पारंपरिक मच्छीमार त्यांच्या मासेमारी बोटी आणि उपकरणे पावसाळ्यात कशी आणि कुठे ठेवत आहेत, याचा अंदाज घेतला तर मच्छीमारांना जहाजे थेट किनाऱ्यावरच नांगरण्याशिवाय पर्याय उरत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मच्छीमारांच्या या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
बाणावलीत सुमारे ९६ देशी बनावटीच्या मासेमारी बोटी, १५ रापणीसाठी वापरण्यात येणार्या छोट्या बोटी आहेत. हे मच्छीमार त्यांच्या मासेमारी नौका योग्य जागेअभावी किनाऱ्यावरच नांगरून ठेवतात. मत्स्य व्यवसाय विभागाकडून स्थानिकांना त्यांची मासेमारी उपकरणे सुरक्षित ठेवण्यासाठी नजीकच्या बंद असलेल्या बाणावली कोळंबी हॅचरीची जागा दिली जात नाही व पर्यायी जागाही उपलब्ध करून देत नाही. म्हणूनच बाणावलीतील मच्छीमारांनी त्या बंद पडलेल्या हॅचरीच्या जमिनीवर प्रस्तावित कोळंबी, फिन माशांच्या हॅचरीला विरोध केला होता. हॅचरीच्या जागेचा एक तुकडा देण्याची मागणी मच्छीमारांनी राज्य सरकारकडे केली होती.
पावसाळ्यात वादळामुळे त्यांच्या बोटींचे नुकसान झालेले असतानाही त्यांच्यासमोर धोका पत्करण्याशिवाय पर्याय नाही. मासेमारी बोटी नांगरण्याव्यतिरिक्त, त्या जागेचा वापर अतिरिक्त मासे साठवण्यासाठी आणि शीतगृह युनिट उभारण्यासाठी करता येऊ शकतो. तसेच मासे सुकविण्यासाठी आणि मीठ साठवण्यासाठी देखील ती जागा वापरता येते. याचा सरकारने विचार करण्याची गरज आहे, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
मत्स्य विभागाच्या म्हणण्यानुसार, हॅचरीच्या जागेवर प्रस्तावित कोळंबी आणि फिन माशांच्या हॅचरीमुळे स्थानिक आणि तरुण उद्योजकांना फायदा होईल. पण बाणावलीतील मच्छीमारांचे काय? त्यांची समस्या कोण सोडवणार?
खासगी सार्वजनिक भागिदारीच्या नावाखाली समुद्रकिनारा आणि समुद्रासमोरील जागा खासगी उद्योजकांना देण्याची योजना सरकारने आखली असल्याची टीका केली जात आहे. काहींनी सरकारचा हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारने कोळंबी फार्ममध्ये गुंतवणूक करण्यास तयार असलेल्या तरुण उद्योजकांच्या संख्येचा अभ्यास केला आहे का, हा चर्चेचा विषय आहे. यापूर्वी किनाऱ्यावर आयोजित मॉक ड्रिलदरम्यान पावसाळ्यात मोठी आपत्ती आल्यास मासेमारी बोटींना जलद बचाव करण्यासाठी बंद पडलेल्या हॅचरीची जागा कशी उपयुक्त ठरू शकते, हे दिसून आले आहे.
राज्य सरकारने मच्छीमारांचे प्रश्न जाणून घेत जाळी व बोटी ठेवण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यासह शीतगृहाची उभारणी व मासे सुकवण्यासाठी जागा देण्याची गरज सध्या भासत असून याद्वारेच हा व्यवसाय वृद्धिंगत होईल, हे निश्चित.
- अजय लाड, गोवन वार्ता