अंकिता भंडारी हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत

Story: राज्यरंग - उत्तराखंड |
12th January, 11:52 pm
अंकिता भंडारी हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत

अंकिता भंडारी हत्या प्रकरणाला आता तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना दोषी ठरवून सात महिने झाले असले तरी, अलीकडे एका वरिष्ठ भाजप नेत्यावर झालेल्या आरोपांमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या नव्या आरोपांमुळे संपूर्ण उत्तराखंडमध्ये संतापाची लाट उसळली असून सीबीआय चौकशी करण्याची जोरदार मागणी होत आहे.

१९ वर्षीय अंकिता भंडारी ही ऋषिकेशजवळील ‘वनतारा रिसॉर्ट’मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. नोकरीला लागून अवघे २० दिवस झाले असतानाच १८ सप्टेंबर २०२२ रोजी तिची निर्घृण हत्या करण्यात आली. रिसॉर्टचा मॅनेजर पुलकित आर्य यानेच तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. पुलकित हा माजी भाजप नेते विनोद आर्य यांचा मुलगा आहे. अंकिता बेपत्ता झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी तिचा मृतदेह सापडला होता, ज्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास राज्य पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केला. अंकितावर रिसॉर्टमध्ये ‘स्पेशल सर्व्हिस’ देण्यासाठी दबाव टाकला जात होता. तिने याला ठाम नकार दिल्यामुळेच तिची हत्या करण्यात आल्याचा निष्कर्ष तपासात काढण्यात आला. पुलकित आर्यला हत्या, लैंगिक छळ आणि पुरावे नष्ट करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांखाली दोषी ठरवण्यात आले.

अंकिताच्या हत्येच्या दिवशी रिसॉर्टमध्ये एखादा ‘व्हीआयपी’ पाहुणा उपस्थित असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. मात्र, एसआयटीने आपल्या अहवालात कोणत्याही प्रभावशाली राजकीय नेत्याचा या प्रकरणात सहभाग आढळला नसल्याचे स्पष्ट केले. 

मात्र, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. हरिद्वारचे माजी भाजप आमदार सुरेश राठोड यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या उर्मिला सानावर यांनी काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर राज्यात पुन्हा आंदोलनांना सुरुवात झाली आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये त्यांनी असा दावा केला की, ‘गट्टू’ नावाच्या एका नेत्याला ‘एक्स्ट्रा सर्व्हिसेस’ देण्यास अंकिताने नकार दिल्यामुळेच तिची हत्या करण्यात आली. यानंतर सानावर यांनी दुसरा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्यांनी स्वतःची आणि सुरेश राठोड यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये राठोड यांनी कथितपणे उत्तराखंडचे भाजप प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम यांचे नाव या प्रकरणाशी जोडल्याचा दावा करण्यात आला आहे.

या आरोपांनंतर सुरेश राठोड यांनी सानावर यांच्यावर भाजपची बदनामी केल्याचा आरोप केला. त्यांनी ही ऑडिओ क्लिप ‘एआय-जनरेटेड’ असल्याचा दावा केला. या प्रकरणात सानावर आणि राठोड दोघांविरोधात हरिद्वार आणि डेहराडून येथे आयटी कायद्यासह विविध कलमांखाली दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.

काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आणखी तीव्र केली आहे. अंकिताचा मृतदेह सापडल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी स्थानिक भाजप आमदार रेणू बिष्ट यांच्या सांगण्यावरून रिसॉर्टचा काही भाग पाडण्यात आल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे.

-प्रसन्ना कोचरेकर