देवराईतील वृक्षवेली, पशुपक्षी यांना जरी पूर्णपणे संरक्षण असले तरी शिमग्यात होळीसाठी पुजल्या जाणाऱ्या वृक्षाचा खांब येथील प्रचलित लोकपरंपरेनुसार करंझोळ येथील होळयेच्या राईतूनच जाणला जातो.
गोव्यात साजरा केला जाणारा शिमग्याचा लोकोत्सव उन्हाळ्याचा आगामी कालखंड सुखी जावा म्हणून प्रसिद्धीस पावला होता. 'सुगिम्ह' शब्दावरून शिगमा, शिमगा आदी नावांनी मर्दानी लोककलांनी समृद्ध हा उत्सव लोकमानसाचा लाडका ठरला. या उत्सवाचा समारोप काही ठिकाणी ग्रामदैवताच्या मुख्य मंदिरासमोर तर काही ठिकाणी उत्सवाच्या प्रारंभी खणलेल्या खड्ड्यात वृक्षाचा खांब आम्रपल्लवांनी सजवून उभा केला जातो. या खांबावर असोला नारळ टोकावर बांधला जातो तसेच त्याच्यावर छोटेखानी ध्वजही फडकवला जातो. गावातल्या जंगलात अथवा बागायतीत उपलब्ध वृक्षानुसार हा खांब उभा करणे आणि त्याची गंधपुष्प, धुपारतीने पूजा करणे महत्वाचे मानले जाते. त्यानंतर त्याच्याभोवती गवत जाळले जाते. मंदिरासमोर ठराविक काळापुरता आम्रपल्लवांनी अलंकृत आणि उभा असलेला हा खांबच गोवा-कोकणातल्या बऱ्याच गावांत होळी म्हणून ओळखला जातो. पश्चिम घाटात वसलेल्या बऱ्याच गावात होळी सणासाठी जो खांब उभा केला जातो, तो ग्रामस्थ देवराईतून उंच आणि सरळसोट असा वृक्ष कापून ढोलताशांच्या निनादात मिरवणुकीद्वारे आणतात आणि नानाविविध संकेतांचे काटेकोरपणे पालन करून उभा करतात.
अंत्रुज महाल हा माड-पोफळींनी युक्त हिरवागार कुळागरांचा असल्याकारणाने, इथल्या गावोगावच्या मंदिरांत पोफळीचा खांब होळी म्हणून सजवून उभा केला जातो, तर सत्तरी आणि परिसरात बऱ्याच गावात तेथील देवराईतील सरळ आणि उंच वृक्ष होळी म्हणून उभा केला जातो. चांद्र कालगणनेनुसार फाल्गुन या शेवटच्या महिन्याला निरोप देऊन चैत्रादी महिन्यांच्या नववर्षाचा प्रारंभ करण्यासाठी ऊर्जा लाभावी म्हणून वैविध्यपूर्ण लोककलांचा सुंदर आविष्कार कष्टकरी पुरुष मंडळी घडवण्यासाठी सिद्ध व्हायची. पानगळतीच्या जंगलातले बरेच वृक्ष आपला जुना पर्णसंभार त्यागून नवपल्लवांच्या सौंदर्याचे दर्शन घडवायचे आणि त्यामुळे त्याला शिशिरोत्सव ही सज्ञा रूढ आहे. शिशिराची समाप्ती झाल्यावर पश्चिम घाटात ऋतुराज वसंताचे आगमन व्हायचे आणि त्यासाठी निसर्गातील विविध वृक्षवनस्पती आदी घटकांतून उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक रंगगंधांचा आविष्कार रंगपंचमीद्वारे कष्टकरी समाज उत्स्फूर्तरित्या घडवायचा.
सत्तरीत सावर्डे पंचायत क्षेत्रातील करंझोळ गाव, गोव्याच्या मध्ययुगीन इतिहासात गजबजलेला होता. मोगल साम्राज्यात समाविष्ट होणाऱ्या भीमगड परगण्याकडे जाणारा मार्ग करंझोळ गावातून जायचा तसेच गोवा कदंब राजसत्तेखाली राजपुत्र विष्णुचित्ते यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या राजधानी हळशीला जोडणारा जुना केळघाटातला मार्ग इथूनच जात असल्याने त्याला विशेष महत्त्व लाभले होते. प्राचीन, मद्ययुगीन इतिहासाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवणाऱ्या करंझोळ गावात तसेच त्याच्या परिसरात बोंदीर, साटेलीत पाषाणी मूर्ती आहेत. या साऱ्या संचितातून इतिहासातल्या गतवैभवाच्या खाणाखुणा प्रतिबिंबित होतात. करंझोळ गावाला इतिहास, पुरातत्व, संस्कृतीचा जसा समृद्ध वारसा लाभलेला आहे, तसेच सुंदर नैसर्गिक वैभव इथल्या देवरायांद्वारे घडते. करंझोळात ज्या देवराया आहेत, त्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेली होळयेची देवराई या पंचक्रोशीतली सगळ्यात मोठी सधन अशीच आहे.
