शेकडो भटक्या कुत्र्यांचे हत्याकांड निषेधार्हच

Story: राज्यरंग |
4 hours ago
शेकडो भटक्या कुत्र्यांचे हत्याकांड निषेधार्हच

भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे, अनेक जण जखमी झाले आहेत. या कुत्र्यांमुळे अपघातही झाले आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा होते; मात्र त्याची कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे प्रश्न तसाच रहातो. दिल्लीतील घटनांमुळे सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न खूपच गांभीर्याने घेतला आहे. ‘ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी’ हे खरे असले तरी, भटक्या कुत्र्यांना ठार मारणे, हा या समस्येवर उपाय होऊ शकत नाही. तेलंगणात तीन दिवसांत शेकडो भटक्या कुत्र्यांना विषारी इंजक्शन देऊन मारण्यात आल्याने त्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

ही घटना हणमकोंडा जिल्ह्यातील श्यामपेट आणि अरेपल्ली ६ ते ८ जानेवारी दरम्यान घडली. यानंतर प्राणी हक्क कार्यकर्त्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्राणी कल्याण कार्यकर्ते अदुलापुरम गौतम आणि फरजाना बेगम यांनी श्यामपेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. तीन दिवसांत सुमारे ३०० भटक्या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन दिल्याचा आरोप तक्रारीत आहे. कुत्र्यांचे मृतदेह गावांच्या बाहेर फेकण्यात आले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५ आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० च्या कलम ११(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला. गौतम आणि बेगम यांच्या दाव्यानुसार, सरपंच आणि ग्रामपंचायत सचिवांनी कुत्र्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांना कामावर ठेवले होते. तपास अधिकाऱ्यांच्या मते, पोलिसांत तक्रार दाखल होण्यापूर्वी काही आरोपींनी प्राणी हक्क कार्यकर्त्यांशी खासगी संभाषणात कुत्र्यांना मारल्याची कबुली दिली होती.

विशेष म्हणजे सरपंचाने कुत्र्यांना प्राणघातक इंजक्शन देतानाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याने दोन व्यक्तींना भटक्या कुत्र्यांना जीवघेणी इंजक्शन देण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक ‘तक्रार कोणत्या आधारावर करण्यात आली,’ असा प्रश्न विचारत आहेत. सरपंचांनी ही कारवाई जनतेच्या मागणीवरून केली आहे. गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली होती. त्यामुळे निवडणुकीवेळी सरपंचांकडे ही मागणी करण्यात आली होती, असेही त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दोन्ही गावांचे सरपंच, त्यांचे पती, उपसरपंच, पंचायत सचिव आणि दोन रोजंदारी कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी हस्तक्षेप केल्यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. प्राणी कल्याण संघटनांनी भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तेथे सर्वमान्य तोडगा निघेल यात शंका नाही. आततायीपणे शेकडो कुत्र्यांना ठार मारणे, याचे समर्थन होऊ शकत नाही.


- प्रदीप जोशी