आधारभूत, साक्षीभूत पण उदासीन !

घरातील व्यवहार चालायला घरातील दीप फक्त साक्षीभूत असतो. त्याच पद्धतीने अस्तित्वात असलेल्या सगळ्यांच्या ठायी मी असतो खरा, पण त्यांच्या कर्मांच्या ठायी उदासीन असतो. म्हणजे त्यांच्या कर्मांवर माझे कोणतेच बंधन नसते.

Story: विचारचक्र |
09th March, 09:08 pm
आधारभूत, साक्षीभूत पण उदासीन !

मागील लेखात आपण भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाच्या आठव्या श्लोकाचे विवरण बघत होतो. श्रीकृष्ण म्हणतात की स्वप्नातून जागृतीत येताना आपल्या पायाला प्रत्यक्ष कष्ट होतात का? किंवा स्वप्नांत प्रवास करत असलेल्याला प्रत्यक्ष प्रवास घडतो का? तर तसा प्रवास त्याला त्यावेळी प्रत्यक्षात घडत नसतो. हे भूतसृष्टीचे कर्तृत्व आहे. माझा त्यात काहीही सहभाग नाही. राजाच्या आश्रयाने जशी प्रजा आपले सर्व जीवन व्यवहार निर्वेधपणे करत असते, त्याचप्रमाणे माझ्या आश्रयाने ही प्रकृती या सगळ्या विश्वाची निर्मिती करते.

पौर्णिमेचा चंद्र असला की समुद्राला भरती येते. पण एवढा मोठ्ठा समुद्र भरून आला म्हणून चंद्राला त्याचे काही कष्ट पडतात का? लोहचुंबक जवळ आला की जड असले तरी लोखंड चळते. पण लोखंडाला आकृष्ट करण्याच्या त्या प्रक्रियेत त्या चुंबकाला काही सायास पडतात का? नाही. पण ते आकृष्ट होते. तसे जरी प्रकृती माझ्या आश्रयाने सगळे विश्व प्रसवत असली, तरी त्यात मला काहीच सायास करावे लागत नाहीत. जसे वृक्ष, वेली व त्यांच्या शाखा - पल्लवांसकट सगळ्या वनस्पती विश्वाची उत्पत्ती करण्याचे सामर्थ्य जमिनीचे असते, त्याचप्रमाणे सगळ्या प्राणीगणांची उत्पत्ती प्रकृतीच्या सामर्थ्याने होत असते.

बालपण, तारुण्य व वृद्धत्व या वेगवेगळ्या स्थितींना बघून समजण्यासाठी आधार कोणता? तर देह! जीव तोच आहे, मन तेच आहे, ऊर्मी त्याच आहेत, ज्ञानवृद्धी आहे, पण कालगतीनुसार फरक पडतोच! तो दिसतो कुठे? देहावर! कारण त्या जीवाला देहाचा संग आहे.

आकाशात मेघ-माला कधी उद्भवतात? तर वर्षाकाळी! स्वप्न का पडते? तर झोप लागते म्हणून! त्याचप्रमाणे सर्व स्थावर, जंगम, सूक्ष्म किंवा स्थूळ असे जे हे दृश्य जगत् आहे, त्याची स्वामिनी वा मूळ म्हणजे माझी प्रकृतीच होय. त्याला प्रकृतीचाच आधार आहे. म्हणून हे सगळे उत्पन्न करून त्यांचा सांभाळ करण्याचे सगळे प्रकृतीच बघते. त्याचे कर्तृत्व माझ्याकडे येत नाही.

न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।

उदासीनवदासीन मसक्तं तेषु कर्मसु ।।९।।

सरळ अर्थ : हे धनंजया, त्या कर्मात आसक्तिरहित व उदासीनतेप्रमाणे (म्हणजे कर्तृत्वाभिमानाला सोडून) राहणाऱ्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधन करीत नाहीत.

