मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्यांना सोमवारी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र हा तांत्रिक बिघाड नसून एक्स मीडियावर सायबर हल्ला झाल्याचा दावा एक्स सोशल मीडियाचे मालक एलॉन मस्क यांनी केला आहे. या सायबर हल्ल्यामागे कोणता तरी देश अथवा मोठा गट असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
फॉक्स न्यूजवरील लॅरी कुडलो यांच्याशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले, आम्हाला नेमके काय घडले हे माहीत नाही, परंतु 'एक्स' सिस्टम नष्ट करण्यासाठी युक्रेन क्षेत्रातून सुरू झालेल्या आयपी अॅड्रेसवरून मोठ्या प्रमाणात सायबर हल्ला झाला.
खरे तर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' सोमवारी तीन वेळा डाऊन झाले होते. पहिल्यांदा दुपारी ३.३० च्या सुमारास अर्ध्या तासासाठी, त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता एका तासासाठी आणि त्यानंतर ते रात्री ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत बंद राहिले.
ही माहिती एक्स सोशल मीडियाचे मालक एलॉन मस्क यांनी एक्सवर पोस्ट करून दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, एक्सवर मोठा सायबर हल्ला झाला होता. त्यामागे कोण होते, याचा शोध घेतला जात आहे. अनेक प्रकारे एक्स मीडियावर दररोज हल्ला होता. त्यामागे एक नियोजबद्ध काम करणारा गट किंवा एक देश सामील आहे.
भारतीय वेळेनुसार, सोमवारी दुपारी ३ वाजून १५ मिनिटाला वापरकर्त्यांना एक्स मीडियाचा वापर करताना अडचणींना सामना करावा लागला. वापरकर्त्यांना डेस्कटॉप, मोबाईल आणि अॅपमधून एक्स वापर करता येत नव्हते. इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांची सेवा विस्कळीत झाल्यानंतर त्यांची नोंद घेणाऱ्या डाऊन डिटेक्टरच्या माहितीनुसार, एक्स मीडियाची दुपारी ३ ते ४ वाजता सेवा बंद होती तर अनेकांना एक्स मीडियाचे अकाउंट वापरताना अडचणी येत आल्याची नोंद डाऊन डिटेक्टरने केली आहे.
या प्रकारामुळे एक्स वापरकर्ते संतप्त झाले. जेव्हा वापरकर्ते त्यांच्या एका खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांच्या स्क्रीनवर त्रुटी असल्याचा संदेश दिसत होता. वापरकर्त्यांना स्क्रीनवर काहीतरी चूक झाली, पुन्हा लोड करण्याचा प्रयत्न करा, असा संदेश येत होता. एक्स मीडिया बंद झाल्यानंतर अनेकांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या इतर प्लॅटफॉर्मवर देखील तक्रारी मांडत करून नाराजी व्यक्त केली.
- गणेशप्रसाद गोगटे