आज १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांची जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवस आहे. आज विवेकानंदांच्या जीवनावर प्रचंड साहित्य उपलब्ध आहे. पण आजही प्रश्न असा पडतो की खरेच विवेकानंद आपल्याला समजले का?

प्रकृती ही सातत्याने बदलत असते. परिवर्तन हा तर निसर्गाचा नियम आहे. पण प्रकृती जरी बदलत राहिली तरी शाश्वत विचार मात्र बदलत नसतात. शाश्वत विचार जसेच्या तसे राहतात. जगण्यासाठी बदलावे लागते. पण बदल शाश्वत विचारांना अनुसरून नसेल तर ती वाटचाल भोगवादाकडे असते आणि शेवटी जीवनाचा अंत देखील भोगवादातूनच होत असतो. विवेकानंद म्हणायचे की या जगात कोणीही कमजोर, दुर्बल आणि पापी नाही आहे. माणसाला कमजोर, दुर्बल, पापी समजणे म्हणजे सर्वात मोठे पाप आहे. कारण प्रत्येक माणसामध्ये ईश्वराचा अंश आहे. माणसाच्या दुर्बलतेकडे, कमजोरीकडे, पापी वृत्तीकडे पाहण्यापेक्षा त्याच्यातील ईश्वरी अंशाकडे पहिले की, माणसामाणसांमधील सर्व भेद मिटून जातात आणि माणुसकीचा झरा सर्वत्र वहायला लागतो. पण हे समजण्यासाठी तेवढीच तपश्चर्या आणि साधना देखील हवी असते. पण आपण मात्र मेंढरांसारखे नुसते मृगजळाच्या मागे धावत असतो आणि आपल्याला काहीच प्राप्त होत नसते. प्रत्येक माणूस सामर्थ्यवान, शक्तिवान असतो, पण याची जाणीव त्या माणसाला नसते. स्वतःमधील सामर्थ्याचा आणि शक्तीचा उपयोग हा दीनदलितांच्या सेवेसाठी व्हायला हवा. कारण दीनदलितांची सेवा हीच ईश्वरपूजा, असे विवेकानंद सांगतात. खरा ईश्वर हा पोथी-पुराणे वाचून समजत नसतो, तर त्यासाठी कर्मप्रधान बनून जीवनाचा अनुभव घ्यायचा असतो. त्यात यश मिळेल, अपयश येईल, अडचणी देखील येतील. पण ज्या यशात अडचणी आणि अपयश नसेल, त्या यशाला काहीच किंमत नसते. आपल्याला एखादा मनुष्य प्रचंड कीर्तिवान जरी दिसत असला तरी त्या कीर्तिवान माणसाच्या मागे अपयशाचे प्रचंड डोंगर असतात, जे आपल्याला दिसत नसतात. फक्त दिसते ती त्याची कीर्ती. पण कीर्तिवान माणसाची कीर्ती तेव्हाच टिकते, जेव्हा त्या माणसाचे चारित्र्य कायम चांगले राहते. आज आपल्या भारत देशाला चांगल्या चारित्र्यवान माणसांची आवश्यकता आहे, असे विवेकानंद सांगायचे. कारण माणसाच्या चारित्र्यामध्ये प्रचंड शक्ती असते. एखाद्या ओबडधोबड बोलणाऱ्या माणसाचे वक्तृत्व देखील आपण एक टक लावून ऐकत असतो आणि ती त्या माणसाच्या चारित्र्याची शक्ती असते, हे विचार विवेकानंदांचे होते. तुम्ही मला शंभर चारित्र्यसंपन्न तरुण द्या, मी हे भारत राष्ट्र चारित्र्यसंपन्न बनवून बदलून दाखवतो, असे विवेकानंद नेहमी म्हणत आणि त्यांनी त्या दिशेने अहोरात्र जीवाची तमा न बाळगता ते झटले. संपूर्ण विश्वाला तारण्याची आणि मार्गदर्शन करण्याची शक्ती फक्त भारत राष्ट्राकडे आहे. फक्त गरज आहे ती या राष्ट्राने आपली शक्ती आणि सामर्थ्य ओळखण्याची. या राष्ट्राच्या भूमीचा प्रत्येक कण पवित्र आहे आणि अशा भूमीत जन्माला येण्यासारखे दुसरे पुण्य नाही. म्हणून स्वतःला पुण्यवान आणि भाग्यवान समजा. एकवेळ तेहतीस कोटी देवदेवतांची पूजा सोडा, पण भारतमातेची पूजा करा, म्हणजेच या देशातील गरीब जनतेची सेवा करा आणि मग पहा तुमच्यातील ईश्वराचे प्रगटीकरण कसे होते ते, असे विवेकानंद जिथे जात होते तिथे तिथे हे सांगायचे.