विस्तृत विवेचन : समुद्राच्या पाण्यात मीठ विरघळते. मग मिठाच्या पाण्याचा बंधारा समुद्राची लाट अडवू शकेल काय? ते शक्य नाही. कारण तो बंधाराच त्या लाटेत विरघळून सामावून जाईल. त्याचप्रमाणे सगळी कर्मे जिथे माझ्यातच शेवटी विलीन होतात, तिथे ती मला अडवतील कशी? किंवा बंधनकारक होतील कशी? धुराचा पिंजरा झंझावातस्वरूप वावटळीला कधी अडवू शकेल काय? किंवा अंधार कधी सूर्यबिंबांत प्रवेश करील काय? जशा पर्जन्याच्या जलधारा पर्वताला टोचत नाहीत, तसे हे प्रकृतीचे कर्मजात मला बंधनकारक होत नाही!

हे सव्यसाची, हे लक्षात घे की एरवी या विश्वाला आधारभूत असा मी एकच आहे! घरातला दिवा कधी कुणावर काही नियम घालतो का? किंवा तो कधी कुणाला अमुक अमुक करू नको असं म्हणतो का? नाही आणि घरांत कोणकोणत्या प्रकारचा व्यवहार कधी करतो याचेही त्याला सोयर-सुतक नसते! पण घरातील व्यवहार चालायला तो दीप फक्त साक्षीभूत असतो. त्याच पद्धतीने अस्तित्वात असलेल्या सगळ्यांच्या ठायी मी असतो खरा, पण त्यांच्या कर्मांच्या ठायी उदासीन असतो म्हणजे त्यांच्या कर्मांवर माझे कोणतेच बंधन नसते. हा एकच अभिप्राय ध्यानात घे.

मयाsध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम् ।

हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ।।१०।।

सरळ अर्थ : हे कौन्तेया, अधिष्ठाता अशा माझ्या सान्निध्याने ही माझी माया (प्रकृती) सर्व चराचर जगत् निर्माण करते आणि या वर सांगितलेल्या हेतूनेच हे जग आवागमनरुपी चक्रात फिरत आहे.

विस्तृत विवेचन : सर्व त्रिलोकाचा व्यवहार जसा सूर्यामुळे चालतो, तशी ही सगळी चराचर सृष्टी केवळ माझ्यामुळे उत्पन्न होते. मी माझ्या प्रकृतीचा स्वीकार केला की चराचर सृष्टी अस्तित्वात येते. हाच माझा सृष्टीशी कार्यकारण भाव आहे. ही सगळी सृष्टी माझ्या ठायी आहे खरी, पण मी तिच्यात नाही. ज्ञानप्रकाशाची ही शलाका धरून माझा ऐश्वर्ययोग पाहण्याचा प्रयत्न कर. हीच स्वरूपबोधाची खूण होय. हे गूढ मी तुला उलगडून दाखवलंय. या खुणेच्या आधाराने वृत्ती अंतर्मुख करून आत्मसुख भोगण्याचा प्रयत्न कर. कारण जोवर ज्ञानप्राप्तीचे हे वर्म हाती लागत नाही तोवर ज्याप्रमाणे कोंड्यात किंवा भुश्यात दाण्याचा कण सापडत नाही त्याप्रमाणे मनुष्याला आपल्या सत्य स्वरुपाचे दर्शन घडत नाही. एखादे वेळेस तर्काच्या आधाराने सत्यस्वरूपाचे दर्शन अगदी खरेच घडले (!) असे वाटू शकेल. पण मृगजळाच्या ओलाव्याने काय कधी जमीन भिजते काय? पाण्यात जाळे टाकले आणि त्यात चंद्रबिंब सापडल्यासारखे दिसले तरी ते जाळे ओढून बाहेर काढल्यावर ते चंद्रबिंब हाती येते का? तसे सत्य ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती नसताना केवळ वाचा-शक्तीच्या आधाराने अनुभवाची ऐट जे फोल शब्द-ज्ञानी सांगतात, त्याचा प्रभाव तो काय पडावा?

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।

परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ।।१०।।

सरळ अर्थ : असे असूनही सर्व भूतांचा महान ईश्वररूप अशा माझ्या परम् भावाला (म्हणजे अजन्म अविनाशी असूनही आपल्या मायेने प्रकट होत असतो अशा माझ्या प्रभावाला) न जाणणारे मूढ लोक मनुष्याचे शरीर धारण केलेल्या मज परमात्म्याला तुच्छ समजतात. अर्थात् आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपाने व्यवहार करणाऱ्यास साधारण मनुष्य समजतात! 


- मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३