दरवर्षी गावातल्या शांतादुर्गेच्या मंदिरासमोर जी उंच होळी म्हणून उभी केली जाते, त्याच्यासाठी पिढ्यान पिढ्यांपासून होळयेच्या राईतून उंच वृक्ष कापून आणला जातो. देवराईतील वृक्षवेली, पशुपक्षी यांना जरी पूर्णपणे संरक्षण असले तरी शिमग्यात होळीसाठी पुजल्या जाणाऱ्या वृक्षाचा खांब येथील प्रचलित लोकपरंपरेनुसार होळयेच्या राईतूनच जाणला जातो. करंझोळ गावातले बहुतांश भौगोलिक क्षेत्रफळ जंगलसमृद्ध असून, म्हादई अभयारण्याची अधिसूचना अंमलात येण्यापूर्वी इथल्या कष्टकरी समाजाने कुमेरी शेतीच्या विस्तारापायी घनदाट जंगलांचा विद्ध्वंस केला जाऊ नये म्हणून देवराईची संकल्पना अमूर्त केली. करंझोळ, कुमठोळ, काजेरेघाट, बोंदीर इथल्या लोकवस्ती, शेती, बागायतीच्या क्षेत्रापासून पूर्णपणे अलग असलेल्या देवराईचे २७ हेक्टर वन क्षेत्र आहे. एकेकाळी आकाशाला गवसणी घालण्यास सिद्ध झालेले महाकाय वृक्ष ही होळयेच्या देवराईची खरी शान होती. वर्षातून नारळी पौर्णिमा, दसरा, शिमगा, गुढीपाडवा वगळता ग्रामस्थ अभावानेच अशा देवरायांत प्रवेश करायचे आणि त्यामुळे वृक्षवेली, पशुपक्षी, कृमीकीटक आदी जैविक संपदेच्या घटकांचे लोकश्रद्धेद्वारे रक्षण व्हायचे. मद्यपान, धूम्रपान आदींना देवरायात प्रतिबंध असायचा आणि त्यामुळे त्याचे पावित्र्य जतन केले जायचे.
भेरलीमाड, किंदळ, माडत, चांदीवडा, वड, पिंपळ, नंद्रूक, कुंभा, नाणो, जामो, जांभूळ, असण अशा वृक्षसंपदेबरोबर या देवराईत नागीन नावाने ओळखले जाणारे सरळसोट, उंच वृक्ष असून करंझोळच्या होळीप्रीत्यर्थ पुजल्या जाणाऱ्या पवित्र खांबासाठी नागीन वृक्षालाच प्राधान्य दिले जाते. फाल्गुन पौर्णिमेच्या सातव्या दिवशी करोळ गावात नागीन वृक्षाच्या होळीच्या सान्निध्यात रात्रीच्या प्रारंभी चोरोत्सव संपन्न होतो. करंझोळच्या लोकजीवनात होळयेच्या राईला आदराचे स्थान असून, इथे जैविक संपदेच्या वैभवाबरोबर ऐतिहासिक संचितांचेही दर्शन घडते. सत्तरी तालुक्यावर जेव्हा पोर्तुगिजांनी आपली सत्ता प्रस्थापित केली तेव्हा इथल्या कष्टकरी समाजाने राणे सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली बंडाचे निशाण उभारले आणि पोर्तुगिजांना नामोहरण केले. राणे आणि त्यांच्या साथीदारांनी बंड करण्यापूर्वी करेंझाळ येथील होळयेच्या देवराईत येऊन तेथील पवित्र शिळेच्या पूजनाची आणि दर्शनाची परंपरा आत्मीयतेने पाळलेली होती. या देवराईतील पवित्र शिळेचे बंडाचा नेता आणि प्रमुख साथीदार पूजा करून तिला संयुक्तरित्या हात लावून ढकलण्याचा प्रयत्न करायचे. ही शिळा आपल्या जागेवरून हलली तर देवाचा बंडासाठी कौल मिळाला, असे मानले जायचे. त्यामुळे राणे मंडळीच्या बंडाच्या इतिहासात करंझोळ गावातील सेवेच्या देवराईला अनन्यसाधारण असे महत्त्व लाभले होते. आज ही पवित्र शिळा देवराईतून कोठे गुप्त झाली याची गावातल्या मंडळीला माहिती नसून, इथे ये-जा करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने तिथे वास्तव्यास असणाऱ्या पशुपक्षी यांच्यासाठी ही देवराई नैसर्गिक अधिवास ठरलेली आहे. शिगम्यासाठी होळीचा पवित्र वृक्ष या देवराईतून दरवर्षी आणला जात असल्याकारणाने ग्रामस्थांचे स्नेहबंध तिच्याशी अटुत राहिलेले आहे.
- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५