स्मार्ट सिटी पणजीचे दुष्टचक्र संपायला हवे

Story: अंतरंग |
09th March, 09:05 pm
स्मार्ट सिटी पणजीचे दुष्टचक्र संपायला हवे

पणजीत सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. या कामांसाठी रस्ते खोदण्यात आल्याने शहरातील काही वाहतूक अन्य रस्त्यांवरून वळविली आहे. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

 डबल इंजिन सरकारच्या कारकिर्दीत विकासाची कामे जोरात सुरू आहेत. गोव्याचाच विचार केला तर मुक्तीनंतर पन्नास वर्षात साधनसुविधांची जेवढी कामे झाली नाहीत, तेवढी कामे गेल्या दहा वर्षात झालेली आहेत. मोपा विमानतळ, मांडवी नदीवरील अटल सेतू, खांडेपार नदीवरील नवीन पूल, वेर्स्टन बायपास, जुवारी नदीवरील पूल अशी असंख्य नामावली देता येईल. साधनसुविधांच्या या कामामुळे वाहतुकीत सुधारणा होण्याबरोबर विकासाला गती मिळणार आहे. 

या सर्व कामांबरोबर पणजी स्मार्ट सिटीचा उल्लेख करावा लागेल. रस्ते, मलनिस्सारण यंत्रणा, पाणीपुरवठा यात सुधारणा करण्यासाठी केंद्राने खास निधी दिलेला आहे. पणजी शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कला अकादमी, महालक्षी मंदिर, आल्तिनो टेकडी, अदिलशहाचा राजवाडा अशा कितीतरी गोष्टी पणजीच्या सौंदर्यात भर टाकतात. पर्यटकांना त्या आकर्षित करतात. याशिवाय अन्य कोणत्याही शहरात नसतील तेवढी उद्याने पणजीत आहेत. यामुळे पर्यटन व अन्य लोक सुद्धा या शहराकडे आकर्षित होतात. 

तरीही पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी व वाहतुकीची कोंडी यामुळे शहरात न आलेलेच बरे, अशी बऱ्याच जणांची अवस्था होते. पावसाच्या काही काळ सरी पडल्या, की पणजीतील रस्त्यांवर पाणी तुंबते. पाण्यातून वाहने चालविण्याची पाळी वाहनचालकांवर येते. सकाळ, दुपार व संध्याकाळची वाहतुकीची कोंडी तर नित्याचीच झालेली आहे. यावर उपाय हा काढावाच लागणार आहे. 

गेल्या बऱ्याच वर्षांपासून स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. गेल्या वर्षी गटार यंत्रणा बदलण्याबरोबर रस्तेही गुळगुळीत केले गेले. यासाठी पणजीत येणाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडीबरोबर धूळ प्रदूषणही सहन करावे लागले. कोणताही विकास हवा, तर काही तरी त्याग हा करायलाच हवा. यामुळे सर्वांनी वाहतूक कोंडी व प्रदूषण सहन केले. यामुळे गेल्या पावसाळ्यात रस्त्यांवर तुलनेने कमी प्रमाणात पाणी साचले. आता सुद्धा स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. स्मार्ट सिटीच्या कामामुळे यापूर्वी बरेच अपघात झालेले आहेत. आता सुद्धा दोन दिवसांपूर्वी सांत इनेज येथील गटार कोसळण्याची घटना घडली. ही घटना मामुली असली तरी यामुळे परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. कामे दिलेल्या वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचेच आहे. त्याबरोबर कामाचा दर्जाही महत्वाचा आहे. रस्ते व गटार व्यवस्थेत सुधारणा झाली तर पणजीचे दुष्टचक्र संपण्यास बराच हातभार लागेल.

- गणेश जावडेकर