अवघे ३९ वर्षांचे उणेपुरे आयुष्य त्यांचे, पण या आयुष्यात प्रचंड अडचणींचा सामना करून अवघे जग जिंकण्याची किमया त्यांनी केली. शिकागोची धर्मपरिषद जेव्हा त्यांनी गाजवली तेव्हा त्यांच्या भाषणानंतर झालेल्या टाळ्यांचा कडकडाट आजपर्यंत अन्य कुठल्याही वक्त्याच्या किंवा नेत्याच्या भाषणाला झालेला नाही. त्या धर्म परिषदेनंतर अवघ्या विश्वात भारताविषयी असलेले कलुशित मत बदलले. विवेकानंदांचे अनेक अनुयायी भारतात आणि जगात तयार व्हायला लागले. आपण ज्या गुरूकडून ज्ञान घेतो, त्या गुरूची देखील पारख करून तो खरा गुरू की खोटा आहे हे जाणूनच त्याच्याकडून ज्ञान घेतले पाहिजे. म्हणून साक्षात रामकृष्ण परमहंस यांची देखील परीक्षा घेतली आणि नंतरच त्यांचे अनुयायी बनले. देवाविषयी त्यांना ते असंख्य भंडावून सोडणारे प्रश्न विचारायचे आणि रामकृष्ण परमहंस त्यांना शांत चित्ताने उत्तर द्यायचे. आज किती विद्यार्थी आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारतात आणि किती शिक्षक त्या प्रश्नांचे योग्य उत्तर देतात, हा खरा प्रश्न आहे. आज शिक्षणाची जिज्ञासा कमी झालेली आहे आणि फक्त पुस्तकी ज्ञान आणि आजचे शिक्षण केवळ पोट भरण्यापुरतेच मर्यादित झाले आहे. विवेकानंदांना हे शिक्षण कधीच अभिप्रेत नव्हते. विवेकानंद हे म्हणायचे की खरे शिक्षण हे आहे की ज्यातून माणूस घडतो आणि माणसाचा विकास होतो. कारण माणसाला तसे पाहायला गेले तर शिक्षणाची आवश्यकताच नसते. खरे शिक्षण माणसातच असते. कारण माणूस जर खरा सुशिक्षित असता तर आपल्याला सर्वत्र माणुसकीच दिसली असती. पण आपल्याला तसे दिसत नाही आणि म्हणून असंख्य ठिकाणी आपल्याला वाद, भांडणे दिसतात. आपण छोट्या, छोट्या निरर्थक गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण यात आपला प्रचंड वेळ वाया तर जातोच, पण मोठ्या भांडणाचे कारण देखील या छोट्या निरर्थक गोष्टी बनतात. आपण जो चांगला मार्ग स्वीकारतो, त्यावर ठाम आणि निर्भयपणे चालले पाहिजे. या मार्गात डोंगराप्रमाणे अडचणी आल्या तरी पाय रोवून उभे राहिले पाहिजे. कारण सत्याचा मार्ग नेहमी काटेरी असतो आणि तो जरी काटेरी असला तरी अंतिम विजय सत्याचाच होत असतो आणि म्हणून भित्रेपणा सोडला पाहिजे. कारण भित्रेपणामुळे अंगात कणखरपणा येत नाही आणि आणि अशा भित्र्या माणसालाच समाज भीती दाखवत असतो आणि म्हणून माणसाने निडर आणि कणखर बनले पाहिजे, असे विवेकानंद तरुणांना आवर्जून सांगायचे. आपल्याला विवेकानंद होता येणार नाही हे सत्य आहे, पण त्यांचे थोडेतरी विचार आपण निश्चित आत्मसात करू शकतो. कारण आजची ती फार मोठी आवश्यकता आहे.
- अॅड. शिवाजी य. देसाई
ब्रम्हा करमळी - सत्तरी
(९४२११५५६८१)