राजकीय वादळात खामेनेईंच्या पलायनाची चर्चा

Story: विश्वरंग |
8 hours ago
राजकीय वादळात खामेनेईंच्या पलायनाची चर्चा

इराणमध्ये सध्या निर्माण झालेली स्थिती अलीकडच्या दशकांतील सर्वाधिक धोकादायक टप्प्यावर पोहोचली आहे. धार्मिक सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांच्या सत्तेविरुद्ध उसळलेल्या जनक्षोभाने शासनाचा पाया हादरवून सोडला आहे.

आर्थिक संकट, वाढती महागाई, महिलांवरील दडपशाही आणि मूलभूत स्वातंत्र्यावरील निर्बंध या सर्व कारणांनी लोकांनी आता उघडपणे ‘डेथ टू द डिक्टेटर’च्या घोषणा देण्याइतपत आक्रोश तीव्र झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांत सुरू झालेला हा आंदोलनांचा ज्वालामुखी १८० शहरांपर्यंत पोहोचला असून सैन्यदल आणि नागरिकांतील संघर्षात ६०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे अंदाज आहे.

या अस्थिरतेमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे खामेनेई कुटुंबाच्या संभाव्य पलायनाची चर्चा. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द टाइम्स’ने एका गुप्त स्रोताच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती आणखी बिघडल्यास खामेनेई तेहरान सोडून रशियाचा आश्रय घेऊ शकतात किंवा त्यांनी त्यासाठीची प्राथमिक तयारी आधीच सुरू केली आहे. सर्वोच्च नेता म्हणून ते कोणत्याही शासनापेक्षा वरच्या स्तरावर असले तरी अशा पलायनाला यजमान देशाची तयारी तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. तेहरानमध्ये त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आयआरजीसी आणि पोलिसांच्या अनेक स्तरांनी वेढलेली आहे; तशीच सुरक्षा दुसऱ्या देशात मिळू शकेल की नाही, हा प्रश्न कायमच गुंतागुंतीचा राहणार आहे.

इराणचे जागतिक संबंध पाहिले, तर त्यांच्यासाठी पर्याय अत्यंत मर्यादित आहेत. अमेरिकेशी अणुकरार आणि दडपशाही धोरणांमुळे वैर कायम, इस्रायलशी दीर्घकालीन संघर्ष, सऊदी, बहरीन आणि इतर अरब देशांशी वैचारिक विरोध, तसेच युरोपमध्ये इराणच्या कट्टरपंथी धोरणांविषयी संशय या सर्व कारणांनी खामेनेईंना आश्रयासाठी फार कमी दरवाजे उघडे आहेत. या पार्श्वभूमीवर रशिया हा नैसर्गिक पर्याय ठरतो. कारण दोन्ही देशांचा सामाईक शत्रू अमेरिका असल्याने ते एकमेकांचे धोरणात्मक सहकारी बनले आहेत. पश्चिमी निर्बंधांमुळे दोन्ही राष्ट्रे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपासून दूर गेली असून तेल, गॅस, शस्त्रसामग्री आणि तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीतील परस्परावलंबित्व वाढले आहे. सीरियातील बशर अल-असद शासनाला वाचवण्यासाठी दोघांनी एकत्र काम केले. रशियाची हवाई ताकद आणि इराणचे मिलिशिया नेटवर्क या समीकरणाने परस्पर विश्वास दृढ झाला.

या सर्व परिस्थितीत खामेनेईंच्या संभाव्य पलायनाची चर्चा केवळ अफवा नाही, तर ती इराणच्या अंतर्गत राजकीय अस्थैर्याची गंभीर लक्षणे आहेत. त्यांच्या मालमत्तेचे व्यापक जाळे, विशेषतः ‘सेताद’ या शक्तिशाली फाउंडेशनच्या माध्यमातून तयार झालेले आर्थिक साम्राज्य, पलायनाची तयारी अधिक सुलभ करू शकते, अशी शक्यता व्यक्त होते. आज प्रश्न हा नाही की खामेनेई कुठे जातील; प्रश्न हा आहे की इराणच्या जनतेचा संताप आणखी किती काळ दडवता येईल? 

- सचिन दळवी