
लंडनच्या मध्यवर्ती भागात टावर ऑफ लंडनजवळ चीनने प्रस्तावित केलेल्या ‘मेगा दूतावासा’च्या आराखड्याने खळबळ उडवून दिली आहे. या दूतावासाच्या इमारतीत तब्बल २०८ गुप्त खोल्या बांधण्याचे नियोजन असून, यामुळे ब्रिटनसह अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. हा दूतावास युरोपमधील चीनचा सर्वात मोठा राजनैतिक अड्डा ठरण्याची शक्यता असून, त्याआडून हेरगिरी केली जाण्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या दूतावासाचा एक गुप्त चेंबर थेट त्या फायबर-ऑप्टिक केबल्सच्या शेजारी असेल, ज्यातून लंडन शहराचा संपूर्ण आर्थिक डेटा आणि कोट्यवधी युजर्सचा इंटरनेट ट्रॅफिक जातो. चीन या संवेदनशील पायाभूत सुविधेचा वापर माहिती चोरण्यासाठी किंवा वित्तीय व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी करू शकतो, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. आमच्या सर्वात जवळच्या मित्रराष्ट्राच्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरचा शत्रू राष्ट्र गैरवापर करू शकते, अशी भीती व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
चीनने २०१८ मध्ये २७ अब्ज ३२ कोटी रुपयांना (२२५ दशलक्ष पाऊंड) ही २२ हजार स्क्वेअर मीटरची जागा खरेदी केली होती. २०२२ मध्ये स्थानिक कौन्सिलने हा प्रकल्प फेटाळला होता. मात्र, पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालील सध्याचे लेबर सरकार याला राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प म्हणून मंजुरी देण्याच्या तयारीत आहे.
लेबर खासदार सारा चॅम्पियन यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सरकारला धारेवर धरले. चीन हा शत्रू देश आहे, जो हाँगकाँग आणि तैवानच्या लोकांना घाबरवत आहे. अशा दादागिरी करणाऱ्या देशाला बक्षीस देता कामा नये, असे त्यांनी स्पष्टपणे सुनावले.
पंतप्रधान कीर स्टार्मर पुढील आठवड्यात बीजिंग दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या आठ वर्षांतील ब्रिटिश पंतप्रधानांचा हा पहिलाच चीन दौरा असेल. या दौऱ्यापूर्वी चीनला खूश करण्यासाठी ब्रिटिश सरकार या ‘सुपर एम्बेसी’ला हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, चीनने २०८ गुप्त खोल्यांच्या अस्तित्वाचा अद्याप कोणताही इन्कार केलेला नाही. चीनच्या दूतावासाने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. चीनविरोधी शक्ती देशाला बदनाम करण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी नेहमीच तयार असतात, असे चिनी प्रवक्त्याने म्हटले आहे. दुसरीकडे, ब्रिटनच्या एमआय-५ आणि एमआय-६ या गुप्तचर यंत्रणांनी या योजनेवर अद्याप कोणतीही औपचारिक हरकत घेतलेली नाही, ज्यामुळे सुरक्षेचा पेच अधिक वाढला आहे.
- सुदेश दळवी