राज्याच्या ग्रामीण भागातही ड्रग्जचे लोण पोचले आहे, खरे तर असेच भाग यासाठी निवडले जातात, हे ताज्या घटनेने दाखवून दिले आहे. परदेशी, देशी आणि स्थानिक नागरिकांची साखळी हा व्यवहार करते, हे पोलीस खात्यालाही आता उमजून चुकले आहे.
गेल्या वर्षी गोव्यात दहा कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. गोवा पोलीस खात्यांतर्गत अमली पदार्थ विरोधी पथकाने मिळवलेल्या या यशाबद्दल प्रशंसा झाली खरी, पण ही रक्कम पाहता, गोव्यात किती मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणले जातात, त्यांचे व्यवहार केले जातात, हेही या आकडेवारीने दाखवून दिल्याने यात स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखे काहीही अभिमानास्पद नाही. नववर्षानिमित्त विविध मनोरंजनात्मक उपक्रमांसाठी गोव्यात आणले जाणारे दोन कोटींचे ड्रग्ज दिल्लीत डिसेंबरअखेर जप्त करण्यात आले होते. हिमाचल प्रदेशातून गोव्यात आणले जात असताना, दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली होती. आता तर खुद्द गोव्यात बार्देश तालुक्यातील गिरवडे या ग्रामीण भागात तब्बल ११ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केल्याने, हा गैरव्यवहार गावागावांत शिरकाव करीत असल्याचे स्पष्ट पुरावेच पोलिसांना मिळाले आहेत. त्या भागातून हा जीवघेणा पदार्थ गोव्यात कुणाकडे जाणार होता, तो कुठे वितरित केला जाणार होता याचा शोध घ्यावा लागेल. हा उच्च प्रतीचा गांजा गोव्यात सुरळीतपणे कसा काय आला, याचा तपासही व्हायला हवा. नव्या वर्षात ‘ऑपरेशन प्रहार’ या नावाने मोहीम चालवून दोन महिन्यांत ४० लाखांचे अमलीपदार्थ पोलिसांनी जप्त केले. अर्थात दर दिवसाआड छाप्यानंतर एकाला तरी अटक केली जाते, असे आकडेवारी दर्शविते. अटक केलेल्यांमध्ये २५-३० टक्के गोमंतकीय असतात, असेही दिसून येते. फेब्रुवारीत जर्मन नागरिकाला अशाच प्रकरणात अटक झाली होती. तेलगू चित्रपट निर्माते चौधरी यांनी गोव्यात येऊन केलेल्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांचा ड्रग्ज व्यवहारात हात असल्याच्या कारणाने पोलीस चौकशी झाली होती. समाजात वरचे स्थान असलेल्या व्यक्तीही केवळ स्वार्थासाठी अशा व्यवसायात उतरतात, धोका पत्करतात आणि अखेर फसतात हे चित्र वेदनादायी आहे. ड्रग्जचे दुष्परिणाम ज्यांना भोगावे लागतात, त्यांच्याकडे पाहून तरी आपण देशवासीयांच्या नाशाला कारणीभूत ठरत आहोत, असा विचारही त्यांच्या मनात येत नसेल तर ही निव्वळ असंवेदनशीलता आहे.
गोवा हा प्रदेश म्हणजे वर्षभर कार्निव्हलचे वातावरण अर्थात ‘खा, प्या व मजा करा’ अशी प्रतिमा जगात का बनली आहे, याचे कारण राज्यात सहजपणे उपलब्ध होत असलेले अमलीपदार्थ हे आहे. कोणत्याही संगीत महोत्सवामुळे गोव्यात अमली पदार्थांचा सुकाळ झालेला नाही, तर राज्यातील सर्वच भागांत ड्रग्ज मिळू लागला आहे, असे राज्याचे कायदा मंत्री एकदा सहजपणे बोलून गेले होते हे अनेकांना आठवत असेल. सर्वत्र चालणारा अमलीपदार्थ व्यवहार रोखायचा असेल तर पत्रकार, नागरिक व सजग घटकांनी यासंबंधी आपल्या भागातील अशा बेकायदा आणि धोकादायक हालचाली पोलिसांपर्यंत पोचवायला हव्यात असे त्यांना म्हणायचे होते, अशी सारवासारव सरकारने केली होती. राज्याच्या ग्रामीण भागांतही हे लोण पोचले आहे, खरे तर असेच भाग यासाठी निवडले जातात, हे ताज्या घटनेने दाखवून दिले आहे. परदेशी, देशी आणि स्थानिक नागरिकांची साखळी हा व्यवहार करते, हे पोलीस खात्यालाही आता उमजून चुकले आहे. त्यामुळे नव्या वर्षात ड्रग्जविरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आपल्या खात्यातील एकही व्यक्ती यात गुंतणार नाही किंवा अप्रत्यक्ष सहाय्यभूत ठरणार नाही, याची खबरदारी खात्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांना घ्यावी लागेल. सुदैवाने एकाही लोकप्रतिनिधीवर असे आरोप झालेले नाहीत. याबाबतीत प्रशासकीय यंत्रणा सदैव स्वच्छ राहील, हे पाहण्यासाठी सरकारला सतर्कपणे नजर ठेवावी लागेल. पोलीस खाते किंवा अमली पदार्थ विरोधी विभाग जेवढा जबाबदारीने काम करेल, तेवढे आजचे चित्र बदलेल. मध्यंतरी काही पोलीस अधिकारीच ड्रग्ज विल्हेवाट प्रकरणात गुंतल्याचे दिसून आल्यावर त्यांच्यावर कारवाई झाली होती. ते अधिकारी पुन्हा त्याच मार्गाने जात नाहीत ना, याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. कमाईचा शॉर्टकट म्हणून याकडे पाहिले जात असावे. अर्थात हा जीवघेणा व्यवहार नव्या पिढीचा सर्वनाश करू शकतो.
गोव्यासंबंधी देशभरातच नव्हे तर जगात अपप्रचार अथवा बदनामी होणार नाही, यासाठी कारवाईची मोहीम अधिक तीव्र करून गोवा ड्रग्जमुक्त कसा होईल, यावर विचार करण्याची वेळ निश्चितपणे आली आहे. एखादा संशयित पकडून ११ कोटींचा व्यवहार उघडकीस येणार नाही, त्यामागील खरे सूत्रधार शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत व्यक्त केलेला निर्धार लक्षात घेता, भविष्यात हा व्यवहार समूळ नष्ट होण्याची शक्यता वाढली आहे. इच्छाशक्ती असल्यास पोलीस खात्याला हे आव्हान पेलणे शक्य आहे. जनतेच्या सहकार्याची अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे, जी चुकीची म्हणता येणार नाही.