल्याने सुजाण गोवेकर रसिकांनी या प्रयोगांना दाद देणे अपेक्षितच होते. झालेही तसेच, तरीही आयोजक या नात्याने आमच्यावर अनेक रसिकांनी राग व्यक्त करून वेळेत प्रयोग सुरू न केल्याबद्दल आम्हाला धारेवर धरले आणि असे दर्जेदार प्रयोग अर्ध्यावर सोडून जाण्याची पाळी आमच्यावर आणू नका, असेही आम्हाला सुनावले. रसिकजनांना राग येणे ही काही नवी बाब नाही, पण हे सर्व टाळता येणे शक्य आहे काय? हा खरा प्रश्न आहे.
कला अकादमी असो वा अन्य एक दोन ठिकाणी याआधी नाट्यप्रयोग वा एखादा कार्यक्रम प्रत्यक्ष वेळीच सुरू न झाल्याने गडबड गोंधळ करणाऱ्या रसिकजनांमध्ये मीही काही वेळा समाविष्ट झालो होतो, त्यामुळे रसिकांच्या त्यावेळच्या भावना समजू शकतो. पण एक आयोजक म्हणून रसिक प्रेक्षकांना सामोरे जाण्याची वेळ 'कल्पवृक्ष कन्येसाठी'च्या प्रयोगांमुळे प्रथम मडगाव येथील रवींद्र भवनात तर दुसऱ्याच दिवशी पणजीला कला अकादमीत गोवा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्याने माझ्यावर आली आणि आयोजकांना काही वेळा कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते, यास यानिमित्ताने का होईना वाचा फोडण्यासाठी हा प्रपंच करत आहे. अर्थातच याकरिता कोणावरही खापर फोडणे, हा या लेखाचा हेतू मुळीच नाही तर एकूण व्यवस्थेत सुधारणा होऊन रवींद्र भवन वा कला अकादमीने आयोजक संस्थांना त्यांनी मोठ्या मेहनतीने म्हणा वा कष्टाने सादर केलेल्या कार्यक्रमांचा पुरता विचका होण्यापासून किंचित दिलासा दिला तर हा लेखप्रपंच सार्थकी लागला, असे मी समजेन. कला अकादमी वा रवींद्र भवनातील अव्यवस्थेचा फटका मायबाप रसिक प्रेक्षक आणि आयोजक संस्था यांना यापुढे निदान बसू नये, असे मला प्रांजळपणे वाटते आणि मागील शुक्रवार आणि शनिवारी आयोजक या नात्याने पत्रकारांच्या या संस्थेला आलेल्या कटू अनुभवांवर लिहिणे रास्त असल्याचे मी मानतो.
कलेच्या क्षेत्रात आजकाल गोव्यात 'रात्र थोडी सोंगे फार' अशीच काहीशी परिस्थिती झालेली पहायला मिळते. याचा प्रत्यक्ष अनुभव आमच्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्यावेळी मडगाव, पणजी आणि साखळी येथेही आम्ही घेतला. सगळीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांची असलेली रेलचेल पाहता एखाद्या कार्यक्रमाचे रितसर आणि सुनियोजित आयोजन करण्यास वाव देणे, हे प्रत्येक ठिकाणच्या व्यवस्थापनासाठी एक आव्हानच असते. कटाक्षाने काही गोष्टी टाळल्या तर निश्चितच यात काही सुधारणा होण्याची आशा बाळगता येईल. मडगाव रवींद्र भवनाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे तर आमचे बऱ्याच काळापासूनचे मित्र. त्यांनी सर्व ते सहकार्य आम्हाला केले, हे मान्य करावेच लागेल तरीही एकूण व्यवस्थेला जी काही दिशा बऱ्याच काळापासून मिळाली आहे त्यात किंचित बदल झाल्यास खूप काही दिलासा आयोजक संस्थांना मिळू शकतो. शुक्रवारी असेच काहीसे झाले आणि साडेसात वाजता सुरू व्हायचा आमचा प्रयोग जवळ जवळ पावणे नऊ वाजता सुरू करेपर्यंत आमची जी दमछाक झाली त्याचे येथे शब्दांत वर्णन करता येणार नाही. ज्या थिएटरात आमचा कार्यक्रम होता तेथे आधी एका शालेय संस्थेचे स्नेहसंमेलन असल्याने वेळीच स्टेजचा ताबा मिळणे कठीण झाले. सात वाजता स्टेजचा ताबा मिळाल्यानंतर अर्ध्या तासात कोणताही कार्यक्रम, मग तो अगदी साधा का असेना, सुरू करणे अशक्यच असते. आमचा कार्यक्रम तर संगीताचा, नामवंत गायकांचा. मग होणारी धावपळ आणि रसिकांच्या येणाऱ्या दबावातून होणाऱ्या चुका याला सीमा नसते.
गायकांच्या बैठकीसाठी जे प्लॅटफॉर्म लागतात ते निदान व्यवस्थित मिळावेत अशी अपेक्षा असते, पण येथे नेमके झाले काय तर दुसरीकडे चालू असलेल्या 'नाट्यानंद' या कार्यक्रमासाठी प्लॅटफॉर्म उचलले गेले होते आणि आयोजक संस्थेची त्यामुळे अधिकच पंचाईत होणे अपरिहार्य ठरते. सभागृहाबाहेर तर प्रेक्षकांचा वाढत्या गरमीतील दबाव मुख्य दरवाजा उघडण्यासाठी असतो, तो वेगळाच. जे मडगाव रवींद्र भवनात तेच दुसऱ्या दिवशी कला अकादमीत. येथे तर दुपारची वेळ एका तियात्रासाठी दिलेली. अंदाज घेतला तर सात वाजेपर्यंत तियात्र संपण्याची शक्यता दिसत नव्हती. तियात्र आयोजकांना 'बाबापुता' करत तीन कातारां कापायला लावली, तेव्हा कुठे सात वाजता स्टेज मिळाली. येथे तर मनुष्यबळाचाही दुष्काळ. बाहेर 'सारस' हे प्रदर्शन लागलेले त्यामुळे पार्किंगचे पुरते वांदे. आत जाता येत नाही तर आत गेलेल्यांना बाहेर येता येत नाही, अशी परिस्थिती. गायक कलाकारांना घेऊन आलेल्या वाहनांसही आत प्रवेश मिळणे मुश्कील होते. स्टेज व्यवस्थापकाशी त्याकरिता संपर्क साधावा लागला. आता हे सगळ्यांनाच काही शक्य होत नाही. कला अकादमीच्या दोन दालनात नाणे प्रदर्शन भरलेले. गायक कलाकारांना तियात्र संपेपर्यंत निवांत बसण्याचीही सोय नाही. येथील कार्यक्रम अखेर सव्वा आठ वाजता सुरू झाला तेव्हा बाहेर रसिक ओरड करून बरेच थकले होते. त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. मध्यंतराला अनेकांना नाईलाजाने जावे लागले आणि त्याचा राग त्यांनी आमच्यावर काढणे साहजिकच होते. एका चांगल्या कार्यक्रमातून त्यांना जावे लागले, हा काय आयोजकांचा दोष थोडाच म्हणता येईल. त्या तुलनेत साखळी रवींद्र भवनातील एकूण व्यवस्था खूप बरी वाटली. तेथील मुबलक मनुष्यबळ वाखाणण्याजोगे. मडगाव आणि पणजीत मात्र 'चलता है' मानसिकतेला ब्रेक लावावा लागेल, तेव्हा कुठे रसिकांना दर्जेदार कार्यक्रमांचा पूर्णवेळ आस्वाद घेता येईल.
वामन प्रभू, (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९